हल्ली ‘कॉमनसेन्स’ या मराठाळलेल्या (जसे इंग्रजाळलेल्या) शब्दाचा अर्थ डिक्शनरीत शोधायला गेलो तर त्याचा अर्थ ‘कॉमनसेन्स’ असाच आहे. गुगलमहाराज पण तेच सांगणार. पण मी म्हणते अर्थ शोधायचाच कशाला? कारण समाजात, आजूबाजूला, देशविदेशात, अगदी स्वतःमध्ये सुद्धा ‘कॉमन्सेन्स’ असण्यापेक्षा नसलेल्याचीच उदाहरणे जास्तीतजास्त. भूमितीत माझ्या शिक्षिका सावकार मॅडमने शिकवलेले एक प्रमेय आठवते. ‘जी गोष्ट विचारलेली आहे ती नाहीये’ असे समजून प्रमेय सोडवणे; विचारलेली गोष्ट लवकर सिद्ध होते. कॉमनसेन्स असाच तर प्रकार असतो.
भाजीबाजारात कापडी पिशव्या घेऊन फिरत असताना आणि अगदी पिशव्यांमधून दस्तुरखुद्द ‘मेथीची भाजी’ दर्शन देत देत डोकावून सगळ्यांना हाय बाय करत असताना लोक विचारतात; ‘काय मेथी घेतली वाटतं! मग पिशवीतून तुम्हाला काय कांद्याच्या पातीने हाय केले की पालकने बाय केले? कॉमन सेन्स आहे हो!
घरात काही पाहुणे मुक्कामाला येतात. सकाळी उठल्यावर आमच्या आगावु काटर्याला विचारतात, ‘अरे उठलास तू’ खोचक कार्ट करवादतं ’नाही उडतोय’ मनातले खो खो हसू दाबत चेहर्यावर ओशाळे भाव आणण्याचा कॉमनसेन्स चांगलाच जमायला लागला आम्हाला.
सकाळी सकाळी घरात नाश्ता, डबे, मुलांचे शाळेसाठी आवरणे, मिस्टरांची ऑफिसला जाण्याची घाई सुरू असताना शेजारणीने येऊन चौकशीचा रतीब लावावा, ‘काय शाळेची घाई वाटतं!’ मग माझी चिमुरडी काय कॉलेजला जाण्यासारखी वाटली की काय? प्लेट मधला उपमा बघून ‘आज नाश्त्याला उपमा वाटतं! मग उपम्याने पाळण्यात झोपून सांगितले का माझे नामकरण पोहे म्हणून करा असे! मिस्टरांची ऑफिसची बॅग बघून’ ऑफिसला निघालात वाटतं! अरे ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसलाच जाणार ना की गोदा पार्कला भटकंती करायला जाणार?
घरात टीव्ही, फ्रिज, मिक्सर यांचे आवाज तसे सर्वचिरपरिचित. पण घरात काही पाहुणे शिरतानाच विचारतात, मिक्सरचा आवाज येतोय! साधी गोष्ट आहे हो मिक्सर मिक्सर सारखाच आवाज करेल ना! टीव्हीवर तर कांदा, लसूण, खोबरं मसाल्याचे वाटण दळून नाही मिळणार ना!
घरात फ्रीज दुरुस्त करणारा मेकॅनिक बघून शेजारीण विचारते फ्रीज खराब झाला वाटतं, असे उत्तर द्यावेसे वाटते, नाही हो मेकॅनिक तिरळा आहे, त्याला टीव्ही दाखवला तो फ्रीज खोलून बसला आहे.
नसत्या चौकशा;
परवा दुपारी कसेबसे माझ्या कार्ट्याला अभ्यासाला बसवले. गणित सोडवायला जरा मदत करत होते. शेजारीण अशा वेळेला बरोब्बर टपकते ‘काय बाळाचा अभ्यास घेताय वाटतं!’ बये अभ्यासाची पुस्तकं उघडून नाच गाणी तर नाही ना शिकवणार! जमिनीवर बसून अभ्यास करत होतो. उन्हाळ्याचे जमिनीवर जरा बरे वाटते. तसेही पाय जमिनीवरच असावे. विद्वान शेजारणीची टिप्पणी, ‘अरे जमिनीवर बसलात! निदान चटई तरी टाकायची; नाही म्हणजे अभ्यास केलेला डोक्यातून जमिनीच्या पोटात गुडुप होतो. दिग्मुढ होत मुलाच्या, माझ्या शरीराचे परीक्षण करू लागले की मेंदूला एखादा पाइप आहे की काय? अभ्यास केल्यावर पाण्याच्या पाईप सारखे जमिनीत अभ्यास सोडून देतो. त्यानंतर माझं कार्ट किचनमध्येच डायनिंग टेबलवर ठाण आणि अभ्यास पसारा सोबत मांडून बसत हो! फॅन चालू असला तर गॅस लावायची पंचायत. संध्याकाळी दिवा लावतानाही शेजारीन विचारते शुभंकरोति म्हणतायेत वाटतं, अहो ताई माई अक्का दीदी संध्याकाळी दिवा लावताना आम्ही काकड आरती, भैरवी किंवा भूपाळी नाही म्हणत हो.
सटीसामाशी कुठेतरी गावाला जायला निघतो. पार्किंगमधल्या गाडीच्या डिकीत बॅगा बोचके ठेवताना शेजारीण, कामवाली ते शेजारच्या सोसायटीतील वॉचमन गाडी सोसायटीची सीमारेषा ओलांडेपर्यंत जो तो विचारतो ‘बाहेरगावी निघालात वाटतं!’ गावाला जाण्याचा मूड बर्यापैकी विरघळत चेहर्यावर पसरायला लागतो. बॅगा बोचकी घेऊन आणि गावाला जाण्याची तयारी करून आम्ही गावातल्या गावात किराणा दुकानात, किंवा डॉक्टरकडे तब्येत तपासायला नाही जात हो! कधी काळी मूडमध्ये जामानिमा करून मॉर्निंग वॉकला निघावे, समोरून सोसायटीतल्या रिटायर्डांचे टोळके येते आणि अंमळ आनंद दाखवत म्हणते, ‘अरे आज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक!’ फक्त हसून दाखवावे लागते. एक तर मॉर्निंग वॉक सकाळी सकाळीच करतात, शांतपणे चालतो आहे ना म्हणजे वॉकच करतो आहोत, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट या कपड्यांवर ऑफिसलाही जाऊ शकत नाही, नाही शॉपिंगला, नाही मुलाच्या शाळेत, आणि युद्धावर तर नाहीच नाही.
सुट्टीच्या दिवशी कधीतरी पेपर उघडावा जाता जाता शेजारचे आप्तस्वकीय लगेच डोकावत म्हणतात, ‘आज सुट्टी वाटतं! मस्त निवांत पेपर वाचन सुरू आहे वाटतं!’ सुट्टीच्या दिवशी छान निवांतपणा; चिडीने पेपर जरा जरा जास्तच सळसळवत ऐकवावेसे वाटते, ‘अहो सुट्टीच्या दिवशीच निवांतपणा असतो ना! आणि वर्तमानपत्रात लपवून कसली घाणेरडी मासिके तर नाही वाचत ना!’ पुढचा टोमणा त्यांच्या चिरंजीवांसाठी मनातल्या मनातच बोलते. आणि किंचित अशा स्माईल वर कॉमन सेन्सला फुल स्टॉप देतो. इस्तरीवाला सोसायटीच्या समोरच फक्त रस्ता ओलांडून आहे. येता-येता कधीकधी इस्त्रीच्या कपड्यांच्या घड्या हातावर तोलत येत असताना कोणी ना कोणी आवर्जून हटकतेच ‘इस्तरीचे कपडे वाटतं!’ शब्दांचा पसारा मनात फुलताना फक्त ‘हो’ म्हणावे लागते. मनाच्या शब्द पसार्यात मात्र अनंत शब्द, पॅराग्राफ, निबंधही तयार झालेला असतो. घरात कारट्यांनी हरवलेल्या वस्तू इतस्ततः शोधतांना त्या शाळेच्या बॅगेजवळच सापडतात. कधी कधी सासुबाई करवादतात ‘अरे इथेच तर होतं! जरा बघावे इकडे तिकडे, डोळे कशासाठी दिलेत देवाने!’ मनातले हसू दाबत अरुण दातेंच्या गीतातील ओळी मनात पिंगा घालू लागतात ‘डोळे कशासाठी….’
माझे आजोबा आणि मोठे काका अत्यंत शिस्तप्रिय. दिवसातला प्रत्येक प्रहर विशिष्ट कामांसाठी ठरलेला असतो अशी त्यांची शिस्त होती. त्या काळात मला फारसे माहितही नाही पण अंधारात लवकर उठण्याची पद्धत होती. जर कोणी उजाडेपर्यंत झोपले तर आजोबांचा पारा चढत असे. चढया आवाजात रामरक्षा, मारुतीस्तोत्र, विष्णुसहस्रनाम सुरू होई. आरतीच्या वेळेला एक नजर सर्वांवर टाकत. जर कोणी दिसले नाही तर घंटारवातून आजोबांच्या रागाचा अंदाज येई. उशिरापर्यंत झोपलेल्या व्यक्तीला आजीच्या ओव्यातून स्वतःची चूक लक्षात येई.
‘सकाळी उठोनिया करावे मुखमार्जन,
सडा समर्जनानंतर रांगोळी रेखाटन
देवपूजा आरती म्हणावी
मग करावे देवदर्शन’
आजीच्या तोंडी दिवसभरात असंख्य ओव्या असत. निरक्षर आजी परंपरागत ओव्या तर म्हणायचीच पण तिच्या स्वरचित ओव्या प्रसंगपरत्वे शीघ्रगतीने तयार होत असत. प्रत्येक प्रसंगात कॉमनसेन्स वापरत नवनवीन ओव्या तयार करून समोरच्याला एक तर ती चुकांची जाणीव करून देत असे. किंवा मनात प्रेरणा, स्फूर्ती, जनरल नॉलेज निर्माण करत असे. पण या सगळ्या गोष्टी शिस्तीच्या चौकटीच्या आत असत. आजोबांच्या काळात टीव्ही, मोबाइल नव्हता पण त्यांच्यासमोर रेडिओवर गाणी लावण्याची किंवा गाणी गुणगुणण्याचीही हिम्मत कोणाची नव्हती. चुकून कोणी गुणगुणत असले आणि आजोबांची येण्याची चाहूल लागली तर आजी लगेच गुणगुणत असे,
‘राम नाम घ्यावे मुखी
विश्व होईल सारे सुखी’
सगळेजण एक तर माजघरात दडत किंवा काम, अभ्यासाचा बहाना करत.
(क्रमश:)
commonsense
कुत्र्यामुळे सुसाईड नोट लिहून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या शहापूर: प्रतिनिधी 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला भटक्या श्वानानं…
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…