माजी उपनगराध्यक्ष बाळू उगले यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन
सिन्नर ः प्रतिनिधी
शहर व परिसरात वदर्ळीच्या ठिकाणी भटके कुत्रे व मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून, वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला या मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. नगरपालिकेने यासंदर्भात कारवाई करून मोकाट जनावरांसह भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बाळू उगले यांनी मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी त्रिशुळी परिसरातील गायकवाड मळा येथे एक मुलगा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. शहर मुख्य रस्ते, बसस्टँड, संगमनेर नाका, गंगावेस, नाशिक वेस तसेच इतर उपनगर भागात मोठ्या संख्येने मोकाट जनावरे उच्छाद मांडत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतूक व नागरिकांना जाण्या-येण्यास अडचण निर्माण होत आहे.
मागील आठवड्यात कळवण येथील घटना पाहता आपल्याही भागात अशी घटना कोणत्याही क्षणी घडू शकेल. त्यामुळे या प्राण्यांपासून शहरातील नागरिकांना इजा होणार नाही, यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. यापुढे भटके कुत्रे व मोकाट जनावरांपासून मानवास इजा किंवा जिवित हानी झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार का धरू नये, तसेच वरील सर्व मोकाट जनावर व भटक्या कुत्र्यांपासून मनुष्यवध घडल्यास आपणावर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल उगले यांनी उपस्थित केला असून, भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी उगले यांनी केली आहे.