गोदावरी नदीतून पानवेली हटविण्यासाठी समिती

1 मेपासून मोहिमेचा शुभारंभ; गोदाकाठच्या नागरिकांच्या पाठपुराव्याला यश

निफाड ः विशेष प्रतिनिधी
.गोदावरी नदीतील पानवेलीच्या संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी रविवार दि 27 एप्रिल रोजी चांदोरी ग्रामपालिका येथे नवनियुक्त प्रांतधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे,तहसीलदार विशाल नाईकवाडे, भारतीय जैन संघटनेचे नंदू साखला यांच्या उपस्थिती विशेष बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.या बैठकीत पानवेली निर्मूलनासाठी विशेष कृती समिती स्थापन करण्यात आली असून,प्रत्यक्ष मोहीम येत्या 1 मेपासून सुरू होणार असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली आहे.
चांदोरी,सायखेडा व नांदूर मधमेश्वर या मंडळातील गोदाकाठच्या गावांचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर, वाढत्या पानवेलीने निर्माण केलेल्या संकटाचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले.मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी,भारतीय जैन संघटना व पानवेली निर्मूलन कृती समितीचे सदस्य यांच्या समन्वयातून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात
आली.याप्रसंगी चांदोरी सरपंच विनायक खरात, भूषण मटकरी, जगन्नाथ कुटे,संजय दाते,अशपाक शेख, कृष्णा आघाव, सुनिता राजोळे, अरुण पाटील बोडके, सागर गडाख ,मंडळ अधिकारी शितल कुयटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदाकाठच्या लोकप्रतिनिधीना सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत प्रशासनाने हा ठोस निर्णय घेतला आहे.गोदावरीला परत नवे जीवन देण्यासाठी 1 मेपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे,स्थानिक आपती व्यवस्थापन समिती आणि भारतीय जैन संघटनेची मदत घेतली जाणार असून महसूल प्रशासनाच्या वतीने नोडल अधिकारी म्हणून एका नायब तहसीलदार यांची नियुक्ती केली जाणार आहे.अशी माहीती बैठकीत देण्यात आली. पाण्यातून पानवेलीचे व्यवस्थीत निर्मूलन,पर्यावरण साक्षरता मोहिम व स्थानिकांच्या सहभागाने नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट मोहिमेच्या केंद्रस्थानी ठेवत प्रांत डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षते खाली समिती नियुक्त करण्यात येणार असून यात सरपंच व क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *