मुख्यमंत्री : 5568 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन : सुरक्षित सिंहस्थाचे आव्हान
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा भव्यदिव्य होणार आहे. विशेष म्हणजे, येणारा सिंहस्थ म्हणजे 75 वर्षांनी त्रिखंड योग असणार आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकमध्ये तब्बल 28 महिने पर्व असून, 40 ते 42 अमृतस्नानाचे पर्व असणार आहेत. प्रयागराजचा महाकुंभ पाहता नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मांदियाळी होणार आहे. गतवेळेपेक्षा पाचपटीने सिंहस्थात भाविक अमृतस्नानासाठी येणार आहेत. त्यासाठीच सुरक्षित सिंहस्थ होण्यासाठी 25 हजार कोटींची विविध कामे होणार आहेत. होणार्या कामांमुळे आधुनिक नाशिकची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिक-त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 5657 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठक्कर ग्राउंड येथे झाले. यावेळी उपस्थित जनतेसमोर ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खा. डॉ. शोभा बच्छाव, आ. पंकज भुजबळ, दिलीप बनकर, मंगेश चव्हाण, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, सिंहस्थ आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, एनएमाअरडीए आयुक्त जलज शर्मा आदींसह उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, सिंहस्थ स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे आपल्या सर्वांसमोर आव्हान आहे. प्रयागराजला पंधरा हजार हेक्टर जागा अमृतस्नानासाठी आहे. मात्र, नाशिक-त्र्यंबक येथे साडेपाचशे एकर एवढ्या कमी जागेवर सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापनाची जबाबदारी असते. सिंहस्थासाठी कामे करताना जागेची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होईल मान्य आहे. परंतु, कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी शासन घेणार आहे. म्हणूनच नाशिक व त्र्यंबक येथील नागरिकांची मदत होत असल्याचे फडणवीसांनी म्हटले. दर बारा वर्षांनी सिंहस्थ होत असल्याने राज्य व केंद्राकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 25 हजार कोटींची कामे होणार असून, त्यापैकी आज साडेपाच हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करत असल्याचे त्यांनी म्हटले.
कारवाईच्या भीतीने गुंड खाटू श्याम, काश्मीरला पळाले : मंत्री महाजन
शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून कारवाई सुरू आहे. सिंहस्थ सुरक्षित पार पाडण्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आहे. शहरात कायद्याची कारवाई सुरू झाल्यापासून गुंड थेट खाटू श्याम, जम्मू-काश्मीरला पळाले असल्याचे कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले तसेच गुन्हेगारांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे. स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलिस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.
पर्यटन व तीर्थाटन म्हणून ओळख
पुढील पंचवीस वर्षांचे नियोजन सिंहस्थ कामांद्वारे होणार आहे. नाशिक हे असं ठिकाण आहे, जेथे प्रभू श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांचा सर्वाधिक वास्तव्य येथेच होते.
विकासकामांमुळे शहराचा चेहरा बदलेल ः उपमुख्यमंत्री
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार्या विकासकामांमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे होत असलेली विकासकामे भविष्यात शहरासाठी विकासबिंदू ठरतील. सिंहस्थासाठी येणार्या लाखो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून, शासनासमोर मोठे आव्हान असेल. परंतु, योग्य नियोजनाने या परीक्षेत आपण नक्कीच पास होऊ, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नाशिक-त्र्यंबक सिंहस्थ कुंभमेळा कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित जनतेला संबोधित करताना बोलत होते.
साधू-महंतांसाठी विशेष आसनव्यवस्था
प्रारंभी कार्यक्रमस्थळी देशभक्तिपर गीते लावण्यात आली. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. साधू-महंत बारा ते साडेबारा वाजेपासून कार्यक्रमस्थळी हजर, प्रत्यक्षात कार्यक्रमास 2 वाजून 20 मिनिटांनी सुरुवात झाली.