सहभोजन

सहभोजन

लेखिका: मनीषा चौधरी

 

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. एका गावातील ग्रामसभेत एक अनोखा ठराव एकमताने मंजूर झाला. तो होता दिवसातून किमान एकदा तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण घ्यावे. सहभोजनाचा आनंद घ्यावा. बदलती जीवनशैली, हातातील फोनमध्ये गुंतलेले कुटुंब,हरवत चाललेले कौटुंबिक संवाद हे घरोघरी दिसणारे विदारक चित्र आहे. यातून बाहेर पडून कौटुंबिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. धावत्या जीवनशैलीच्या नावाखाली धावण्याची एवढी सवय झाली आहे, की माणूस माणसापासून दूर धावत आहे. एकाच घरात राहून एकमेकांसोबत बोलण्यापेक्षा इतर सर्वच गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत.
कुठल्याही नियमांचा बडगा मागे लागल्याशिवाय आपण चांगल्या आरोग्यदायी सवयी स्वीकारणारच नाहीत का? अशी मानसिकता तर तयार होत नाही ना? पूर्वी एकत्र बसून जेवण करणे म्हणजे कौटुंबिक गप्पांची मैफलच असायची. एकत्र बसून जेवण करताना नकळत एकमेकांशी संवाद साधला जातो. मनं मोकळी होतात. ताण हलका होतो. थकवा निघून जातो. एकटेपणाची भावना दूर होते. मानसिक स्वास्थ्य राखले जाते. कुटुंबीयांसोबत बसून बोलण्याची ही एक मोठी संधीच असते. परस्परांविषयीची भीती, राग, दुरावा नाहीसा होऊ शकतो. संवादात गोडवा वाढू शकतो. गप्पांच्या ओघात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. मनमोकळे करण्याची हक्काची जागा मिळते. कुटुंबातील संवाद वाढला तर घरातील मुले मुली ही बाहेर आधार न शोधता, घरातच मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतात.असे अनेक फायदे व शून्य तोटे असलेले हे कौटुंबिक सहभोजन कुठल्याही नियमाची वाट न बघता प्रत्येक कुटुंबाने सुरू करायलाच हवे. परंतु कुटुंबात एकत्र जेवायला बसून जर हातातील मोबाईल सुटत नसेल तर त्या एकत्र बसण्यालाही काही अर्थ नाही.
सायंकाळी दोन तास पालकांनी टीव्ही मोबाईल पासून सक्तीने दूर राहावे ,आपल्या मुलांना वेळ द्यावा अशा स्वरूपाचे नियमही काही गावांमध्ये ठरविल्याचे वाचनात आले. घरात राहणाऱ्या कुटुंबात फक्त लहान मुलं किंवा वयोवृद्ध एकटे असतात असे नाही तर मोबाईल, टि.व्ही.त हरवलेला प्रत्येक सदस्य एकटा पडल्यासारखा असतो. कुटुंब व्यवस्थेचे काही अलिखित नियम होते आणि ते जपलेही जात होते. परंतु आता मात्र प्रत्येक गोष्टीचे नियम आणि ठराव घ्यावे लागतील की काय! न जाणो कधी, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी बोलण्याचाही एखादा कठोर नियम करण्याची वेळ येईल. त्यामुळे वेळीच सावध होऊन घराचं घरपण जपायलाच हवं.

मनिषा चौधरी नाशिक

One thought on “सहभोजन

  1. लेखिका मा मनीषा चौधरी यांचे *सहजच* सदरातील *सहभोजनाचा* आस्वाद घेऊन आलो.

    हल्ली विभक्त कुटुंब पद्धती आल्याने घरात फक्त पती पत्नी, आणि एक किंवा दोन मुले इतकाच परिवार असतो, पती पत्नी दोघेही नोकरीला असल्याचे जवळपास ७० टक्के परिवार दिसून येतो. मुलांना पाळणाघराची सवय असल्याने ही मुले सकाळ पासून सायंकाळ पर्यंत तेथेच असतात. पालक बाहेरून जेवण करून येतात , येताना मुलांना पार्सल घेऊन येतात , उशिरा आल्याने मुले गुपचूप मिळेल ते एकटेच खातात त्यामुळे कौटुंबिक जेवणाचा , सहभोजनाचा आनंद मिळत नाही. एक दिवस रविवार सुट्टी असल्याने मुलांचीदेखील अपेक्षा बाहेर जेवणाची असते.

    याला काही परिवार अपवाद आहेत. गावाकडे एकत्र कुटुंब पद्धत असल्याने शक्यतो रात्रीचे जेवण हे सहभोजन असते.

    आमच्याकडे देखील गावाकडे गेल्यावर सर्व एकत्रित सहभोजन करतो. एखादा सदस्य उशिरा येणार असेल तर तोवर वाट पाहिली जाते.. पण एकत्रितच भोजन करतो. त्यामुळे परिवारात एकजीवपणा राहतो. एकोपा राहतो. त्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात आणि विचारांचे आदानप्रदान होते. यातून सकारात्मक निर्णय होऊन एखादा चांगला उपक्रम राबवला जातो. मुलांचे लग्न, घर, शेती असे मोठ्याखर्चाचे सामुदायिक कार्य सहज घडून जाते.

    मा मनीषा चौधरी यांनी अतिशय स्तुत्य उपक्रमाची मीमांसा केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *