मित्रांनो एखादा चित्रकार जेव्हा चित्र रेखाटतो. तेव्हा तो चित्रकार त्यात मनाप्रमाणे रंगही भरत असतो.जसे जसे चित्र पूर्ण होते तसें तें सुबक सुंदर दिसते. एक वेगळेच नावीन्य, दिशा आणि ओळख त्या चित्राला मिळते. त्या चित्रकाराने भरलेल्या सुबक रंगछटांनी त्या चित्राचा मैफलीत मानसन्मान वाढतो. आणि पाहिजे ती वाजवी किंमतही मिळते. परंतु आपल्या जीवनातले चित्र जरा वेगळे असते. आपल्या आयुष्यात आपण एखादी गोष्ट ठरवली आणि ती पूर्ण होतेचं असे नाही. बर्याच काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य असते. कारण त्यात आपण मग्न चिंतित होणे म्हणजे आपल्या लक्ष ध्येयापासून दूर जाण्याचा मार्ग असतो. म्हणून काही गोष्टी सोडून दिलेल्या बर्या असतात. काही निगेटिव्ह, वाईट लोकांच्या विचारापासून दूर राहणे योग्य असते.
आता जीवनाच्या रंगाची दुसरी बाजू मांडते. आपल्या आयुष्यातल्या चित्रात आपण मनाप्रमाणे रंग भरू शकत नाही. जेव्हा आपण प्रेमात पडतो. तेव्हा मनावर अनेक रंग छटा असतात. हळूच ते फूल पुस्तकाच्या पानात मिळते. नाही तर अश्रू बनून वहीच्या पानावर रक्ताच्या शाईने उमटते. म्हणून भावबंध तो प्रेमाचा मनाच्या कॅनव्हासमध्येच राहतो. मित्रांनो, आपली सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात. ती फक्त पाहायची असतात. त्यात रंग भरायचे असतात. स्वप्न पूर्ण झाले नाही तरी दुःखी व्हायचें नसते. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचे नसते. त्यातूनच जगण्याचा नवा मार्ग काढायचा असतो. आयुष्यात पडझड येत असते. नवीन पालवीही फुटत असते. झडणे, पडणे, उगवणे हा निसर्गाचा नियम आहे. यातून पुढे चालत राहणे. म्हणजे जीवनाचा प्रवास सुखकर करणे होय.
वाट ती आपली परकी वाटते
ठसे पाऊलांचे पोरकी वाटते.
आता जीवनाच्या रंगाची तिसरी बाजू म्हणजे मन. मित्रांनो, मन आहे म्हणून बरे आहे बरं कां. मन कुठेही भटकतं आणि पुन्हा आपल्या जागी येतं. मनावर कितीही लिहिता येतं आणि लिहिलेलं पुसून टाकता येतं. आपण मनाला उत्साहित केलं पाहिजे. सुंदर विचारांनी, तसेच अनेक सुंदर विचारांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये वावरले पाहिजे. पुस्तके वाचन केले पाहिजे. वाचनाने आपले ज्ञान तर वाढतेच, पण विचारही बदल होतो. आपण मोबाइलमध्ये तासन् तास घालवत असतो. सांगा बरे त्याने आपला फायदा काय? काहीच नाही वेळ वाया जातो, जागरण होते, डोळ्यांचे नंबर वाढतात. चिडचीड होते आणि दुसर्या दिवसाची सुरुवात झोप न झाल्याने, उशिरा उठल्याने दिनचर्या बिघडते. याउलट जर पुस्तके, कविता तरुण पिढीने वाचल्यात तर ज्ञान वाढण्यास मदत होईल. मराठीची वाचनसंस्कृती वाढवा. मराठी शिका. अनेक कादंबर्याही वाचा, बघा वाचणामुळे तुम्हाला कसे उत्साही वाटते.
बोल मराठी वाच मराठी
जीवनाचा संघर्ष मराठी
आईची पहिली ओवी मराठी
अंगाई गीतातून जन्मली मराठी
महाराष्ट्राची आण बाण शान मराठी
इंग्लिश मीडियमच्या मुलांनो शिका, वाचा आणि लिहा. आपली बोलीभाषा मराठी. आपल्या जगण्याचा सन्मान मराठी जपा मराठी. शिवबांचा गर्व मराठी. राष्ट्रध्वजाचा मान मराठी! तर मित्रांनो, जसे एखादे चित्र भरलेल्या रंगाने सन्मान घेत असते, तसेच जीवनाचे आहे. जीवनाला आकार हा शिक्षणाने, शब्द आणि मराठीमुळे येतो. चारचौघांत आपली उंची मराठी शब्दाने वाढते. म्हणून पुस्तके वाचन करा.
Color of life