नाशिक बाजार समितीत 12 कोटींहून अधिक भ्रष्टाचार

माजी सभापती देवीदास पिंगळे यांचा गंभीर आरोप

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक बाजार समितीत सत्तांतर झाल्यानंतर नऊ महिन्यांत तब्बल 12 कोटींहून अधिक भ्रष्टाचार झाला आहे. सभापती चुंभळे कुटुंबीयांसह उपसभापती आणि काही संचालक रोज बाजार समितीत ठाण मांडत लाखोंची माया जमवत आहेत. त्यामुळे नाशिक बाजार समिती लवकर जिल्हा बँकेसारखी डबघाईस जाईल, अशी भीती व्यक्त करत याबाबत मुख्यमंत्र्यांसह शासनाकडे कारवाईची मागणी केली असल्याचे माजी सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी सांगितले.
पिंगळे म्हणाले की, कर्मचार्‍यांना दिवाळीत दोन पगार दिले. परंतु, त्यातील एक पगार संचालक मंडळाने काढून घेतला. सहाव्या वेतन आयोगातील 1.20 कोटी रक्कम कर्मचार्‍यांकडून वसूल करून घेतली. अडत्या असलेल्या नवसाद फारुकी हा सव्वादोन कोटी घेऊन फरार झाला आहे. त्याच्यावर बाजार समिती संचालक एवढे मेहेरबान का? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. चारही बाजूंनी बाजार समिती पोखरण्याचे काम सुरू आहे. माजी सचिव अरुण काळे यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी 50 लाख रुपयांची डील झाली आहे.
त्यांच्यावर एफआयआर दाखल असतानाही संचालक मंडळ दिशाभूल करत आहेत. स्थगिती असताना अनुकंपाधारकांकडून 45 लाख रुपये घेतले आहेत.
एका ठेकेदाराकडून काम सुरू होण्यापूर्वी एक कोटीची मागणी केली असल्याची तक्रार त्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली आहे. अशा अनेक प्रकरणांहून समिती पोखरण्याचे काम सुरू असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

पिंगळेंचे आरोप बिनबुडाचे!
बाजार समितीचे सूत्र हातात घेण्यापूर्वी माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी अंशदान भरलेले नव्हते. कर्मचार्‍यांचा पीएफसुद्धा भरलेला नव्हता तर जीएसटीदेखील भरलेला नव्हता. तो आम्ही सूत्र हाती घेतल्यानंतर भरला. कर्मचार्‍यांच्या पगारालासुद्धा पैसे नव्हते. आम्ही ते बाजार फी वसुली करून भरले. त्यानंतर चार-पाच महिन्यांतच साडेचार ते पाच कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट केले आहेत ते कसे, हे तरी पिंगळेंना कळायला पाहिजे. सत्ता गेल्यानंतर त्यांची मानसिकता बिघडत चालली आहे. जिल्हा बँक त्यांच्याच काळात बुडाली. आता त्यांना बाजार समिती डबघाईस आणायची राहिली. पण, आम्ही ते होऊ देणार नाही. शेतकर्‍यांची असलेली बाजार समिती ही शेतकर्‍यांच्या हितासाठीच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता गेल्यानंतर त्यांना काही सूचत नसल्याने पिंगळे बिनबुडाचे आरोप करत आहेत.
-शिवाजी चुंभळे, माजी सभापती, नाशिक बाजार समिती

गिरणारे, शिंदे येथील जागेकडे दुर्लक्ष

गिरणारे, शिंदे येथे बाजार समितीच्या जागेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. त्या ठिकाणी स्वस्तात जमीन मिळत होती. परंतु, संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन हातून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *