आरोग्यदायी की घातक?
आजच्या शिक्षणविश्वात स्पर्धा हा शब्द प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात खोलवर रुजला आहे. शाळेत प्रवेश घेतल्यापासून ते उच्च शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत प्रत्येक पायरीवर विद्यार्थी एका अदृश्य शर्यतीचा भाग बनतो. गुण, रँक, प्रवेश परीक्षा आणि नोकरीची धावपळ. या सगळ्यातून स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या विचारसरणीचा अविभाज्य भाग झाली आहे; परंतु प्रश्न असा आहे की, ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आरोग्यदायी ठरत आहे, का ती त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तोडत चालली आहे?

स्पर्धेचा सकारात्मक पैलू म्हणजे ती विद्यार्थ्यांमध्ये मेहनत, ध्येयवेड आणि आत्मविश्वास वाढवते. आरोग्यदायी स्पर्धेमुळे विद्यार्थी आपली क्षमता ओळखतो. आपले ध्येय निश्चित करतो आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. अशा स्पर्धेमुळे शिस्त, वेळेचे नियोजन आणि कार्यक्षमतेचा विकास होतो. अनेकदा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील यशाचा पाया या स्पर्धात्मक भावनेतूनच घातला जातो. उदाहरणार्थ शालेय पातळीवर विज्ञान प्रदर्शन, वादविवाद स्पर्धा किंवा क्रीडा स्पर्धा. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा शोध घेण्यास प्रेरित करतात. अशा प्रसंगांत स्पर्धा ही प्रगतीची जननी ठरते.
दुसरीकडे, स्पर्धेचा अतिरेक हा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. जेव्हा गुण आणि रँकच यशाचे एकमेव मापदंड ठरतात, तेव्हा विद्यार्थ्यांची ओळख त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नव्हे, तर त्यांच्या मार्कांवर ठरते. त्यामुळे मी कोण? या मूलभूत प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी स्वतःकडे शोधू शकत नाही. अशा परिस्थितीत अपयशाचे ओझे सहन न होणे, नैराश्य, आत्मविश्वास हरवणे आणि कधीकधी आत्महत्येसारख्या टोकाच्या घटना घडतात. हे फक्त आकड्यांचे नव्हे, तर मूल्यांचे पतन आहे.
स्पर्धेचे दडपण अनेकदा घरातूनच सुरू होते. पालकांची अपेक्षा, समाजाची तुलना आणि शिक्षकांचा निकालावर आधारित दृष्टिकोन- या सर्व घटकांमुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक मानसिक भार येतो. शेजार्याच्या मुलाला इतके गुण मिळाले, मग तू मागे का? हा एकच प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात अपुरेपणाची भावना निर्माण करतो. तेव्हाच आरोग्यदायी स्पर्धा घातक बनते. विद्यार्थी स्वतःशी स्पर्धा करण्याऐवजी इतरांशी तुलना करायला लागतो. या प्रक्रियेत तो आपल्या स्वतंत्र विचारसरणीपासून दूर जातो.
शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक वृत्तीला दिशादर्शक बनवायला हवे. उदाहरणार्थ, केवळ पहिला नंबर मिळवणार्याचाच गौरव न करता प्रयत्नशील विद्यार्थ्यांनाही समान सन्मान दिला, तर विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता वाढेल.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करून त्यांना तू मागे नाहीस, फक्त तुझा मार्ग वेगळा आहे, असा आत्मविश्वास द्यायला हवा. यामुळे स्पर्धा ही भय नसून प्रेरणा ठरेल.
स्पर्धा नष्ट करणे हा उपाय नाही, पण तिचा संतुलित वापर करणे हेच खरे शिक्षण आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला दडपण न समजता ती स्वतःच्या प्रगतीसाठी साधन म्हणून वापरली, तर ती निश्चितच आरोग्यदायी ठरेल. यश म्हणजे इतरांवर विजय नव्हे, तर
स्वतःवरचा विजय हा विचार प्रत्येक विद्यार्थ्याने स्वीकारला, तर स्पर्धा ही त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्रोत बनेल आणि घातकतेपासून मुक्त होईल.
शेवटी, शिक्षण हे केवळ परीक्षेपुरते नसून, आयुष्य जगण्याची कला शिकवणारे साधन आहे. म्हणून स्पर्धा ही शिक्षणाचा एक भाग असली, तरी ती विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर सावली बनू नये. आरोग्यदायी स्पर्धा ही प्रगतीचा पाया असते, पण तिचा अतिरेक विनाशाकडे नेतो. म्हणूनच शिक्षणसंस्था, पालक आणि समाजाने मिळून विद्यार्थ्यांना अशी संस्कृती दिली पाहिजे की, जिथे स्पर्धा ही एक प्रेरणा असेल, भीती नव्हे आणि तेव्हाच आपले विद्यार्थी खर्या अर्थाने यशस्वी होतील.