सिन्नर : प्रतिनिधी
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्या सायबर भामट्यास गजाआड करण्यात नाशिक ग्रामीणच्या सायबर शाखेला यश आले आहे. अमेय अरविंद जैन (29, रा. अत्रेय राजराजेश्वरी, काळेनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या सिन्नरच्या व्यापार्यास दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून दिले.
सिन्नरच्या एका व्यापार्याची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना अनोळखी व्हॉट्सअॅप मोबाइल नंबरवरून संपर्क करून ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबसाइटवर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपव्दारे एका अॅपची लिंक पाठविली. त्यांनी ती ओपन केली असता, त्यांच्या मोबाइलमध्ये बायनान्स या नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे अॅप डाउनलोड केले व त्यावर युडीएसटीची खरेदी केली. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून सायबर भामट्यांनी वेळोवेळी ट्रस्ट इंडिया डॉट कॉम या वेबासाइटवर पैसे गुंतवण्यास सांगून विविध बँक खात्यांवर तक्रारदाराकडून पैसे स्वीकारून एकूण 64 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे, सुनील धोक्रट, आकाश अंबोरे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांनी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करत त्यास नाशिक शहरातून अटक केली. तसेच यातील फिर्यादीचे 2,02,000/- रुपये तक्रारदारास परत मिळवून दिले.