केंद्र सरकारची स्पष्टोक्ती : चौकशीचे आदेश
नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी (दि. 10 नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्लाच होता, असे केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मंत्रिमंडळ सदस्यांनी या घृणास्पद कृत्यातील बळींना श्रद्धांंजली वाहण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळले. मंत्रिमंडळाने हल्ल्याला प्रतिसाद म्हणून ठरावही जारी केला. या भ्याड कृत्याचा मंत्रिमंडळ स्पष्टपणे निषेध करते, ज्यामुळे निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत, असे ते म्हणाले. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटातून देशविरोधी शक्तींनी घडवून आणलेल्या एका भयानक दहशतवादी घटनेचा देशाने अनुभव घेतला आहे.
या हिंसाचारातील बळींना मंत्रिमंडळ श्रद्धांजली अर्पण करते आणि शोकग्रस्त कुटुंबांना मनापासून सहवेदना व्यक्त करते, तसेच सर्व जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते. पीडितांची काळजी घेऊन आधार देणार्या वैद्यकीय कर्मचारी आणि आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांच्या त्वरित प्रयत्नांचे कौतुक करते, असे कॅबिनेट बैठकीनंतरच्या निवेदनात म्हटले आहे. दहशतवादाच्या सर्व स्वरूपांच्या आणि कृत्यांविरुद्ध ’झिरो टॉलरन्स’ धोरणाबद्दल भारताच्या अटल वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असेही म्हटले आहे. या घटनेची चौकशी अत्यंत तत्परतेने आणि व्यावसायिकतेने करावी जेणेकरून गुन्हेगार, त्यांचे सहयोगी आणि त्यांचे प्रायोजक कोण ते समजेल आणि पीडितांना विलंब न करता न्याय मिळवून दिला जाईल.
यंत्रणेचे बारीक लक्ष
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. ’10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाद्वारे देशविरोधी शक्तींनी केलेल्या भ्याड दहशतवादी कृत्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे
निर्देश दिले आहेत. सरकारच्या सर्वोच्च पातळीवरील यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.’
रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस
भूतानहून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट रुग्णालयात जाऊन दिल्ली स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. तसेच या स्फोटाच्या घटनेबद्दल त्यांनी अधिकार्यांकडून सविस्तर माहिती आणि अहवाल घेतला.
2,900 किलो स्फोटके जप्त
एजन्सीने आतापर्यंत 2,900 किलो स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके जप्त करण्यासाठी सतत छापेमारी केली जात आहे. दिल्लीत स्फोट करण्यात आलेल्या आय-20 कार दिल्लीत कुठे कुठे गेली होती, याचा शोध घेतला जात आहे. गाडीत स्फोटके नेमकी कुठे भरण्यात आली, याचा शोध सुरू आहे. जवळपास तीन तास लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये ही गाडी उभी होती.