पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी; रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जुने वृक्ष होताहेत नष्ट
मालेगाव : प्रतिनिधी
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम आहे, हे खरे आहे. या रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची अक्षरशः कत्तल सुरू आहे. शहरासह तालुक्यात विकासाच्या नावावर जुन्या डेरेदार तसेच ऐतिहासिक वृक्षांची कत्तल केली जात आहे. शहरातील भायगाव रस्त्यावर रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली अशाच एका दुर्मिळ गोखरू वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. वयाचे शतक ओलांडलेले डेरेदार आणि महाकाय वटवृक्ष हे भायगाव रस्त्याचे वैभव आहे. या जुन्या वृक्षांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणप्रेमी या प्रकाराने अस्वस्थ झाले
आहेत.
तालुक्यात राज्य व राष्ट्रीय महामार्ग बांधकामात हजारो वृक्षांचा बळी गेला असताना, आता भायगाव रोड सिमेंट काँक्रिटीकरण कामात अडथळा येत असल्याचे कारण देत ऐतिहासिक व अतिशय दुर्मिळ अशा गोखरू वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. भर उन्हाळ्यात हा वृक्ष अनेकांना सावलीसाठी मोठा आधार ठरला असता. या वृक्षामुळे या रस्त्याचे वैभवही खुलून दिसत होते. परंतु, आता विकासाच्या नावावर या जुन्या वृक्षांची कत्तल करून झाडांचे आयुष्य संपले आहे.
शहरात पर्यावरणाचा समतोल राहावा, प्रदूषण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी, याऐवजी वृक्षतोडीकडे मनपाचा कल वाढलेला आहे. शहरात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याऐवजी आहे त्या वृक्षांचा खून करून मलिदा गोळा करण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केला जात आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत सिटी सेंटर मॉलजवळ असेच ऐतिहासिक वृक्ष रस्ता रुंदीकरणात येत असताना ते वृक्ष तोडण्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी केली. त्याचप्रमाणे मालेगाव महापालिकेनेही दोन, तीन वर्षांंपूर्वी महिला रुग्णालय विकासकामात अडथळा ठरणारे वटवृक्ष तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण केले होते. यावेळी मात्र महापालिकेने ऐतिहासिक व दुर्मिळ वृक्ष तोडून टाकला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीची
भावना आहे.
याची उत्तरे द्या
ऐतिहासिक व दुर्मिळ वृक्षाची कत्तल करताना नेमकी कोणी परवानगी दिली? शहराची वृक्षगणना करून तसा अहवाल जनतेच्या समोर का मांडला जात नाही? मालेगाव शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती वृक्ष आवश्यक आहे? ते संगोपन करण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत?