सजावटीच्या वस्तू, सांताक्लॉजचे कपडे, मुखवटे, लाल टोप्यांना मागणी

नाशिक : वैशाली लिलके
ख्रिसमस तथा नाताळ सण अवघ्या आठ दिवसांवर आला असतानाच बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. कॉलेज रोड, शालिमार, सिटी सेंटर मॉल, अशोक स्तंभ, वकीलवाडी या परिसरात ख्रिसमससाठी सजावटीच्या
लागणार्या वस्तूंची मोठी विक्री-खरेदी सुरू आहे. सजावटीच्या वस्तूंचे दरही वाढल्याने ग्राहकांची नाराजी दिसून येते. यावर्षी वस्तूंच्या किमती 20 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तरीही ग्राहकांचा खरेदीचा उत्साह मोठा आहे. मुलांसाठी सांताक्लॉजचे कपडे, मुखवटे, लाल टोपी, खेळणी व गिफ्टला मागणी वाढली आहे.
शाळांमध्ये होणार्या ख्रिसमस कार्यक्रमांमुळे पालकांकडून मुलांसाठी सजावटीच्या वस्तू, ड्रेस आणि बूट खरेदी केले जात आहे. कपड्यांच्या दुकानांमध्येही मोठी गर्दी दिसून येत आहे. महिलांसाठी सफेद, हिरवा, आणि लाल रंगाचे ड्रेस, टॉप्सला मागणी वाढली आहे. प्लम केक, जिंजरब्रेड कुकीज, फ्रुट केक्स आणि विविध मिठायांची खरेदी व तयार करणे, हा नाताळचा अविभाज्य भाग असतो. अजून दोन-तीन दिवसांत खरेदीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
नाताळ सण 25 डिसेंबरला असला, तरी 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच नाशिक शहरातील सर्व चर्चमध्ये कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. ख्रिसमस अर्थात, नाताळ सणाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. ख्रिस्ती बांधवांचा हा पवित्र सण मानला जातो. नाताळच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव सोहळा केला जातो. या सणाची लगबग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील चर्चच्या परिसरात पारंपरिक पद्धतीने येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा साकारला जाणार आहे. दरवर्षी नाताळनिमित्त अनोखा देखावा साकारत असतात. हा देखावा तयार करण्यासाठी जवळपास 15 दिवस लागतात.
चर्चमध्ये सजावट
हॉली क्रॉस चर्च, सेंट पॅट्रिक चर्च, बाळ येशू मंदिर (नाशिकरोड) यांसारख्या ठिकाणी आकर्षक रोषणाई व सजावट केली जाते. ख्रिश्चन बांधवांचा हा पवित्र सण मानला जातो. ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिले जाते. प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिस्तीधमीर्र्यांमध्ये उत्साह असतो. मात्र, हा सण फक्त एक दिवस न साजरा करता तो 12 दिवस साजरा केला जातो. ख्रिसमस सण पूर्वसंध्येला सुरु होतो. चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचे आयोजन केले जाते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. घरी केक, गोड पदार्थ केले जातात.
गेल्या वर्षी 4 फुटांचे ख्रिसमसचे झाड 400 ते 1000 रुपयांत मिळत होते. त्याचा यंदा 1300 ते 1500 रुपये दर आहे. ग्राहकांना हा दर जास्त वाटतो. मात्र, भाव वाढले असले तरीही ग्राहकांची खरेदी मात्र कमी झालेली नाही. कारण नाशिक परिसरात ख्रिसमिसचा म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या सर्वोच्च अशा नाताळ सणाचा उत्साह वाढला आहे.
– सुरेश छेडा, व्यावसायिक, अशोक स्तंभ, नाशिक
Customers throng the market for pre-Christmas shopping