प्रभाग : 6
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भोगूनही हा प्रभाग सोयी-सुविधांपासून वंचित राहिला आहे. पंचवटी, गोदावरी नदीकाठापासून सुरू होणारा प्रभाग मखमलाबाद, पेठ रोडवरील म्हसोबा बारीपर्यंत विस्तारला आहे. प्रभागात मळे वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने अद्याप या भागातील अनेक रस्ते दुर्लक्षित आहेत. नव्याने मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या या प्रभागातील अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या आहेत. मात्र, इतकी महत्त्वाची पदे भोगूनही प्रभागात एकही असे ठोस काम झाले नाही की, ते पदे भोगणार्यांना सांगता येणार नाही. केवळ निवडणूक लागली की, यायचं, फिरायचं अन् निवडून आल्यावर मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम झाले आहे. मनपाच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पाडणार्या प्रभागातील रस्त्यांचे खुळखुळे झाले असून, मुख्य रस्त्यांना जोडले जाणारे नाशिक-मखमलाबाद, मखमलाबाद ते गंगापूर रोडकडे जाणार्या रस्त्यांचीदेखील चाळण झाली आहे. त्यामुळे एक ना अनेक समस्यांनी प्रभागातील नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडून कोटीच्या कोटी उड्डाणे मारूनही रस्त्यांचे मात्र खुळखुळेच झाले आहे!
हाकेच्या अंतरावर असलेल्या गोदावरी काठापासून सुरू होणार्या या प्रभागाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी ग्रामीण भाग असलेला मखमलाबाद गाव आणि गावठाण विस्तारात चाललेल्या कॉलनी परिसरात समस्यांची कमीच नाही. पूर्वी अगदी कमी लोेकसंख्या असलेला या प्रभागात आज मोठ्या प्रमाणात ती वाढली आहे. त्यामुळे कॉलनी परिसरदेखील वाढला आहे.
मखमलाबाद ते नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणाची मोठ्या प्रमाणात गरज असतानादेखील त्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. ड्रीम कॅसल ते मखमलाबाद गावापर्यंतच्या रस्त्यावर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, शांतीनगर परिसरात भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावरून येणार्या-जाणार्या नागरिकांना, वाहनधारकांना त्याचा सामना करावा लागतो. गंगापूर रोडकडून मुंबई महामार्ग, पेठ रोड, दिंडोरी रोड, शरदचंद्र पवार मार्केट यार्ड, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मेरी, जलसंपदा विभागाकडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो; परंतु शिंदेनगर ते स्व.गंगाधर बाबूराव फडोळ चौक, नानासाहेब धर्माधिकारी मार्गापर्यंत असा हा पाचशेमीटरचा रस्ता अगदी अरुंद असल्याने याठिकाणी वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे.
मखमलाबाद परिसरातील शांतीनगर ते तांबे, बोराडे मळा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिक मात्र चांगलेच हैराण झाले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून दीड ते दोन फूट पाणी रस्त्याने वाहत असल्याने येणार्या-जाणार्यांंना त्याचा सामना करावा लागतोे. याच भागातील कॉलनी परिसरातदेखील फूटभर पाणी वाहत असल्याने याकडेदेखील लक्ष देण्याची गरज आहे. रामकृष्णनगर, स्वामी विवेकानंदनगर, इंद्रप्रस्थनगर, अश्वमेधनगर, तवली फाटा परिसर, मानकर मळा परिसर, सहारानगर परिसर, नमन हॉटेल परिसर, मेहरधाम परिसर आदी भागांत पाण्याची गंभीर समस्या आहे. याच भागातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, या भागात उद्यान विकसित केले नसल्याने मुलांना खेळण्यासाठी जागादेखील नाही. उद्यान म्हणावे तसे विकसित झालेले नाही. प्रभागात नियमित औषध फवारणी होत नसल्याने डासांचा सामना करावा लागतो. प्रभागात 90 टक्के पथदीप बसविण्यात आले असून, 70 टक्के भागात भुयारी गटारीचे काम पूर्णत्वास नेल्याचे लोकप्रतिनिधी सांगतात. विशेष म्हणजे, या भागातील नागरिकांनी पाणी व रस्त्यासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आंदोलने करूनही याकडे मात्र प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांत प्रशासनाच्या विरोधात संतापाची भावना आहे. त्यामुळे येणार्या काळात तरी प्रभाग खड्डेमुक्त होऊन नागरिकांना चांगले रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध होणार का, असा प्रश्नदेखील नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
विद्यमान नगरसेवक

पुंडलिकराव खोडे

अशोक मुर्तडक

भिकूबाई बागूल
सुनीता पिंगळे
अशी आहेत विकासकामेे
* रामकृष्णनगर, अमृतवन उद्यानात उभारण्यात आलेले दोन महत्त्वाचे जलकुंभ.
* मनपा शाळेच्या आवारात प्राथमिक आरोग्यसेवा केंद्र.
* प्रभागात 90 टक्के पथदीप बसविण्यात आले.
* भुयारी गटार योजनेचे 70 टक्के काम पूर्ण.
* साडेतीन कोटी रुपये खर्च करून जवळपास 15 एकर क्षेत्रात अमृतवन उद्यानाची निर्मिती.
* आमदारांकडे पाठपुरावा करून त्यांच्या निधीतून विविध ठिकाणी ओपन स्पेस विकसित.
* मळे विभागाकडे जाणार्या रस्त्यांचे डांबरीकरण.
या आहेत समस्या
* नवीन वसाहतींतील रस्त्यांची दुरवस्था.
* काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा.
* जुन्या रस्त्यांची दुरवस्था.
* ड्रीम कॅसल ते मखमलाबाद गावापर्यंत रस्त्याची झाली चाळण.
*शाळेकडून सुयोजितकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था.
* शांतीनगरकडून तांबे, बोराडे मळ्याकडे जाणार्या रस्त्याची चाळण.
असा आहे प्रभागाचा परिसर
मखमलाबाद गाव, गावठाण, रामवाडी, हनुमानवाडी, क्रांतीनगर, मळे परिसर, इंद्रप्रस्थनगरी, स्वामी विवेकानंदनगर, मेहेरधाममागील परिसर, कर्णनगर, यशोदानगर, शांतीनगर, मातोश्रीनगर, रामकृष्णनगर, इरिगेशन कॉलनी, विद्यानगर, वडजाई मातानगर, महादेव कॉलनी, गांधारवाडी, मोरे मळा, जगझाप मळा, कोशिरे मळा, नागरे मळा, चौधरी मळा, हनुमानवाडी, प्रोफेसर कॉलनी, उदयनगर, तळेनगर, आदर्शनगर, कौशल्यानगर, रामवाडी, अश्वमेधनगर, इंद्रप्रस्थनगर, तवली फाटा परिसर.
सन 2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या- 49,195
अनुसूचित जाती- 3,771
अनुसूचित जमाती- 7,995
इच्छुक उमेदवार
दामोदर मानकर, बापूशेठ पिंगळे, प्रल्हाद काकड, गोकुळ काकड, छाया काकड, वाळू काकड, प्रमोद पालवे, गणेश काकड, अंकुश काकड, भास्करराव पिंगळे, विक्रम कडाळे, सौ. शोभाताई पिंगळे, मनीष बागूल, प्रा. वैशाली आहेर (कोकाटे), मनीषा पालवे, सुवर्णा काकड , चित्रा तांदळे, अॅड. सुरेश आव्हाड, निवृत्ती शिंदे, ज्ञानेश्वर काकड, अमित शिंदे, मनीषा हेकरे, प्रशांत गामणे, अजित ताडगे, मोतीराम पिंगळे, मंदाताई गडदे, छाया कडाळे, कल्पना पिंगळे आदी.
नागरिक म्हणतात…

कोळीवाडा भागातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर
महापालिकेकडून शहरात अतिक्रमण निर्मलून मोहीम राबवत असताना मखमलाबादकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न पडतो. गावातील कोळीवाडा भागातून शाळेकडे जाणार्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. शाळेत जवळपास पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. याच रस्त्याने कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात सातपूर भागाकडे जातो. लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे.
– अनिल रामनाथ काकड

शाळा ते गोदावरीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था
छत्रपती शिवाजी महाराज शाळेपासून गोदावरी नदीकडे जाणार्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हा महत्त्वाचा रस्ता असून, हा रस्ता गंगापूर रोडला पुढे मिळतो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शाळा, महाविद्यालय असल्याने विद्यार्थी अन् कामगारांचे हाल होतात. पाटाच्या पुढे भुयारी गटार नसल्याने पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे दुर्गंधी पसरते.
– संजय पिंगळे, कुबेरनगर

मूलभूत सुविधांपासून वंचित
मखमलाबाद परिसर महापालिकेच्या हद्दीत येऊन तब्बल पस्तीस वर्षे झाली तरीसुद्धा रस्ते, पथदीप, पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या अनेक मूलभूत सुविधा महापालिका या परिसराला देऊ शकलेली नाही. या 35 वर्षांत या परिसरात शेकडो लेआउट मंजूर झाले. ते विकसित करताना नगरपालिकेने कोट्यवधी रुपये विकसन शुल्क म्हणून भरून घेतलेले आहेत. जे लेआउट मंजूर झालेले आहेत तिथे आज हजारो इमारती उभ्या आहेत. त्या बांधतानाही महापालिकेने कोट्यवधी रुपये विकसन शुल्क म्हणून भरून घेतलेे आहे. आजपर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न महापालिकेला देऊनही मनपा मूलभूत सुविधा इथल्या रहिवाशांना का पुरवू शकत नाही? याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत की, महापालिकेचे अधिकारी, हा संशोधनाचा विषय आहे. नाशिक- मखमलाबाद रोड हा शंभर फुटी असणारा डीपी रोड मात्र 35 वर्षांपूर्वी जागेवर वीस फूटच होता आणि आजही तो जागेवर वीस फूटच आहे.
– मदन वसंत काकड, महादेव कॉलनी

कॉलनी परिसर दुर्लक्षित
घाडगेनगर परिसरातील कॉलनीतील रस्त्यांची खूप दुरवस्था झालेली आहे. अनेक वेळा निवेदने दिली; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे. डांबरीकरण झालेले नाही, पावसाळ्यात मोठे खड्डे होतात. त्यामुळे कॉलनीतील रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी त्रास होतो. अनेकदा किरकोळ अपघातदेखील झाले आहेत. कॉलनीलगतचा नाला स्वच्छ केलेला नाही. त्यातून विषारी साप व अन्य प्राणी निघतात. त्यामुळे लहान मुलांचा जीव नेहमीच धोक्यात असतो.
– अनिल रतिलाल राठोड, स्थानिक रहिवासी, घाडगेनगर

अतिक्रमणात रस्ता हरवला
मेहेरधाम परिसरातील देवी वाघेश्वरी इमारतीकडे जाण्या- येण्यासाठी किमान एक किलोमीटर वळसा घालून घराकडे यावे लागते. घराकडे येणार्या रस्त्याने धड चालतासुद्धा येत नाही. ज्या लोकांनी प्लॉट पाडून विकले त्यांनी अतिक्रमण केल्याने रस्तादेखील हरवून गेला आहे. मनपा प्रशासनाकडे अर्जदेखील केले; परंतु तेही याकडे दुर्लक्ष करत आहेत.
– आरती शिर्के, मेहेरधाम

पाण्याची गंभीर समस्या
पाण्याची खूप मोठी समस्या आहे. जवळच पाण्याच्या टाकीचे काम अजून अपूर्ण आहे. पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. पाणी जरी आले तरी खूप कमी वेळ येते. कमी दाबाने पाणी येते.
– सौ. सुनीता नवनाथ हुमण, इंद्रप्रस्थनगर