सिडको परिसरात जल्लोषात गणेश विसर्जन
सिडको : विशेष प्रतिनिधी
सिडको परिसरात यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने 11 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून 29 हजार 867 गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या, तर 32 टन निर्माल्य वेगळे करून त्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यात आले. दरम्यान, नाशिक महापालिका हद्दीतून सुमारे 2 लाख 26 हजार 177 गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.
गणेश विसर्जनासाठी सिडकोतील पवननगर जलकुंभ, कामटवाडे शाळा, डे केअर सेंटर हायस्कूल, गोविंदनगर येथील जिजाऊ वाचनालय, जुने सिडकोतील राजे छत्रपती व्यायामशाळा, पिंपळगाव खांब, वालदेवी नदी, राजे संभाजी स्टेडियम, मीनाताई ठाकरे शाळा, वासाननगर येथील गामणे मैदान, तसेच अंजना लॉन्स, पाथर्डी फाटा, अंबड पोलीस स्टेशन चौक, राजीवनगर या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात
आली होती.
या संपूर्ण व्यवस्थेसाठी 10 डंपर, 4 ट्रक, 17 ट्रॅक्टर, तसेच निर्माल्य वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या दिवशी सकाळी सातपासून रात्रीपर्यंत महापालिकेच्या 150 हून अधिक कर्मचार्यांनी सेवा बजावली. यावेळी ढोल-ताशा, लेझीम, घोषवाद्य, तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने सिडको परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेला होता.
यंदा अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून घरासमोरच विसर्जन केले. ‘देव द्या आणि देव पण घ्या’ उपक्रमात नागरिकांनी मूर्ती दान करून पर्यावरण संवर्धनात सहभाग घेतला. ही संपूर्ण मोहीम विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यामध्ये उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर (बांधकाम विभाग), हेमंत पठे (पाणीपुरवठा विभाग), मोहन गिते (विद्युत विभाग), संजय गांगुर्डे (घनकचरा विभाग) यांच्यासह महापालिकेचे 120 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले. कृत्रिम तलाव परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पिंपळगाव खांब येथे प्रसादाची व्यवस्था
मराठा सोशल फाउंडेशनतर्फे पिंपळगाव खांब येथील वालदेवी नदी घाटावर येणार्या भाविकांसाठी सोयीसुविधा व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी सांगितले की, नदीपात्रात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोहणारे आदिवासी युवक नियुक्त केले गेले होते .
वडनेर दुमालात गर्दी
वडनेर दुमाला येथील ब्रह्मगिरी घाटावरही भाविकांची मोठी गर्दी होती. येथे माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या वतीने महाप्रसाद आणि भक्तिगीतांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 या वेळेत विसर्जनाच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध होत्या.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…