डॉ. भारती पवार यांच्या साक्षीने एचपीटीत अभिरुप संसदेत वादळी चर्चा
नाशिक: प्रतिनिधी
लोकसंख्येला आळा घालण्यासाठी वादग्रस्त ठरलेले ‘पॉप्युलेशन रेग्युलेशन अँड जनसंख्या अवरोधा’ म्हणजे ‘प्रजा’
विधेयक शनिवारी लोकसभेत मंजूर करुन राज्यसभेत पाठविण्यात आले. एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाच्या शतकपूर्तीपूर्व महोत्सवानिमित्त राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या अभिरुप संसदेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे महासंचालक तथा सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या उपस्थितीत या विधेयकावर वादळी चर्चा झाली.
प्रजा विधेयकात धार्मिक अल्पसंख्याकांच्या बाबतीत असलेल्या तरतुदीला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेऊन विधेयक मागे घेण्याची मागणी केली. यानिमित्ताने आरक्षण, भारतातील जाती, ट्रान्सजेंडर, आदिवासी इत्यादी घटकांच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या. दोन्ही बाजूंकडून ‘शेम शेम’ असा उच्चार होत असताना आपण लोकसभेचे कामकाज पाहत असल्याचा भास उपस्थितांना झाला. शेवटी बहुमताच्या जोरावर सरकार पक्षाने विधेयक मंजूर करुन घेतले.
या अभिरुप संसदेत लोकसभा अध्यक्षांची भूमिका श्लोक सानप याने बजावली. पंतप्रधान- श्वेता पाटील, गृहमंत्री-विवेक सोनवणे, विरोधी पक्षनेते-प्रशांत शिखरे यांनी भूमिका बजावल्या. याशिवाय मंत्री आणि संसद सदस्य म्हणून यज्ञेश मांडे, कार्तिकी बर्डे, शिखा विश्वकर्मा, अजिंक्य जगदाळे, सुमेध उबाळे, जय नाईक, अपूर्वा चौधरी, श्रीधर जोशी, धनश्री चव्हाण, श्रेया कुलकर्णी, शामल भोर, धनश्री चव्हाण, दीपिका माळोदे, वैष्णवी गायकवाड, रेणुका श्रीमानवर, आकांशा डोरले, तिषा पाठक, प्रतीक दौडे, राजेश्वरी पाटील, उमैमा बागवाला, समृध्दी पाटील, दिया माळोदे, अमेय आचार्य, अक्षदा देवरे आदींनी काम पाहिले. प्रास्तविक प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यश पवार याने केले.
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या अभिरुप संसदेचे कामकाज पाहून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार भारावून गेल्या. हे अभिरुप संसद विद्यार्थी आणि युवकांना लोकशाहीचे प्रशिक्षण देणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अभिरुप संसदेच्या टीमला संसदेचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्यासाठी दिल्लीला येण्याचे निमंत्रण त्यांनी देऊन सर्व व्यवस्था करण्याचा शब्द दिला. आपल्षा राज्यघटना आणि लोकशाहीचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. सरकारी योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
राज्यशास्त्र विभागाचे प्रमु़ख डॉ. प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हरेश खैरनार यांनी अभिरुप संसदेचा आराखडा तयार केला. त्यांना डॉ. संजय आहिरे, डॉ. गणेश गिरी, डॉ. अशोक वसावे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागाच्या असामान्य माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत पवार, गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, एम. डी. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. आनंद खलाणे आदी उपस्थित होते.