पुणे :
एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा दि. 10 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे.
यावर्षीसुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण बारावी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीच्या फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावा परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शासनाच्या परिपत्रकानुसार 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. तर दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.