ग्रामीण भागात पाणीबाणी; महिलांवर भटकंतीची वेळ, नियोजन गरजेचे
दिंडोरी ः प्रतिनिधी
तालुक्यात तापमान वाढल्याने पारा प्रतिदिन उच्चांक गाठताना दिसत आहे. त्यात भीषण पाणीटंचाईची समस्या उभी ठाकली असून, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांवर मर्यादा पडल्या आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा महिलांना भटकावे लागत आहे.
तालुक्यातील सर्वच धरणांचा जलसाठा आटल्याने प्रशासनाची यामध्ये कसोटी लागली आहे. तालुक्याला धरणांची काशी म्हटली जाते. करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे असून, सध्या सर्वच धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने सद्यस्थिती चिंताजनक ठरत आहे.
ग्रामीण भागात सर्वाधिक टंचाईचे संकट निर्माण झाले असून, तालुक्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर पट्ट्यामध्ये पाणीटंचाई हा एकच आणि एकच प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी पाऊस काहीअंशी शेवटच्या टप्प्यात बरसल्याने तालुक्यातील सर्वच धरणांनी 100 टक्क्यांचा आकडा पार केला होता. मात्र, दिंडोरी तालुक्यातील धरणांवर काही तालुके हे राखीव असल्याने सध्या तालुक्यावरच टंचाईचे संकट ओढावले आहे.
त्यात धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने जनतेला कृत्रिम पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. शेतकर्यांना पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न पडला आहे. अनेक ठिकाणी धरणातून पिण्यासाठी पाण्याची पाइपलाइन विविध ग्रामपंचायतींनी उपलब्ध करूनही पाणीटंचाईचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. धरणातच पाणी नाही तर गावासाठी पाणी उपलब्ध कसे करायचे, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
दिंडोरी तालुक्यातील काही भाग हा आदिवासी, डोंगराळ असल्याने महिलावर्गाला काही किलोमीटर पायी प्रवास करून डोक्यावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. संबंधित खात्यातील लोकांनी पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी आहे.
पाणी समस्या दूर व्हावी
दिंडोरी हा सहा धरणांचा एकमेव तालुका आहे. मात्र, सद्य:स्थिती पाहता भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, याचा फटका शेतकरीवर्गाबरोबर महिलांना बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याबाबत योग्य नियोजन करून पाणीटंचाई दूर व्हावी, अशी अपेक्षा महिलावर्गाकडून व्यक्त होत आहे.
पाण्याबाबत योग्य नियोजन अपेक्षित
धरणांचा तालुका म्हणून दिंडोरीकडे पाहिले जात आहे. तालुक्यात सहा धरणे असूनही दिवसागणिक पाण्याची गरज निर्माण होऊन व पाण्याबाबत मागणी वाढत आहे. धरणातील जलसाठा अग्रक्रमाने पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आव्हान भविष्यात संबंधित विभागापुढे असणार आहे. त्या दृष्टिकोनातून योग्य तो नियोजनात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.
– नामदेव गावित, उपाध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी, नाशिक