दाट धुक्यामुळे जीवघेणा प्रवास

सप्तशृंगगडावरील घाटरस्त्यावर रिफ्लेक्टर, दिशादर्शकाची गरज

सप्तशृंगगड : वार्ताहर
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी देवस्थान पावसाचे माहेरघर समजले जाते. जंगल घाटाचा परिसर व समुद्रसपाटीपासून साडेचार हजार
फूट उंचीवर गाव असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो. दाट धुक्यामुळे घाटरस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
नांदुरी ते सप्तशृंगगड हा दहा किलोमीटरचा घाट आहे. मुसळधार पावसाबरोबर दाट धुकेही मोठ्या प्रमाणात पसरलेले असते. त्यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यातच रस्ता काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने चालू आहे, त्यामुळे वाहनचालकांना नागमोडी घाटाचा रस्ता असल्याने वाहन चालविताना अनेक अडचणी निर्माण होतात. दिवसा व रात्रीही दाट धुके असल्याने धुक्यातून गाडीचे लाईट लावून रस्ता शोधत कसरत करावी लागते. त्यात सप्तशृंगगडावरील घाटात नवीनच रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असल्याने जुने रिफ्लेक्टर रस्त्याच्या खाली दाबले गेले आहेत. या ठिकाणी घाटाचा रस्ता व धुके असल्याने रस्ता दिसत नाही, गाडी रस्त्याच्याखाली चिखलात फसत आहेत. पावसाळ्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाविकांच्या वाहनांचा अपघात टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रिफ्लेक्टर व दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

सप्तशृंगगडावर सध्या दाट धुके असल्यामुळे घाटातून वाहन चालविताना चालकांना रात्रीच्या वेळेस रस्ता दिसत नाही. वाहनचालकांची तारांबळ उडते. परिणामी अपघात होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून घाटातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर बसवावेत.
-तेजस बेनके, शहराध्यक्ष, युवासेना

धोंड्याकोड्याची विहीर ते गवळीवाड्यापर्यंत रस्त्याची बिकट परिस्थिती झाली आहे. चिखलाच्या रस्त्यावरून प्रवास करत असताना भाविकांचे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत याला जबाबदार कोण? दोन महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला हे सर्व माहीत असूनही संबंधित विभाग डोळेझाक व निष्काळजीपणा करत आहे.
-मधुकर गवळी, सामाजिक कार्यकर्ते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *