प्रजासत्ताक दिनावरील आतंकवादाचे सावट ही गंभीर बाब

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह काही शहरांवर आतंकवादी आक्रमणांचा धोका वाढल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे.
खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि बांगलादेशातील आतंकवादी गट भारताच्या प्रजासत्ताकदिनी देशातील प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याच्या सिद्धतेत असल्याचे गुप्तचर विभागाने सांगितले आहे. गेल्या काही वर्षांत देशात साजरे होणारे राष्ट्रीय सण आणि हिंदूंचे धार्मिक उत्सव आतंकवाद्यांच्या नेहमीच रडारवर असतात. आतंकवादाच्या सावटाखाली सण-उत्सव साजरा करणारा भारत हा जगातील एकमेव देश असावा. स्वातंत्र्यानंतर देशाची दीर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसने भारतात दहशतवादाला खतपाणी घातल्याचा आरोप विद्यमान सरकार सातत्याने करत आले आहे. मात्र, मागील 11 वर्षांहून अधिक काळ देशाची सत्ता उपभोगणार्‍या वर्तमानातील सरकारलाही देशावरील दहशतवादी हल्ले थोपवता आले नाहीत, हे सत्य नाकारून चालणार नाही. इस्लामी दहशतवादाने आज सारे जग त्रस्त आहे. मात्र, इस्त्रायल, चीन, अमेरिका यांसारख्या राष्ट्रांनी दहशतवादाला जशास तसे उत्तर देऊन दहशतवादाचा चांगलाच बीमोड केला.
आतंकवादाला पोसणार्‍या देशातील शक्तींवर या देशांनी कठोर निर्बंध घातले आहेत. चहूबाजूंनी शत्रुराष्ट्रांनी घेरलेले असतानाही इस्रायलसारखा इवलासा देश आतंकवादाला पुरून उरला आहे. आपल्या देशात आतंकवादी हल्ला करणार्‍या आतंकवाद्यांचे अड्डे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अमेरिका आपले सैन्य घुसवून त्यांचा नायनाट करते, मग ते अड्डे अन्य कोणत्याही देशात का असेनात. याउलट भारताच्या सीमेवरून आतंकवादी देशात घुसतात, इथल्या जिहादी धर्मांधांना शस्त्र पुरवून त्याचे रीतसर प्रशिक्षण देतात, इथले काही देशद्रोही नागरिक त्यांना आश्रय देतात, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात, त्यांना त्यांच्या कारवायांत मदत करतात, इथलेच देशद्रोही जिहादी भारतात आतंक माजवण्यासाठो स्लीपर सेल म्हणून काम करतात.
पहलगाममध्ये झालेला रक्तपात, दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेला शक्तिशाली स्फोट ही हल्लीचीच दोन उदाहरणे. अशा घटना घडल्या की, काही दिवस शोक व्यक्त केला जातो. निषेध, मोर्चे काढले जातात. वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्रे घडतात. सरकारकडून कठोर प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले जाते. कालांतराने या सर्व घटना नागरिकांच्या विस्मरणात जातात. ज्या बांगलादेशाला भारताने स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच बांगलादेशात आज हिंदूंना वेचून ठार केले जात आहे. जिवंत जाळले जात आहे. हिंदू स्त्रियांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंची घरे, दुकाने फोडली आणि जाळली जात आहेत. हिंदूंची शक्तिस्थाने असलेल्या मंदिरांवर आक्रमणे करून ती भ्रष्ट केली जात आहेत. त्यांची तोडफोड केली जात आहे. मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली जात आहे. हे मागील एक वर्षाहून अधिक काळापासून अविरत सुरू असताना भारत सरकार मात्र त्यावर काहीच कारवाई करताना दिसत नाही. याच बांगलादेशातील नागरिकांनी आज भारतात घुसखोरी केली असून, अनेक शहरे बकाल केली आहेत.
भारतात येऊन शासकीय कागदपत्रे बनवली आहेत. नोकर्‍या मिळवल्या आहेत. व्यवसाय थाटले आहेत. अवैध वस्त्या वसवल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी, दरोडे, चोर्‍या, खून, बलात्कार, अपहरण, दंगल घडवणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आज बांगलादेशी मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. पूर्वी केवळ शहरी भागांत सापडणारे बांगलादेशी आज देशातील खेड्यापाड्यांमध्येही दिसू लागले आहेत. देशात झालेल्या घुसखोरीची विषारी फळे आज इंग्लंड, फ्रान्ससारखी बलाढ्य राष्ट्रे भोगत आहेत. ज्या देशाचे मीठ खातात त्या देशाशी यांचे काहीही देणेघेणे नसते. त्यामुळे हेच घुसखोर आतंकवाद्यांना सहाय्य करतात.

Countering terrorism on Republic Day is a serious matter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *