प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
स्थायी समिती अध्यक्ष, प्रभाग सभापती अशी पदे मिळवून, तसेच केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही आडगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या आयटी पार्क आणण्यासाठी प्रयत्न करता आले नाहीत. क्षेत्रफळाने मोठा असलेला आणि आडगाव, नांदूर, मानूर अशा तीन गावांचा आणि शहराच्या काही भागांचा या प्रभागात समावेश, तसेच सर्वाधिक मंगल कार्यालये, लॉन्स, बँक्वेट हॉल असलेल्या या भागात वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. मुख्य रस्त्यावर असलेले भाजीपाला व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे वाहन चालकांना होणारा त्रास याकडे मनपा प्रशासनाने डोळेझाक केल्याचे चित्र बघायला मिळते. नागरिकांना पुरेशा न मिळणार्या सुविधा,
नागरिकांच्या अपेक्षेने न मिळालेल्या रस्ते, पाणी, वीज अशा न मिळालेल्या सुविधांमुळे आडगाव, नांदूर, मानूर आणि कॉलनी परिसरातील
नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग व छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या मध्यभागी आणि सर्वाधिक मळे परिसर असलेल्या या प्रभागात अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. दिवसेंदिवस या प्रभागाचा विस्तार होताना दिसत आहे. शेतकरीवर्ग व नोकरदार, लहानमोठे व्यावसायिक प्रभागात राहतात. मळे परिसरात 15 ते 20 वर्षांपूर्वी झालेले रस्ते अद्याप तसेच असल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गानेदेखील नाराजी व्यक्त केली आहे. झपाट्याने वाढणारा कॉलनी परिसर यात कोणार्कनगर, जत्रा हॉटेल परिसर, वृंदावननगर, शरयू पार्क, समर्थनगर, मूलभूत सुविधांपासून अद्याप वंचित आहेत. कॉलनी रस्त्यांमध्ये पडलेले खड्डे, पाण्याची असलेली समस्या, जुने झालेले पथदीप याकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे चित्र बघायला मिळते.
छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात लॉन्स, मंगल कार्यालये असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवते. कोणार्कनगर, जत्रा हॉटेल, निलगिरी बाग या भागात अनधिकृत भाजी बाजार रस्त्यावरच भरत असल्याने वाहनचालकांसह स्थानिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील भाजीपाला बाजारामुळे अपघात झाला तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्याचप्रमाणे म्हाडा वसाहतीतून नाल्यात मिसळणार्या ड्रेनेजमुळे नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून महापालिकेमध्ये प्रशासक असल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आडगाव, नांदूर, मानूर या गावठाणातील, तसेच मळे परिसरातील नागरिकांना शेतकर्यांना मूलभूत सुविधा चांगल्या मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.
विद्यमान नगरसेवक



या आहेत समस्या
मानूर स्मशानभूमी व दशक्रिया विधी शेडची दुरवस्था.
कॉलनी मळे परिसरातील रस्त्यांची दुरवस्था.
कॉलनी परिसरात पाण्याची समस्या.
उद्यानांची दुरवस्था.
मुख्य रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण.
प्रभागाचा परिसर
आडगाव, मळे परिसर, गावठाण, नांदूर, मानूर, कोणार्कनगर, एमईटी (भुजबळ नॉलेज सिटी), ग्रामीण पोलीस वसाहत, मविप्र संस्थेचे वैद्यकीय
महाविद्यालय, अमृतधाम, विडी कामगार वसाहत, निलगिरी बाग, जत्रा हॉटेल परिसर.
प्रभागातील विकासकामे
अडीच कोटी खर्च करून कबड्डी स्टेडियम.
शरयू पार्क, प्रभातनगर येथे पूल.
आडगाव स्मशानभूमी, दशक्रिया विधी शेड परिसरात काँक्रीट रस्ता.
आडगाव येथे आरोग्य सुविधा केंद्र.
कोणार्कनगर, हनुमाननगर येथे दोन जलकुंभ.
सन 2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या- 47,027
अनुसूचित जाती- 6,074
अनुसूचित जमाती- 4,876
इच्छुक उमेदवार
अतुल मते, अॅड. जे. टी. शिंदे, अॅड. नितीन माळोदे, भाऊसाहेब निमसे, नाना साबळे, विद्या शिंदे, मल्हारी मते, रवींद्र जाधव, विमल काशीनाथ निमसे, संतोष जगताप, संगीता मते, मथुरा गांगुर्डे, सुरेश मते, पोपट शिंदे, गणेश माळोदे, रामभाऊ संधान, रोहिणी मते, कैलास शिंदे, नामदेव शिंदे.
जागोजागी कचरा
प्रभागातील विविध भागांत जागोजागी कचरा असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचरा साचून राहतो. पथदीप बंद, तक्रार करूनही दुर्लक्ष होते. खड्डे बुजविण्यासाठी खडीचा वापर केल्याने खडी रस्त्यावर आली. त्यामुळे वाहन घसरून पडतात.
– सौ. विद्या शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या
आडगाव परिसरात नागरिक समस्यांनी त्रस्त
आडगाव गावातील नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. गाव व कॉलनी परिसरात खड्डेच खड्डे पडलेले आहेत.शेरताटी रस्त्याकडे नदीवर पूल बांधण्याची गरज आहे. लेंडी रस्त्याचे रुंदीकरण करून प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स वाढविण्यात याव्यात. पिंपरी रस्त्याला पाण्याची पाइपलाइन टाकण्यात यावी.
– विलास माळोदे
आडगाव-भगूर रस्त्याची दुरवस्था
गेल्या अनेक वर्षांपासून आडगाव-भगूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पथदीप बंद असल्याने नागरिकांना जाण्या- येण्यासाठी त्रास होतो. रस्त्याच्या साइटपट्ट्या साफ होत नाहीत. गंगापूर कॅनॉलवरील पुलाचे तीन वर्षांपासून काम सुरू असून, ते संथगतीने सुरू आहे.
– अनिल शिंदे, रहिवासी
नांदूर नाका परिसरात सुलभ शौचालयाची गरज
नांदूर नाका परिसरात थांबा असून, येथील परिसर विकसित होत आहे. याठिकाणी नागरिक, महिला थांबलेल्या असतात. त्यामुळे नांदूर नाका परिसरात सुलभ शौचालयाची आवश्यकता आहे.
– अमोल गांगुर्डे, नांदूर-मानूर
कॉलनी रस्त्यांची दुरवस्था
कोणार्कनगर, खंडेराव मंदिर, पंचकृष्ण लॉन्स आदी कॉलनी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पथदीपदेखील बंदावस्थेत आहेत. मनपात प्रशासकीय कारभार सुरू झाल्यापासून कुठलीही कामे होत नाहीत.
– वैशाली त्र्यंबके, कोणार्कनगर
आडगाव-माडसांगवी रस्ता पूर्ण करा
आडगाव-माडसांगवी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. बरेचसे काम झाले. रस्ताही काँक्रीट करून झाला. पण उर्वरित रस्ता बाकी असल्याने तोही पूर्ण करावा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली करण्यात येऊन दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या पाहिजेत.
– उत्तम धारबळे, स्थानिक नागरिक





