आमोदे येथे धाडसी घरफोडी

रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

नांदगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदे येथे रविवार (दि. 23) मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून रोकड तसेच सोन्याचे दागिने, असा ऐवज लंपास केला. पोलिसांनी तत्काळ या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे
रविवारची सुट्टी असल्याने आमोदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली देवरे, तसेच श्री साई शिक्षण संस्थेत उपशिक्षक असलेले गजानन पवार हे दाम्पत्य नातेवाइकांच्या लग्नासाठी नाशिक येथे गेले होते. ही संधी साधत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात असलेले सोन्याचे दागिने तसेच रोकड तसेच सोन्याच्या अंगठ्या चोरी करत पोबारा केल्याची घटना घडली. काही महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रांवरदेखील चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सोमवारी सकाळी पिलखोड येथील एका नागरिकाला चोरट्याने चोरून नेलेले बँकेचे पासबुक काही डॉक्युमेंट रस्त्यात फेकल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित नागरिकांनी पासबुकवर पवार यांचे नाव व मोबाइल नंबर असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत तुमचे डॉक्युमेंट येथे सापडल्याचे सांगितले.
पवार यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच शेजारी असणार्‍या दीपक पगार यांना घराचा दरवाजा उघडा आहे का, याची शहानिशा करण्यास सांगितले. तेव्हा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आल्याने हा चोरीचा प्रकार समोर आला. यानंतर पवार गल्लीतील नितीन माधराव पगार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडूनदेखील चोरट्यांनी कपाटातून रोख रक्कम रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनेचा पंचनामा करत श्वानपथक तसेच फिंगरप्रिंट्स पथकाला पाचारण करत तपासाची चक्र फिरवली. दुपारी दोनच्या सुमारास श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढला. श्री साई शिक्षण संस्थेच्या पुढे चोरट्याने तोडलेले कुलूप त्या ठिकाणी सापडले. मात्र कुठलेही पुरावे आढळले नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *