विधिसंघर्षित बालकासह चुलत्याचा कारनामा उघडकीस

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर व ग्रामीण भागात मोटरसायकली चोरी करणार्‍या विधिसंघर्षित बालकाचा आणि त्याच्या चुलत्याचा कारनामा उघडकीस आला आहे. उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने सापळा रचून कारवाई केली असता हा प्रकार समोर आला. कारवाईत सुमारे तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बालक पोलिसांच्या ताब्यात आहे. चुलता मात्र फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
शहरात दिवसेंदिवस वाढणार्‍या मोटारसायकल चोरी व चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्टॉप अँड सर्च, नाकाबंदी आणि टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त किशोर काळे, नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने ही कारवाई केली.
उपनगर पोलिस ठाण्यात दाखल मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना हवालदार संदीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस
अंमलदार जयंत शिंदे आणि त्यांच्या पथकाने वडनेर परिसरात सापळा रचून एका संशयिताला पकडले. चौकशीत तो विधिसंघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने आपल्या चुलत्यासह नाशिक शहर व ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, मुंबईनाका, घोटी व इगतपुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी गेलेल्या नऊ मोटारसायकल जप्त केल्या. काही मोटारसायकल आधीच विक्रीस केल्याची व काही विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहितीही संशयिताने दिली आहे.
संशयित सलीम हुसेन पठाण सध्या फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. विधीसंघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास हवालदार संदीप पवार करत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोनि. संजीव फुलपगारे, पोउनि. प्रभाकर सोनवणे, विनोद लखन, पोअं. जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, पंकज कर्पे, सुनील गायकवाड, सुरज गवळी, संदेश रघतवान व मयूरी विझेकर यांनी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *