काँग्रेसला शहाणपण सुचेना!

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या बिहार राज्यात काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. 243 सदस्यांच्या विधानसभेत 19 वरून केवळ सहा जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले. राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या व इतर पक्षांच्या महागठबंधनमध्ये काँग्रेसचा समावेश नसता, तर सहा जागादेखील मिळाल्या नसत्या. दिवसेंदिवस देशात काँग्रेसची घसरण होत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने मित्रपक्षांना जपले पाहिजे, पण मित्रपक्षांना वेठीस धरण्याची काँग्रेसला सवय लागली आहे. बिहारमध्येही काँग्रेसने मित्रपक्षांना वेठीस धरले होते.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने जागावाटपावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इतर लहान पक्षांची कोंडी केली होती. आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची गरज असताना काँग्रेसने वेगळीच भूमिका घेतली आहे. भाजपाशी दोन हात करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत असताना, काँग्रेसने मनसेशी हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी मुंबई महानगरपालिका सर्वांत महत्त्वाची आहे. भाजपाचा याच महापालिकेवर डोळा असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून मुंबईला केंद्रशासित करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी वारंवार केलेला आहे.

अशा परिस्थितीत मुंबई भाजपाच्या हातात जाऊ नये म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत असतील, तर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत येणार असेल, तर काँग्रेसला अडचण होत आहे. राज ठाकरेंमुळे आपला उत्तर भारतीय व अल्पसंख्याक मतदार दूर जाण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. 403 सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे केवळ दोन आमदार आहेत. 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत काँग्रेसकडे केवळ सहा आमदार आहेत. अल्पसंख्याक मतदारांनी काँग्रेसकडे पाठ करून एआयएमआयएम आणि समाजवादी पक्षाची कास धरली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षणीय असताना काँग्रेसचे आमदार नगण्य आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी व रायबरेली हे दोन मतदारसंच काँग्रेसकडे आहेत.

कधीकाळी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देणारे राज ठाकरे हे आता भाजपाच्या विरोधात कणखरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी कडवट हिंदुत्व सौम्य केले असून, उत्तर भारतीयांच्या विरोधातही ते सौम्य झाले आहेत. मतचोरी आणि मतदार याद्यांच्या घोळाबाबत राहुल गांधी व राज ठाकरे यांची भूमिका समान आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला राज ठाकरे का नकोत, हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेश नेतृत्वालाही डावलले आहे.

ज्या भाजपाने देशभरातून काँग्रेसला हद्दपार करण्याचा संकल्प 2014 साली केला, त्याच भाजपाच्या विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी करण्याचे शहाणपण काँग्रेसला काही सुचत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून तळागाळात आपली पाळेमुळे मजबूत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न विफल करायचा असेल, तर काँग्रेसने भाजपा विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पण महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाला तसे शहाणपण सुचेनासे झाले आहे.

महाविकास आघाडीसोबत मनसेची युती झाल्यास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून वर्तुळात रंगलेली आहे. असे असताना जिल्हास्तरावर युतीचा प्रस्तावच नाही. त्यात काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची अखेरची बैठक गुरुवारी (दि. 13 नोव्हेंबर) झाली. मनसेसोबत युती नाहीच, असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला वेळ असूनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर ठरवू, असे सपकाळ यांनी म्हटले. कोणताही निर्णय लवकर घ्यायचा नाही किंवा निर्णय प्रक्रिया लांबवत न्यायची, ही काँग्रेसची खासियत आहे. राज्य निवडणूक मंडळाच्या दोन दिवस स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांशी चर्चा करून आघाडी करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांत वंचित बहुजन आघाडी, शेकाप, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी यांच्याशी आघाडी झालेली आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

पण मुंबईत मनसेला बरोबर घेतले आणि उद्धव ठाकरे बरोबर असतील, तर राज्यभरात सकारात्मक परिणाम दिसू शकतो. याचा विचार करायला काँग्रेस तयार नाही. पण काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी एकत्रित येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसे संकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून वेळोवेळी दिलेले आहेत. दोन्ही भावांच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याचे ठरत असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने हा निर्णय ठाकरे बंधूंसाठी धक्का आहे. पहिल्यापासूनच काँग्रेसने मनसेला एकत्र येण्यास विरोध दर्शविलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच मनसेला सोबत घेण्यास विरोध केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस स्वबळावर लढणार असेल, तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपाशी दोन हात करण्यास सज्ज होतील. गरज पडली, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि इतरांना बरोबर घेतील. पण काँग्रेेसला दूर सारतील. मुंबईत भाजपा किंवा महायुतीने यश मिळविले, तर काँग्रेसला हात चोळत बसावे लागेल. पण महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेसलाच दोष देतील. बिहारमध्ये दिला जात आहे तसा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *