भाजपच्या बालेकिल्ल्यात आता काय होणार याची उत्सुकता

लक्ष्यवेध : प्रभाग-20

राजकीय परिस्थिती बदलली; उमेदवारीवरून गटबाजीची शक्यता

नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 20 हा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सन 2017 च्या निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकून प्रभागातील वर्चस्व अधिक घट्ट केले होते. माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, संगीता गायकवाड, डॉ. सीमा ताजणेे, अंबादास पगारे यांनी निवडणुका जिंकत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली; परंतु आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रभागातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भाजपचा बालेकिल्ला यावेळी टिकणार का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
प्रभाग 20 हा शहरातील सर्वांत सुशिक्षित, संवेदनशील आणि महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. येथे मध्यवर्ती कारागृह, भारतीय प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय, विभागीय आयुक्तालय, महत्त्वाच्या बँका, सरकारी वसाहती, तसेच नामांकित शाळा-महाविद्यालये असल्याने या प्रभागातील मतदार जागरूक आणि विकासाभिमुख आहेत. त्यामुळे येथे मतदानाचा कल राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक प्रश्न, कामगिरी व जनसंपर्कानुसार ठरतो.
गेल्या पाच वर्षांत प्रभागातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह माजी मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला. त्यांच्या समर्थकांपैकी मोठा वर्ग शिवसेनेकडे वळल्याने भाजपची पारंपरिक मतसंख्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय भाजपमधील काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असून, उमेदवारीवरून गटबाजी वाढल्याच्या चर्चा आहेत. प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे संभाजी मोरुस्कर, डॉ. सीमा ताजणे आणि अंबादास पगारे हे मतदारांसमोर मताचा जोगवा मागण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भाजपसमोर अंतर्गत नाराजीवरून एकत्रित ताकद दाखवण्याचे मोठे आव्हान आहे.
दरम्यान, प्रभागात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने लढण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, सुनीता गायकवाड अश्विन पवार, ज्योती गोडसे ही नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, 2017 मध्ये अल्प फरकाने पराभूत झालेल्या योगिता गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षांत सतत जनसंपर्क ठेवून प्रभागात स्वतःची मजबूत पकड तयार केली आहे. शिवसेनेकडून सुप्रिया गणेश कदम आणि दुर्गा नितीन चिडे या उमेदवारांची नावे आघाडीवर असून, दोन्ही गट स्वतंत्रपणे लढल्यास मतविभाजनाची शक्यता आहे. तसेच बालाजी देवस्थानचे संस्थापक कैलास मुदलियार हेदेखील यावेळेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. प्रभागात त्यांचा चांगला जनसंपर्क असून, धार्मिक कार्यक्रम प्रभागात ते नेहमीच घेत असतात. ज्येष्ठ नागरिकांचा कल त्यांच्याकडे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटही स्वतंत्र रणनीती आखत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून निवृत्ती अरिंगळे हे मुख्य दावेदार मानले जात असून, स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता असल्याचे कार्यकर्ते सांगतात. शरद पवार गट संघटन मजबूत करण्यावर भर देत असून, योग्य वेळी उमेदवारी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. मनसेही या प्रभागात आपला टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अ‍ॅड. नितीन पंडित निवडणूक लढण्यास तयार आहेत. रिपाइंचाही स्वतंत्र लढतीचा संकेत असून, त्यामुळे प्रभागातील लढती चुरशीच्या होणार, हे निश्चित आहे.

प्रभागात झालेली कामे

• अटल ज्ञान संकुल (ई) अभ्यासिका.
• नाट्यगृहाची जागा मनपाच्या ताब्यात.
• गांधीनगर ते फिल्ट्रेशन प्लांट.
• नवीन रॉ वाटर वाहिनी मंजूर. काम अंतिम टप्प्यात.
• गायकवाड मळा, मनोहर गार्डन व प्रधाननगर येथे सामाजीक सभागृह उभारणी.
• सामाजिक संस्थांमार्फत कार्यान्वित, नाशिकरोड फिल्टरेशन प्लांट नूतनीकरण.
• नाशिकरोडमध्ये नवीन जलकुंभ उभारणी.

विद्यमान नगरसेवक

संभाजी मोरुस्कर

अंबादास पगारे

संगीता गायकवाड

सीमा ताजणेे

इच्छुक उमेदवार

निवृत्ती अरिंगळे, कैलास मुदलियार, नितीन चिडे, कांता सुरेश वराडे, गणेश कदम, अजित गायकवाड, विक्रम कदम, अ‍ॅड. नितीन पंडित, प्रमोद साखरे, राम कदम, अतुल धनवटे, सतीश निकम, विकास पगारे, बापू सापुते, तुषार दोंदे, आदित्य कुलकर्णी, रितेश केदारे, स्वप्नील कासार, विद्या बर्वे, प्रशांत वाघ, रामदास शेळके, दीपाली शांताराम घंटे, मंगल सुनील आडके, दुर्गा नितीन चिडे, सुप्रिया गणेश कदम, जयश्री गायकवाड, सुरेखा पेखळे, ज्योती चव्हाणके, सुरभि शेरताटे, मीरा आवारे.

2011 नुसार लोकसंख्या

• लोकसंख्या ः 44,765
• अनुसूचित जाती ः 7,681
• अनुसूचित जमाती ः 1,677

स्थानिक समस्या

प्रभागातील सुशिक्षित मतदारांना अनेक स्थानिक समस्या भेडसावत आहेत. जिजामातानगर, साने गुरुजीनगर भागात कमी दाबाने किंवा दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. नाशिक-पुणे महामार्गावरील दत्त मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, उपनगर नाका हा रस्ता अपघातप्रवण झाला आहे. शिखरेवाडीतील क्रीडांगणाची दुरवस्था, बॅडमिंटन कोर्ट, वाढत्या चोर्‍या-घरफोड्या, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि जयभवानी रोड परिसरात वाढलेला बिबट्यांचा वावर यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याशिवाय प्रभागाच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करणारे नाट्यगृह वर्षानुवर्षे रखडले होते. मात्र, आता 30 कोटींची तरतूद झाल्याने त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रभाग 20 मधील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि गुंतागुंतीची होणार आहे.

सर्वच पक्षांत बंडखोरीची शक्यता

महायुतीतीलच मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहणार. भाजपमधील अंतर्गत नाराजी, शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजित गट आणि मनसेची तयारी हे सर्व घटक मतांचे विभाजन वाढवू शकतात. अनेक दावेदार असल्याने सर्वच पक्षांत बंडखोरीची शक्यता असून, बंडखोर उमेदवार निवडणुकीचे संपूर्ण चित्र बदलू शकतात. भाजपचा प्रभाव टिकणार की शिवसेना या बदलत्या समीकरणांतून सर्वो-त्तम संधी साधणार? राष्ट्रवादीचे दोन गट मिळून की वेगळे लढून काय चित्र उभे करणार? मनसे कितपत प्रभाव टाकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रभागातील सुशिक्षित आणि जागरूक मतदारांच्या निर्णयात दडलेली आहेत. त्यामुळे प्रभाग 20 ही नाशिक मनपा निवडणुकीतील सर्वाधिक रोचक आणि निर्णायक लढत ठरणार, यात शंका नाही.

प्रभागाचा परिसर

मध्यवर्ती कारागृह, कारागृह वसाहत, जिमखाना परिसर, प्रेस स्टाफ क्वॉर्टर्स, मेनगेट, नवले चाळ, आशानगर, विजयनगर, रामनगर, मोटवानी रोडलगतचा परिसर, शांती पार्क, साने गुरुजीनगर, चंद्रमणीनगर, अजंठानगर, शिखरेवाडी, नेहरूनगर वसाहत, सेंट झेवियर परिसर, आयशर इस्टेट, जेतवननगर, बिटको महाविद्यालय परिसर, के. जे. मेहता हायस्कूल परिसर, दत्त मंदिर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *