हवामान बदल आणि शेतीवरचा वाढता ताण

भारताचा शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया आणि अन्नसाखळीचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या कष्टातून, त्याच्या घामातून आणि त्याच्या चिकाटीतून या भूमीवरून अन्नधान्य निर्माण होते; परंतु आज या अन्नदात्याच्याच जीवनात एक अदृश्य संकट शिरले आहे. हवामान बदल हा शब्द केवळ वैज्ञानिकांच्या लेखनात किंवा बातम्यांमध्ये वाचायचा विषय राहिलेला नाही. तो आता शेतकर्‍याच्या शिवारात, त्याच्या घराच्या उंबरठ्यावर आणि त्याच्या रोजच्या जगण्यात उतरला आहे. या बदलत्या हवामानाने शेतीवर व शेतकर्‍याच्या मानसिकतेवर प्रचंड ताण आणला आहे.
गेल्या काही दशकांत पावसाच्या हंगामाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. जून-जुलैमध्ये वेळेवर पडणारा पाऊस कधी उशिरा येतो. कधी कमी पडतो, तर कधी पिके उभी असताना अचानक मुसळधार होते. कधी थंडीचा अतिरेक होतो, तर कधी उष्णतेच्या लाटा पिकांना झळ देतात. या सर्व बदलांचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होतो. एका हंगामात झालेले नुकसान अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवते. शेतकर्‍याचे अर्थकारण विस्कळीत करते.
हवामान बदलामुळे केवळ पिकांचे नुकसानच होत नाही, तर किडी व रोगांचा प्रादुर्भावही वाढतो. उष्णतेच्या वा आर्द्रतेच्या बदलामुळे पिकांवर पूर्वी नसलेल्या किडींचा हल्ला होतो. या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी शेतकर्‍याला अधिक कीटकनाशकं वापरावी लागतात, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. जमिनीच्या तसेच माणसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हा वाढता खर्च आणि घटलेले उत्पादन शेतकर्‍याला कर्जाच्या जाळ्यात आणखी खोलवर ढकलते.
या अनिश्चिततेचा फटका शेतकर्‍याच्या मानसिक आरोग्यावरही बसतो. त्याने घेतलेले कर्ज, केलेली गुंतवणूक आणि त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षा यांचा मोठा ताण हवामानाच्या बदलत्या लहरींनी वाढवला आहे. कधीकधी या ताणाचा परिणाम आत्महत्यांमध्ये, स्थलांतरात किंवा शेती सोडून इतर मजुरीच्या व्यवसायाकडे वळण्यात दिसून येतो.
हवामान बदल थांबवणं शेतकर्‍याच्या हातात नाही, पण त्याचे परिणाम कमी करणं. मात्र, शक्य आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. हवामान अंदाजाची अचूक माहिती देणारी मोबाइल अ‍ॅप्स, स्मार्ट सिंचन प्रणाली, मृदा परीक्षण प्रयोगशाळा, ड्रोनद्वारे कीडनियंत्रण यांसारख्या नव्या उपाययोजना शेतकर्‍याला योग्य नियोजन करण्यास मदत करतात. या साधनांचा योग्य वापर केल्यास उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो, जोखीम घटते आणि कर्ज घेण्याची गरजही कमी होते.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी पिकांच्या निवडीत बदल करणेही गरजेचे आहे. कमी पाण्यात येणारी, उष्णतेला तोंड देणारी पिकं निवडणं, सुधारित वाणांची बियाणं वापरणं, मिश्रपीक पद्धतीचा अवलंब करणं- या उपायांनी नुकसानाचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्था याबाबत नवी बियाणे आणि नवीन पद्धती विकसित करत आहेत, पण त्या शेतकर्‍यापर्यंत पोहोचवण्याची गती वाढवणे आवश्यक आहे.
पाणी व्यवस्थापन हेही हवामान बदलाला उत्तर देणारं महत्त्वाचं साधन आहे. हवामान बदलामुळे पाणीटंचाई गंभीर होत असल्याने ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर आणि स्मार्ट सिंचन यांसारख्या पद्धतींना प्राधान्य देणं आवश्यक आहे. गावोगावी पाणलोट क्षेत्र विकास, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारणाचे प्रकल्प राबवले गेले तर या समस्येचं स्वरूप काही प्रमाणात कमी करता येईल.
यासोबतच विमा योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. पीकविमा योजना शेतकर्‍याला अनिश्चित हवामानापासून दिलासा देऊ शकते, पण ती जलद, पारदर्शक आणि थेट शेतकर्‍यापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे. सरकारी धोरणात सातत्य असणं, हवामान बदल लक्षात घेऊन दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणं आणि निधीची हमी देणं या गोष्टी हवामान बदलाच्या तडाख्यापासून शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने संरक्षित करू शकतात.
हवामान बदल हा फक्त शेतकर्‍यांचा प्रश्न नाही. तो आपला सर्वांचा प्रश्न आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण, जंगलतोड, अनियंत्रित शहरीकरण, प्लास्टिकचा अतिरेक या सर्व गोष्टी हवामान बदलाची गती वाढवतात. म्हणूनच शेतकर्‍याला मदत करण्यासोबतच आपण प्रत्येकाने पर्यावरणपूरक पद्धती स्वीकारणं, ऊर्जाबचत करणं, निसर्गसंवर्धनाला चालना देणं ही आपली जबाबदारी आहे.
जरी हवामान बदलाचा ताण वाढत असला तरी भविष्यासाठी आशा आहे. जैविक शेती, हवामान-प्रतिरोधक बियाणं, डिजिटल तंत्रज्ञान, सुधारित सिंचन, शेतकरी उत्पादक कंपन्या, हवामान अंदाजाची अचूक माहिती – या सर्वांचा संगम झाल्यास हवामान बदलाचा ताण कमी करून शेती अधिक टिकाऊ व शाश्वत करता येईल. या उपायांची अंमलबजावणी करूनच आपण शेतकर्‍याच्या खांद्यावरील ओझं हलकं करू शकतो.
हवामान बदल आणि शेतीवरचा वाढता ताण ही आजची कडवी वस्तुस्थिती आहे. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा अवलंब, पाण्याची बचत, सुधारित पिकं, पारदर्शक विमा योजना, स्थिर धोरणं आणि समाजाचा सहयोग- या सगळ्यांनी शेतकर्‍याला या संकटातून मार्ग दाखवता येईल. हवामान बदल थांबवणं कठीण आहे, पण त्याच्या परिणामांवर मात करणं शक्य आहे आणि त्यासाठी आजपासूनच प्रयत्न सुरू करावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *