इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इगतपुरी : प्रतिनिधी
राजस्थानमधून मुंबईकडे शेळ्या नेणार्या दोन ट्रकचालकांकडून ऐंशी हजार रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तथाकथित गोरक्षक असलेल्या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अयुब नथू खान (रा. जोधपूर, राजस्थान) याने गोरक्षक सांगणार्या या तिघांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी मित्रांच्या मोबाईलवर प्रत्येकी 40 हजार रुपये असे 80 हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यासाठी धमकी देत मारहाण केल्याची फिर्याद दिली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, दि. 2 रोजी राजस्थानमधून मुंबईकडे जाणार्या ट्रकच्या (24- 5457) व (24- 7455) चालकांना इगतपुरी येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाका परिसरात ज्ञानेश्वर धोंडिराम पाटील, (रा. भिवंडी, ठाणे), प्रदीप सूर्यभान उपाध्याय (रा. भांडुप, मुंबई), राहुल बाबुलाल पाटील (रा. वडावली, आंबिवली, मुंबई) यातील तोतया पत्रकाराने अडवून या दोन ट्रकचालकांना मारहाण केली. शेळीची गाडी सोडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर प्रत्येकी 40 हजार रुपये असे 80 हजार रुपये ऑनलाइन घेतल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. याच दरम्यान याच ठिकाणी पुन्हा (19- 1091) व (19- 8317) या दोन ट्रकमधून मुंबईच्या दिशेने जाणार्या अयुब नथू खानन व आयुब इमान दीन (दोघे रा. राजस्थान) या ट्रकचालकांना या तिघांनी अडवून एक लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. मात्र, संबंधित ट्रकचालकांनी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने या तिघांपैकी ज्ञानेश्वर धोंंडिराम पाटील (रा. भिवंडी, ठाणे) याने 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही ट्रक इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले. या दोन्ही ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त जवळपास 557 शेळ्या आढळल्याने या दोन ट्रकचालकांवर शेळ्यांची निर्दयतेने वाहतूक केली म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर यातील सर्व शेळ्या मुरबाड येथील पांजरपोळ येथे दाखल करण्यात आल्या. दोन्ही ट्रक इगतपुरी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहेत.
खंडणी गुन्ह्यातील ज्ञानेश्वर धोंडिराम पाटील, प्रदीप सूर्यभान उपाध्याय, राहुल बाबुलाल पाटील या तिघा संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजणे, उपनिरीक्षक अमोल गायधनी, पोलीस हवालदार डी. बी. मोरे, ए. यू. मोरे आदी करीत आहेत.
टोलनाक्यावर वसुली
राज्यातून भिवंडी, ठाणे व मुंबई येथील देवनार कत्तलखान्यावर एका ट्रकमध्ये पावणेेतीनशे ते तीनशे शेळ्या कोंबून निर्दयतेने शेकडो ट्रक वाहतूक करत असतात. याचाच फायदा घेऊन अनेक जण स्वतःला गोरक्षक सांगून महामार्गावरील प्रत्येक टोलनाक्यावर या ट्रकचालकांकडून हजारो रुपये वसूल करतात. यातील काही तोतया पत्रकार व यू-ट्यूबचे पत्रकार असल्याचे सांगत काहींनी हप्ता बांधून घेतल्याची चर्चा आहे.
ट्रक सोडून देण्यासाठी पोलिसांवर दबाव
इगतपुरी पोलीस ठाण्यात आणलेल्या दोन ट्रक सोडून देण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी अनेक आमदार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व तोतया पत्रकार यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव आपल्या भूमिकेवर ठाम राहून ट्रकचालक व खंडणी मागणार्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Cow vigilantes took a ransom of Rs 80,000 from truck drivers