पुणे :
विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने काल दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण टप्पा पार केला. सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला.
माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी 2 वाजता वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला.
वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा
आणिक मी देवा काही नेणे
गाये नाचे उडे आपुलीया छंदे मनाच्या आवडीने
असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माउली.. माउली.. हा अखंड जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट चढून पालखीने सायंकाळी 6.15 वा. पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथील माऊलींच्या विसावा तळावर माऊलींची पालखी विसावली. या वेळी संध्याछाया दिवेघाट परिसरावर पडली होती. यावेळी झेंडेवाडी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी माऊलींचे प्रचंड गर्दीत दर्शन घेतले घेतले. माऊलींच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव, युवानेते बाबाराजे जाधवराव,माजी आमदार अशोक टेकवडे उपस्थित होते.