– देवयानी सोनार
आधार नसतानाही ‘ती’ बनली आधारवड
एकल महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविणारा जिल्हा परिषदचा उपक्रम
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
एकल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संधी आणि अधिकार असणे हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हे उपक्रम राबवत आहोत. महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि सशक्तीकरणासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, जेणेकरून त्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील.
महिलेला तिचे सौभाग्यपण असल्यास समाजात एक मानसन्मान मिळत असतो. म्हणजे ती समाजाची मानसिकता आहे. तिला शुभकार्यात सहभागी करून घेण्यापासून ते नोकरी, व्यवसायात भागीदार वा कोणत्या अडचणीत असल्यास मदत करण्यास धजावणारे, सहकार्य करणारे अनेक जण असतात; परंतु त्याच स्त्रीचे सौभाग्य अपघाताने अन्य कोणत्या कारणाने पुसले गेले असेल (पती मरण पावलेला असेल) तर अशा स्त्रीला तिच्या सासर-माहेरचे तर झिडकारतात, पण समाजही टोमणे मारून घायाळ करून सोडतात. तिने स्वतःसाठी जगणे तर दूर; परंतु दुःख सावरून आयुष्याच्या पुढील टप्प्यात काय करावे किंवा करू नये, मूल असेल-नसेल तर संगोपन, शिक्षण याचा विचार करणेदेखील तिचा अधिकार नसल्यासारखे तिचे नातेवाईक ठरवतात. अशा परिस्थितीतही काही एकल महिलांनी वेगळी वाट निवडत पारंपरिक प्रथा, रूढींना तिलांजली देत सक्षमपणे स्वतःला सावरले आहेच. पण नोकरी- व्यवसाय उभा करून आयुष्यातील जोडीदार सोडून गेला तरी स्वतःच स्वतःचा आधारवड बनल्या आहेत. यानिमित्ताने समाजात चांगला संदेश या एकल महिलांमुळे गेला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील अशा एकल महिला उद्योजकांचा प्रवास त्यांच्याच शब्दांत….
‘नवचेतना’मुळे एकल महिलांना नवी दिशा
– प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
माणूस जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो आणि जातानाही एकटाच जातो, हे वैश्विक सत्य आहे. मात्र, समाजरचनेत स्त्रीचे जीवन अनेक नात्यांशी जोडले गेलेले असल्याने तिच्या आयुष्यातील वास्तव अनेकदा वेगळे असते. विशेषतः पतीचे निधन झाल्यानंतर अनेक महिलांना केवळ वैयक्तिक दुःखच नव्हे, तर समाजातील काही अनिष्ट प्रथा, रूढी आणि मानसिकतेलाही सामोरे जावे लागते. आज परिस्थिती हळूहळू बदलत आहे. पतीच्या निधनानंतरही अनेक महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत व्यवसाय सुरू केला. मुलांचे शिक्षण पूर्ण केले आणि समाजासमोर धैर्याचे उदाहरण ठेवले. अशा महिलांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक मार्फत मनवचेतनाफ अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश एकल महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हा आहे. उमेद अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात 57 हजार 435 पात्र एकल महिलांची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी 32 हजार महिलांना कर्जसहाय्य देऊन विविध व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यात आली आहे, तर एक हजार 369 महिलांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मार्चअखेर सर्व पात्र महिलांना उमेद अभियानाशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमामागे एक महत्त्वाचा संदेश आहे…समाजाने एकल महिलांकडे दयेने नव्हे, तर सन्मानाने पाहिले पाहिजे. एखाद्या महिलेवर वैधव्याचे दुर्दैव आले तर तिच्या आयुष्याचे रंग काढून घेण्याचा अधिकार समाजाला नाही. उलट तिच्या पाठीशी उभे राहून तिला जगण्याची नवी उमेद देणे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.स्त्रियांनाही महिलादिनी एक आवाहन आहे, छोट्या- छोट्या गोष्टीवरून त्या घटस्फोेट घेतात. ज्या कारणाने घटस्फोट घेतला तीच कामे माहेरीही करतात. राधा, लक्ष्मी प्रत्येकीला व्हायचे आहे, पण श्रीरामाबरोबर वनवास काढणारी सीता कोणालाच व्हायचे नाही. सीतापण व्हायला पाहिजे. नशिबाला आले तसे साथ द्यायला हवी. शेवटी संसार दोघांचा असतो.
कोरोनाने हिरावले, बचत गटाने सावरले

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेरी गावातील नीता ज्ञानेश्वर बच्छाव या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या. 2009 मध्ये त्यांचा विवाह शेरी गावातील ज्ञानेश्वर खंडेराव बच्छाव यांच्याशी झाला. विवाहानंतर सासू-सासरे आणि पती शेती करत असताना त्यांनीही कुटुंबाच्या जबाबदार्या सांभाळल्या. संतती उशिरा झाल्यामुळे काही कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांना वेगळे राहावे लागले. त्यानंतर शेतमजुरी करून त्यांनी संसाराचा गाडा चालवायला सुरुवात केली. 2012 व 2014 साली त्यांना दोन मुले झाली. मात्र, मुलं लहान असल्याने बाहेर काम करणे कठीण झाले. घराची जबाबदारी पूर्णपणे पतीवर आली. त्यातून पतीला दारूचे व्यसन लागले. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला. त्यामुळे दोन मुलांसह कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नीता बच्छाव यांच्या खांद्यावर आली. अत्यंत हलाखीत मजुरी करत त्यांनी संसार चालवला. 2021 मध्ये त्यांच्या गावात महिलांसाठी बचतगट स्थापन करण्यासाठी एक टीम आली. त्यावेळी पुढाकार घेत स्वतःचा बचतगट स्थापन केला. त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाल्यावर समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी त्यांना देण्यात आली. या कामामुळे त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. मात्र, कोरोनाच्या काळात त्यांच्या आयुष्यात मोठे संकट कोसळले. 30 जून 2021 रोजी पतीचे, त्याआधी 18 जून रोजी सासू, 20 जुलै रोजी सासरे आणि 7 सप्टेंबर रोजी केवळ नऊ वर्षांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. अवघ्या काही महिन्यांत कुटुंबातील चार जण गमावल्यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या. त्यावेळी त्यांचा धाकटा मुलगा केवळ सात वर्षांचा होता. या कठीण प्रसंगानंतरही त्यांनी हार मानली नाही. मुलासाठी आणि आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी नव्याने सुरुवात केली. गावात महिलांचे बचतगट वाढवण्यावर भर दिला. एकेकाळी गावात फक्त चार बचतगट होते; आज 14 बचतगट कार्यरत आहेत. त्यानंतर ब्यूटिपार्लरचा कोर्स करून छोटेसे पार्लरही सुरू केले. ग्रामसंघातून कर्ज घेऊन त्यांनी गावात डिजिटल सेवा केंद्र सुरू केले. या केंद्रामुळे गावातील महिलांना मोठी सुविधा मिळाली. बँकेसाठी 16 किलोमीटर दूर जावे लागे. मात्र, आता गावातच सेवा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचू लागले. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी एकल महिलांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे नवसंजीवनी मिळाल्याचे त्या सांगतात.
सपना कटाळे यांची संघर्षगाथा

स्वतः उभी राहिली, इतरांसाठी प्रेरणा बनली
पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर येणे ही कोणत्याही महिलेसाठी कठीण वेळ असते. मात्र, नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण येथील सपना आत्माराम कटाळे यांनी या संकटाला हार न मानता धैर्याने सामोरे जात स्वतःचा उदरनिर्वाह उभा केला. शिवणकाम, मास्कनिर्मिती, कटलरी व्यवसाय अशा विविध कामांतून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाला आधार दिला नाही, तर इतर महिलांनाही स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.
सपना कटाळे यांचे आयुष्य 13 मे 2020 रोजी अचानक बदलले. कामावर जात असताना रेल्वे अपघातात पती आत्माराम एकनाथ कटाळे यांचे निधन झाले. त्यावेळी मुलगी अंशिता आणि मुलगा विराज लहान होते. कुटुंबाचा आधारच हरपल्याने संपूर्ण जबाबदारी सपना यांच्या खांद्यावर आली. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी खचून न जाता संघर्षाचा मार्ग स्वीकारला. कोरोनाच्या काळात उदरनिर्वाहासाठी त्यांनी मास्क तयार करून विक्री सुरू केली. त्याचबरोबर शिवणकाम आणि कटलरी व्यवसाय करून त्यांनी कुटुंबाचा खर्च सांभाळला. कुटुंब आणि व्यवसाय यात समतोल राखणे, हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते, पण त्यांनी चिकाटीने दोन्ही जबाबदार्या सांभाळल्या.
एकल महिला म्हणून समाजात उभे राहणे सोपे नव्हते. सुरुवातीला सुरक्षिततेची चिंता, सामाजिक दबाव आणि आत्मविश्वासाचा अभाव, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना प्रशिक्षण देत त्यांना लहानमोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. त्या क्षणी सपना कटाळे यांना वाटले की, समाजात बदलाची सुरुवात झाली आहे.
व्यवसाय करत असतानाच त्या उमेद अभियानांंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत झाल्या. आज सपना कटाळे स्वतःला केवळ एक उद्योजिका म्हणून नव्हे, तर समाजासाठी काम करणारी प्रेरणादायी महिला म्हणून उभी करत आहेत. आज जर त्यांना त्यांच्या भूतकाळातील स्वतःशी बोलण्याची संधी मिळाली, तर त्या म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव. तू मजबूत आहेस आणि तुझी स्वप्ने नक्की उंच भरारी घेतील.
आयुष्याला आली ‘शोभा’!

पतीच्या अकाली निधनानंतर एकटी पडले. पुरती खचून गेले. आत्महत्येचाही विचार मनात आला. पण डोळ्यासमोर माझी मुले दिसत होती. त्यामुळे संघर्ष करण्याचे ठरविले. ’उमेद’च्या माध्यमातून जगण्याला नवी दिशा मिळाली. विल्होळी, ता. नाशिक येथील शोभा प्रभाकर वाघ यांची ही संघर्ष कथा समाजातील एकल महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
पतीचे निधन झाले. सर्व जबाबदारी एकटीवरच येऊन पडली. घरात कमावणारे कुणीच नव्हते. इतर मुले किती आनंदात राहतात. नीटनेटकी राहतात. त्या तुलनेत आपल्या मुलांना किती संघर्ष करावा लागतोय, हे पाहून जीव तुटायचा. कधीकधी तर एक वेळ जेवणाचीही भ्रांत होती. पण ठरविले आता रडायचे नाही, तर लढायचे. उमेद अभियानाबद्दल माहिती मिळाली. त्यांनी जिल्हा नियोजन निधीतून स्टॉल मिळाला. या दुकानाची साथ लाभली आणि जगण्याला बळ मिळाले. आयुष्यात अनेक प्रसंग येतात. पण न डगमगता या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ परिस्थितीच देत असते. शासनाच्या एकल महिला योजनेतून कुटुंबाला आधार मिळाला. आर्थिक स्वालंबनातून व्यक्तिमत्त्वात बदल झाला. स्वत: कमावती झाल्यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य यांचा प्रश्न मिटला. मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊ शकले.
हरली नाही…सावरली!

गिरणारेच्या वैशाली झाल्टेंची जिद्द
पतीनिधनानंतर आयुष्यावर दु:खाचे सावट, लहान मुलाची जबाबदारी आणि आर्थिक संकट, अशी अनेक आव्हाने समोर असतानाही गिरणारे येथील वैशाली विजय झाल्टे यांनी हार न मानता स्वतःच्या जिद्दीच्या बळावर उभारी घेतली. स्वयंसहायता समूहाच्या आधाराने छोट्या किराणा दुकानापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज महिन्याला 35 ते 40 हजारांंच्या उत्पन्नापर्यंत पोहोचला आहे. त्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. गिरणारे येथील वैशाली झाल्टे या म्हाळसा माता महिला स्वयंसहायता समूहाच्या सक्रिय सदस्य आहेत. 1 एप्रिल 2014 रोजी स्थापन झालेल्या या समूहातून त्यांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला. सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या वैशाली यांचे लग्न त्या बारावीत असतानाच झाले. लग्नानंतर संसाराची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कधीही हार मानली नाही. लग्नानंतर त्यांनी घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी छोट्या प्रमाणात किराणा दुकान सुरू केले. त्याचबरोबर शिवणकामही सुरू ठेवले. मात्र, लग्नानंतर 14 वर्षांनी पतीचे निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसला. त्यावेळी त्यांचा मुलगा केवळ पाचवीत शिकत होता. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. या कठीण काळात बचत गटातील महिलांनी त्यांना मोठा आधार दिला. समूहाच्या मदतीने बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी फाइल तयार करण्यात आली. या कर्जाच्या सहाय्याने वैशाली यांनी किराणा दुकानासोबतच कापड व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि नियोजनामुळे छोट्या दुकानाचे रूपांतर आज मोठ्या व्यवसायात झाले आहे. स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून शिकलेले धडे त्या इतर महिलांनाही देतात. स्वतःच्या पायावर उभे राहणे सर्वांत महत्त्वाचे आहे. कोणावर अवलंबून न राहता मेहनत व जिद्दीने काम केले तर कोणतीही महिला यशस्वी होऊ शकते, असा संदेश त्या देतात.
जगण्याची मिळाली ‘उमेद’

वैशाली जिभाऊ बोरसे या मेशी (ता. देवळा) येथील यशस्वी उद्योजिका. सर्वसामान्य गृहिणी ते उद्योजिका असा अत्यंत खडतर त्यांचा प्रवास आहे. वैशाली बोरसे यांचे माहेर मालेगाव तालुक्यातील नांदगाव. बी.ए., बी.एड. शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. 2018 मध्ये पतीचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यावेळी मुले बारावीला शिकत होती. मुलांना डॉक्टर करावे, अशी पतीची इच्छा असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण करायची होती. एकल महिला म्हणून जीवन जगताना सर्वांत मोठे आव्हान मुलांच्या शिक्षणाचे होते. पती गेल्यानंतर लगेच नोकरी करणे शक्य नव्हते. अशा वेळी टेलरिंग व शेती करीत उदरनिर्वाह केला. उदनिर्वाहासाठी काहीच साधन नव्हते. स्वतः पाच एकर जमीन एकटीने केली. शेताला पाणी (बारे) देण्यापर्यंत सर्व काम एकटीने केले. त्यानंतर शिवणकाम येत असल्याने शिलाईयंत्र घेतले. दिवसभर शेतीकाम आणि सायंकाळी टेलरिंग काम करायला सुरुवात केली. बचतगट सुरू केला. ’उमेद’ची माहिती मिळाली. देवळ्याला जाऊन ’उमेद’मध्ये प्रवेश केला. तिथून पुढे दरवर्षी उमेद वाढत गेली. कामाला सुरुवात केली तेव्हा बारा-पंधरा हजार रुपये कमवायचे. त्यावर कसाबसा खर्च भागायचा. शेतीच्या उत्पन्नात मुलांचे शिक्षण केले. तेव्हा शिवणकाम व शेती मिळून दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न सुरू झाले. एक मुलगा डॉक्टर, तर दुसरा इंजिनिअर झाला असून, आता ते कमवायला लागले आहेत. आता ते माझी काळजी घेतात.
अर्ध्यावरती डाव मोडला,पण… अश्विनी वाघ यांचा जिद्दीचा प्रवास

एकटी अबला नारी काही करू शकत नाही. तिला आधाराची गरज असते, ही समाजाची मानसिकता, समज कामकाजातून आणि कष्टाच्या जोरावर खोटा ठरविला आहे. महिलेने ठरविले तर ती आकाशालाही गवसणी घालू शकते, असे महिरावणीच्या अश्विनी वाघ सांगतात.
2012 मध्ये लग्न झाल्यानंतर अश्विनी प्रवीण वाघ यांचे पती कामानिमित्त गावाला गेले होते, पण तिथे त्यांना सर्पदंश झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. पती गेल्यानंतर दुःखाचा डोंगरच कोसळला. माझ्या सोहम आणि पूर्वा या मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. गृहिणी होते. त्यामुळे बाहेरचे जग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी. जगाचे व्यवहार माहिती नव्हते. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न ’आ’ वासून होता. मुलांना सांभाळायचे होते, पण सुरुवातीला काही मार्ग सुचत नव्हता. सुरुवातीला घरगुती जबाबदार्या आणि बाहेरच्या जगाचे अज्ञान यामुळे अवघड वाटले. बचतगट सुरू केला आणि गावातील महिलांच्या मदतीने, मेहनतीने स्वतःसाठी व्यवसायाची संधी निर्माण केली.
बचत गटाच्या माध्यमातून अश्विनी पंचायत समितीत निवडल्या गेल्या आणि त्यांच्यासोबत मेस/खानावळ व्यवसाय सुरू केला. एकल महिला म्हणून कुटुंब आणि व्यवसाय चालवणे कठीण आहे, पण वेळेचे नियोजन योग्य केले तर अशक्य काही नाही, अशा आश्वासक शब्दांनी त्यांनी इतर महिलांना प्रेरणा दिली. आज त्या फक्त एक यशस्वी उद्योजिका नसून, समाजासाठी प्रेरणास्रोेत आहेत. पती संसार अर्ध्या प्रवासात सोडून गेले असले, तरी अप्रत्यक्षपणे कायमस्वरूपी माझ्यासोबत आहेत. मला माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल घडवायचे आहे.
जल हेच बनले ’ती’च्यासाठी जीवन!

संगीता चारोस्कर यांची जगण्याची लढाई
दुःख आणि अपत्यांच्या काळजीतूनही हार न मानता संगीता चारोस्कर यांनी पाण्याच्या व्यवसायातून आर्थिक स्वावलंबन साधले आहे. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून, त्यांनी समाजातल्या अनेक महिलांसाठी स्वतःवर विश्वास ठेवण्याचे संदेश दिले आहेत. संगीता चारोस्कर, दरी-मातोरी येथे राहणार्या. गेल्या काही वर्षांत आयुष्यातील मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. कोरोनाच्या काळात 17 वर्षांच्या मुलासह पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर सहावी इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्याी संगीता, आर्थिक आणि मानसिक आव्हानांसमोर उभ्या राहिल्या. मजुरी करून उदरनिर्वाह करत असताना, पतीच्या पाण्याच्या व्यवसायाचे काम सांभाळण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. समाज एकल महिलेला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो, पण मी कोणालाही न घाबरता पुढे चालत राहिले आणि मागे वळून पाहिले नाही, असे त्यांनी सांगितले. कृष्णा अॅक्वा या पाण्याच्या व्यवसायास त्यांनी सुरुवात केली. आज त्या दरी-मातोरीत नागरिकांना पाणी पुरवतात. व्यवसाय गावापुरता मर्यादित आहे, तरीही आठ ते दहा हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे त्या सांगतात. मुलगी अकरावीला आहे. तिला चांगले शिक्षण देऊन तिच्या पायावर उभे करणार आहे. जरी मी कमी शिकलेली आहे, तरी संकटामुळे शिक्षणाचे महत्त्व मला समजले आहे. शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. ग्रामपंचायतीकडून अजून सहकार्य मिळाले नसल्याचे सांगत किमान शासनाची काही मदत मिळावी यासाठी त्या ग्रा.पं.मध्ये पाण्याच्या टाकीसंदर्भात पाठपुरावा करीत आहे. समाधानकारक काम झाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
Come on, fight again!

