कळवण : प्रतिनिधी
कळवण – नांदुरी रस्त्यावर मोटारसायकल व स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्हीही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही प्राथमिक उपचार करून नाशिकला हलविण्यात आले होते. मात्र, त्यातील एकाला उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जीव गमवावा लागला. फोटोग्राफर भावेश योगेश कोठावदे (वय 22) असे मयत तरुणाचे नाव असून, बुधवारी (दि. 24) दुपारी त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कळवण शहरातील प्रतिष्ठित किराणा व्यावसायिक व श्री धनलक्ष्मी पतसंस्थेचे सल्लागार संचालक, शेतकरी योगेश प्रभाकर कोठावदे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. सात महिन्यांपूर्वी त्याचे वडील प्रभाकर कोठावदे यांचे निधन झाले होते. वर्ष पूर्ण होत नाही तोच त्यांच्या घरात तरुण मुलाचे निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवार, दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात कळवण-नांदुरी रस्त्यावर साकोरा पाडा या वळण रस्त्यावर घडला. पल्सर मोटारसायकल एम.एच. 41, बीबी 3145 ने भावेश कोठावदे कळवण व तुषार तुळशीराम गांगुर्डे (वय 20, रा. पाळे) हे दोघे फोटोग्राफर सप्तशृंगगडावर फोटो व रील बनविण्यासाठी जात होते. आणि अभोणा येथील स्विफ्ट वाहन एम. एच. 41, ए. झेड. 9993 नांदुरीहून कळवणकडे येत असताना समोरासमोर हा अपघात घडला.
दरम्यान, जखमी दोघा मोटारसायकलस्वारांना प्राथमिक उपचारासाठी कळवण येथे व नंतर नाशिक येथे हलविण्यात आले होते. मात्र, भावेश कोठावदे याच्या पायाला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. आणि यातच उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.