सिडको : विशेष प्रतिनिधी
छायानिवास परिसरातील हॉटेल व्यावसायिकास दमदाटी करून खंडणी मागणार्या चौघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक दिनेश दिलीप दासवाणी (वय 40, रा. छायानिवास, एम. जी. रोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी दासवाणी आपले हॉटेल ‘किरण’ बंद करून घरी निघाले असताना, संशयित आरोपी राजू शेख व अजीम शेख, तसेच त्यांच्यासोबत असलेले अजून दोन साथीदार रिक्षा (एमएच 15- एके 5576)मधून घटनास्थळी आले. त्यांनी शिवीगाळ करत, ‘आम्ही नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे भाई आहोत,‘असे म्हणत दमदाटी केली. त्यांपैकी आरोपी अजीम शेख याने हातातील धारदार लोखंडी शस्त्र दाखवून ‘तुम्हाला या परिसरात व्यवसाय करायचा असेल तर दहा हजार रुपये हप्ता द्या,‘ अशी धमकी दिली. ‘आज वाचलात, पुढच्या वेळी जीव घेतला जाईल,‘ असे म्हणत दहशत निर्माण केली व सर्वजण निघून गेले. या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक शिंदे व माळी करीत आहेत.