कोट्यवधी खर्च, तरीही सेंट्रल पार्कसाठी नाशिककरांची प्रतीक्षाच

नाशिक ः प्रतिनिधी
सिडकोतील मोरवाडी परिसरात विकसित होत असलेल्या बहुप्रतीक्षित सेंट्रल पार्कचे काम धीम्या गतीने सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांसाठी हा पार्क (उद्यान) खुले होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, वर्ष संपत असताना अजूनही काम पूर्ण न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोट्यवधींचा निधी खर्चूनही उद्यानाचे उद्घाटन अद्याप रखडल्याने लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हा प्रकल्प नाशिक महापालिका आणि आमदार सीमा हिरे यांच्या विशेष निधीतून उभारला जात आहे. अनेक वर्षांपासून पेलिकन पार्क नावाने प्रलंबित असलेल्या 17 एकर जागेवर आधुनिक आणि बहुउद्देशीय सेंट्रल पार्क उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कामातील विलंबामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.
उद्यानात कार, बस व रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंग, तिकीटघर, सुमारे दोन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्फिथिएटर, वॉटर बॉडी, तसेच आकर्षक ऑर्किडियम, अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या छोट्या कार्यक्रमांसाठी ऑर्किडियम उपयुक्त ठरणार आहे. येथे पुष्पोत्सव आणि विशेष विद्युत रोषणाईची व्यवस्था, अशा आकर्षणांनाही स्थान असेल.
स्वच्छतेसाठी ई-टॉयलेटची संकल्पना, तर मुलांसाठी आधुनिक खेळणी, तसेच मुलांना मातीवर खेळता यावे यासाठी सँड फिल्डचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष उद्यान नागरिकांसाठी कधी खुले होणार याबद्दल प्रशासनाकडून ठोस भूमिका समोर न आल्याने रहिवाशांत नाराजीचा सूर तीव्र झाला आहे.
कामातील दिरंगाईचेे कारण काय? आणि प्रकल्प पूर्णत्वाला कधी जाणार? याबाबत नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहे.

 

 पार्क सुरू कधी होणार याची प्रतीक्षा
आमच्या घरासमोरच पार्क बनत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेलिकन पार्कचा विषय मार्गी लागला. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हा पार्क उभा करत त्याचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, हा पार्क नागरिकांसाठी कधी खुले होणार याबाबत उत्सुकता आहे. लवकरात लवकर चालू व्हावे, हीच अपेक्षा.
– बाळासाहेब पांडुरंग आव्हाड, स्थानिक नागरिक

जनतेच्या पैशांची नासाडी
महापालिकेकडून आहे त्याच छोट्या-मोठ्या उद्यानांची देखभाल होत नाही. सिडकोतील एवढा मोठा भूखंड हा हॉस्पिटल अथवा शासनाच्या प्रकल्पासाठी वापरला असता तर सिडकोवासीयांना अधिक फायदा झाला असता. अनेक वर्षांपासून चालू असलेले काम व आजवर कोट्यवधींंचा झालेला खर्च म्हणजे जनतेच्या पैशांची नासाडीच आहे.
– विजय देसले, स्थानिक नागरिक

अट्टाहास कशासाठी?
सिडकोसारख्या वसाहतीत पार्कसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कोणाला फायदा होणार आहे? मुळातच याठिकाणी पूर्वी पार्क होताच. तो चालत नसल्याने बंद पडला. मग पुन्हा एवढ्या मोठ्या भूखंडावर कोट्यवधी रुपये खर्च करून पुन्हा पार्कचाच अट्टाहास कशासाठी? गणेश चौकातील शाळा तोडून दाट वस्तीत हॉस्पिटल करण्यापेक्षा याठिकाणी प्रशस्त जागेत शासनाचे सुसज्ज असे मोठे हॉस्पिटल झाले असते. त्याचा नागरिकांना अधिक फायदा झाला असता.
– विजय महाले, स्थानिक नागरिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *