सिन्नरला घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात पती-पत्नी भाजले

घरात आढळला सिलेंडरचा साठा; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
सिन्नर:
सरदवाडी रोडवरील भारत गॅस एजन्सीमध्ये डिलेव्हरी बॉयचे काम करणारा एका तरुणाच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर भाजल्याची घटना सोमवारी (दि.7) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. विक्रम किरण आवारी (38) आणि जयश्री विक्रम आवारी (32) अशी या घटनेत भाजलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. तर आवारी यांचा पाच वर्षाचा मुलगा दैव बलवत्तर म्हणून या स्फोटातून वाचला.
विशेष म्हणजे स्फोट झाला त्या घरात 38 गॅस सिलेंडर आढळून आले. त्यापैकी काही सिलेंडर हे भरलेले सिलपॅक होते. त्यामुळे भरवस्तीत असलेल्या या घरात डिलेव्हरी बॉयने राहत्या घरात अनाधिकृत टाक्या कोणाच्या आशिर्वादाने ठेवल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरलेल्या टाक्यांचा एकाच वेळी स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
विक्रम आवारी हा तरुण सरदवाडी रोडवरील भारत गॅस, वाजे एजन्सीमध्ये डिलेव्हरी बॉयचे काम करतो. या एजन्सीपासून काही अंतरावर वाजे लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या परिसरात या तरुणाचे घर आहे. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास दोघे पती-पत्नी आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा घरात असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाने घरातील खिडकीची तावदाने फुटली, घराजवळ उभ्या असलेल्या एका इनोव्हाच्या काचाही फुटल्या. काहीतरी अनुचित घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी आवारी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी आवारी यांचे घर आतुन बंद होते. नागरिकांनी आवाज दिल्यानंतर आवारी यांनी आतुन घर उघडले असता दोघेही पती-पत्नी सिलेंडरच्या स्फोटात भाजल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या लक्षात आले. तर त्यांचा पाच वर्षांचा मुलगा मात्र सुस्थितीत होता. नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, हवालदार रामदास धुमाळ, चेतन मोरे, अंकुश दराडे, साळवे आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दोघेही पती-पत्नीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सिलेंडर नेमके कोणाचे ?
आवारी यांच्या घराच्या पाठीमागच्या एका खोलीत घरगुती आणि वाणिज्य वापराचे एकुण 38 सिलेंडर आढळून आले. त्यापैकी काही सिलेंडर भरलेल्या अवस्थेत होते. जर हे सिलेंडरही स्फोटाच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या तर शिवाजीनगरातील इतर घरांनाही त्याची धळ पोहचून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली असती सुदैवाने मोठा अनर्थ टळला. तथापि एवढ्या मोठ्या संख्येने आढळून आल्यानंतर संबंधित एजन्सी चालकाने आपला स्टॉक मेन्टेन असल्याचे सांगितले. त्यामुळे आवारी यांच्या घरात आढळून आलेले सिलेंडर नेमके कोणाचे, तसेच कुठलीही सुरक्षा नसताना एवढ्या मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर घरात ठेवले कसे ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *