पिंपळगाव(वा.)च्या व्यापार्याचा झटापटीत मृत्यू; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जब्बार तांबोळी
देवळा : प्रतिनिधी
आयजी स्कॉडचे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माल भरलेले पिक-अप वाहन अडवून 25 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव वाखारी (ता. देवळा) येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी (वय 55) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत चांदवड येथील पिक-अपचालक इलियास सुल्तान बागवान (वय 44) यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास जगताप (रा. मालेगाव), मोहम्मद शफीक मोहंमद रफिक (रा. मालेगाव) व महेश भामरे (रा. तांदळवाडी, ता. बागलाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी इलियास बागवान यांची पिक-अप (एमएच-15-एचएच-8861) भाडेतत्त्वावर चालवून उदरनिर्वाह करतात. पिंपळगाव वाखारी येथील जब्बार तांबोळींसह बुधवारी (दि. 11) सायंकाळी पिकअप घेऊन माल आणण्यासाठी गेले होते. देवळ्याकडे रात्री साडेअकराच्या सुमारास परतत असताना कळवण तालुक्यातील एकलहरे परिसरातून स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या पिकअप वाहनाचा पाठलाग सुरू केला. मध्यरात्रीच्या सुमारास भऊर फाटा परिसरात संशयितांच्या स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावून पिकअप थांबवली. स्कार्पिओमधून उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवले, तर फिर्यादी चालक बागवान यांनाही त्याच गाडीत बसवले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिकअप गाडी स्वतः चालवत पलायन केले. भऊर, खामखेडा, मांगबारीमार्गे प्रथमेश वाइन शॉपजवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करून आरोपींनी स्वतःला ‘आयजी स्कॉडचे पोलीस’ असल्याचे सांगितले. पिकअपमधील माल तपासून ‘गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर 25 लाख रुपये द्या,’ अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केली. यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपींशी बोलणी करून 11 लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यांनी मुलगा साहिल याला फोन करून पैसे घेऊन घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र, तांबोळी यांची तब्येत अचानक बिघडली. संशयितांनी त्यांना दमदाटी करत मारहाण केल्याची माहिती मिळाली. ते बेशुद्ध पडल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून वाहनासह पसार झाले. मुलगा साहिल तांबोळी यांच्यासह पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात व मित्र महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह पैसे घेऊन घटनास्थळी पोहोचले असता, जब्बार तांबोळी बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. त्यांना तातडीने साहिल व इतरांनी उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी विलास जगताप, मोहंमद शफीक मोहंमद रफीक व महेश भामरे यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ सटाणा पोलीस ठाण्यात जमा केली.
याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस कर्मचारी राहुल शिरसाठ, सुभाष चव्हाण, नितीन बारहाते करीत आहेत. दरम्यान, मृत जब्बार तांबोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे, त्यांच्या एका मुलीचा विवाह 7 मे रोजी होणार होता. त्यांच्या निधनामुळे देवळ्यासह पिंपळगाव वाखारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.