दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नाशिक : प्रतिनिधी
दत्त जयंतीनिमित्त आज गुरुवारी (दि. 4) शहरातील विविध परिसरात असलेल्या दत्त मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची आरास करण्यात आली आहे.
दत्त जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले ठेवण्यात आले. दत्त जयंती उत्सवानिमित्त आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. या काळात हजारो भाविकांनी गुरुचरित्र पारायणासाठी व दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. एकमुखी दत्त मंदिरात पहाटे 5.30 वाजता अभिषेक असणार आहे. संध्याकाळी 6.15 वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा असणार आहे. त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद असणार आहे, तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एकमुखी दत्तमंदिराचे मठाधिपती मयुरेश बर्वे
यांनी दिली.
नाशिक शहरात अनेक पुरातन दत्त मंदिरे विविध भागात आहेत. शहरातील सिडकोतील दत्त मंदिर, देवळाली गावातील दत्त देवस्थान, जुने नाशिकरोडचे दत्त मंदिर, इंदिरानगरचे श्रद्धास्थान गुरुदेव दत्त, सातपूरचे चाळीस वर्षे जुने गुरुदेव दत्त मंदिर आणि गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध दत्त मंदिरांत लघुरुद्राभिषेक, अभिषेक, पारायण यांसह यथासांग पूजा करण्यात येणार आहे. भाविकांना सुलभपणे दर्शन मिळावे, यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
दत्त मंदिरांसह विविध चौकाचौकातदेखील दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दत्तजन्मोत्सव सोहळ्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाविकांकडून तयारी करण्यात येत होती.