गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी
♦ नांदूर-दसक येथे एक
♦ दसक येथे एक
♦ नंदिनी नदी संगमावर एक
♦ ओढा येथे एक
♦ तपोवनात कपिला संगम येथे एक
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात अमृत स्नानाच्या दिवशी सुमारे एक कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज असल्याने त्याद़ृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गर्दी वाढल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ होऊ नये, याकरिता प्रशासन कमालीची खबरदारी घेत आहे. दरम्यान, रामकुंडावरच भाविकांची गर्दी होऊ नये, याकरिता आणखी पाच घाट उभारण्यात येणार असून, पाटबंधारे विभागाद्वारे सदर काम केले जाणार आहे.
सिंहस्थ प्राधिकरण प्रमुख प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक झाली. पाटबंधारे विभागाकडून चार घाट बांधले जाणार असून, या घाटांपर्यंत भाविकांना आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. तर नव्याने ज्या घाटांची निर्मिती केली जाणार आहे. व 2015 मध्ये घाट बांधले आहेत. तेथे भाविकांना घेऊन जाण्यासाठी पोलिस प्रशासनाला नियोजन करावे लागेल. महापालिकेच्या बांधकाम विभागाला सदर घाटांपर्यंत चांगले रस्तेनिर्मिती करावी लागणार आहे. त्याद़ृष्टीने सदर बैठकीत कोणती जबाबदारी कोणत्या विभागाकडे असेल. याबाबतचे नियोजन करण्यात आले. भाविकांना शहरात येण्यापासून रोखू नका, अशा सूचना यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे शहरात अमृत स्नानाच्या दिवशी मोठी गर्दी होणार आहे. मात्र, खूपच गर्दी झाल्यास अशावेळी पर्यायी व्यवस्था असावी, यासाठी प्राधिकरण प्लॅनिंग तयार करून ठेवणार आहे. पाटबंधारे विभाग वास्तुविशारदाच्या माध्यमातून आकर्षक घाट उभारणार आहे.
त्र्यंबकला 5 किमीचा घाट
त्र्यंबक येथे गोदावरी नदीवर समोरासमोर प्रत्येकी अडीच कि.मी. असा तब्बल पाच किमी घाटांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे भाविकांची सोय होईल. लवकरच याबाबतचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू केले जाईल.