नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. (छायाचित्रे : रविकांत ताम्हणकर)
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाचा अखेरच्या सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. रविवारी सायंकाळपासूनच शहरात भक्तांचा ओघ वाढला तो सोमवार दुपारपर्यंत कायम राहिल्याचे दिसले. रविवारी रात्रीपासून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला जाणारे भाविक वाद्य वाजवत, शंखनाद करत वाटचाल करत होते. नव्याने कावड घेऊन प्रदक्षिणा करण्याचा ट्रेंडदेखील निर्माण झाला आहे. उत्तर भारतीयांत प्रचलित असलेली कावड यात्रा आता त्र्यंबकेश्वर येथेही रूढ होत असल्याचे या श्रावणात प्रकर्षाने जाणवले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी पहाटे तीनपासून भाविकांनी रांगा
त्र्यंबकेश्वर ः मंदिराच्या गर्भगृहात नित्य प्रदोष पुष्प पूजक अॅड. शुभम आराधी यांनी साकारलेली आकर्षक शृंगार पूजा.
त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पहाटे तीनपासून रांगा लावल्या होत्या. दोनशे रुपये दर्शन सुरू होते. मात्र कुशावर्तावर असलेली 200 रुपये तिकीट खिडकी बंद ठेवली होती. भाविकांची दर्शनबारी थेट बडा उदासीन आखाड्याच्या पलीकडे पोहोचली होती. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि ब्रह्मगिरी पर्वत गोदावरी दर्शनासाठी हजारो भाविकांनी लावलेली हजेरी या सोमवारचे वैशिष्ट्य ठरले आहे. कुशावर्तावर पालखीच्या वेळेसदेखील भरपावसात भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मंदिरात परत आली तेव्हा गर्भगृहात नित्य प्रदोष पुष्प पूजक अॅॅड. शुभम आराधी यांनी आकर्षक शृंगारपूजा केली होती. भाविकांना प्रसन्न दर्शन घडले.
त्र्यंबकेश्वर : कुशावर्तावर भरपावसात भाविकांची झालेली गर्दी.