दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन
नाशिक जिल्हातील बांधकाम कामगारांचाही सहभाग
नाशिक : प्रतिनिधी
आयटक संलग्न संघटनांच्या महासंघाच्या अंतर्गत दिल्ली येथील जंतरमंतर येथे संपूर्ण भारतातील २५ हून अधिक राज्यातील बांधकाम कामगारांनी भव्य धरणे आंदोलन केले. यात नाशिक जिल्ह्यातील बांधकाम कामगार व संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कामगार आणि रोजगार मंत्री के सुब्बारवन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यसभा खासदार के. संदोष कुमार, आयटक राष्ट्रीय सचिव वहिदा निजाम आणि रामकृष्ण पांडा यांनी मोर्चेक-यांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र क्षेत्रीय महासंघ आणि संघटनांच्या मंचाने पुकारलेल्या २० मे २०२५ रोजीच्या राष्ट्रीय सार्वत्रिक संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकचे राज्य कोषाध्यक्ष कॉम्रेड भिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील अनिल पठारे, कैलास मंजुळे, भिमा मेंगाळ, सुकदेव जोंधळे यांच्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यातील एकूण १५० हून अधिक कामगार राज्याध्यक्ष कॉम्रेड विजय बचाटे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर कामगार आयटक संघटनेचा प्रतिनिधी घेण्यात यावा, बांधकाम कामगाराला दरमहा सहा हजार रुपये पेन्शन यावी, देशभरात बांधकाम कामगार कल्याणकारी योजना एकसमान असावी, सर्व बांधकाम कामगारांना आरोग्याची इ.एस.आय.सी. योजना लागू करण्यात यावी. दरवर्षी सणासाठी बांधकाम कामगार अधिनियम २८१–अ नुसार कामगारांना दहा हजार रुपये सन्मानधन वितरित करण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.