चांदवड तालुक्यात हरणांच्या मृत्यूचे सत्र सुरूच

वडगाव पंगू येथे 50 फूट खोल विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

चांदवड : वार्ताहर
तालुक्यातील वडगाव पंगू येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरात तालुक्यातील वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल आठ हरणांचा मृत्यू झाला असून, यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि शेतातील उघड्या विहिरी वन्यजीवांसाठी डेथ ट्रॅप ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव पंगू येथील शेतकरी सदाशिव गोजरे यांच्या शेत गट नंबर 162/4 मधील सुमारे 50 फूट खोल विहिरीत एक हरिण पडले असल्याचे बुधवारी (दि. 7) सकाळी दिसले. विहीर खोल असल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती प्राणीमित्र भागवत झाल्टे यांनी तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांना दिली. त्यानंतर वन कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीबाहेर काढले.
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू (लोणच्या डोंगर परिसर), कातरवाडी, समीट, कातरणी, तळेगावरोही आणि कोलटेक-पाटे या परिसरात हरणांचा मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वन्यजीवांच्या अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात आठ हरणांचा बळी गेल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विहिरींना संरक्षक कठडे नसल्यामुळे तहानेने व्याकूळ झालेली हरणे पाण्यासाठी भटकंती करताना थेट विहिरीत कोसळत आहेत. या गंभीर परिस्थितीवर बोलताना प्राणीमित्र भागवत झाल्टे म्हणाले की, वन्यजीवांचे हे अपघात प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे होत आहेत. वन विभागाने उघड्या व असुरक्षित विहिरींबाबत प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी धोकादायक विहिरींना संरक्षक कठडे, जाळ्या अथवा झाकण बसवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता वन विभाग यावर काय पावले उचलणार, याकडे निसर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Deer deaths continue in Chandwad taluka

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *