सात महिन्यांत चार हजार शस्त्रक्रिया
नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेल्याचा प्रकार शहरातील सातपूर, सिडको, नाशिकमधील जयभवानी रोड परिसरात घडला होता. दरम्यान, शहरातील मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात असायला हवी याकरिता नाशिक महापालिकेतर्फे सन 2007 पासून श्वानांचे निर्बीजीककरण केले जात आहे. मात्र, निर्बीजीकरण करूनही श्वानांंची संख्या वाढत असल्याचे दिसतेे. दरम्यान, सप्टेंबर 2024 ते मार्च 2025 या सात महिन्यांत चार हजार 250 श्वानांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यात आली.
शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांच्या पुढे गेली असून, नव्याने तयार झालेल्या नववसाहतींबरोबरच मोकाट श्वानांचीही संख्या वाढली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने एक लाखाहून अधिक श्वानांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. नवीन वसाहती, रहिवासी भाग, औद्योगिक वसाहती, गोदाघाट परिसर, टाकळी रोड, शहरातील मोकळे भूखंड व परिसर, झोपडपट्ट्या, खतप्रकल्प परिसर याठिकाणी श्वानांच्या टोळकेच्या टोळके दिसतात. शहरातील चार विभागांच्या सीमा चहूबाजूंनी वाढत चालल्याने उघड्यावर खाद्यपदार्थ टाकले जातात. त्यामुळे या भागांत श्वानांंचा वावर वाढतोय. दिवसा व रात्री रस्त्याच्या कडेला बसलेले श्वान सायकल व दुचाकीस्वाराचा पाठलाग करतात. अनेकदा श्वान चावा घेऊन जखमी करते. श्वान मागे लागल्याने अपघातही घडले आहेत.
मागील वर्षाची आकडेवारी पाहिली तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा एकूण दहा हजार नागरिकांना श्वानाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. युनिव्हर्सल अॅनिमल संस्थेकडे श्वानांची शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी आहे. यापूर्वी संपूर्ण शहरासाठी श्वानांच्या निर्बीजीकरणाचा ठेका होता. मात्र, त्यानंतर त्यात विभागणी करून दोन ठेके केले. येत्या सप्टेंबरमध्ये या ठेक्याची मुदत संपुष्टात येत आहे. प्रति श्वानासाठी 995 रुपये संबंधित संस्थेला देण्यात येतात. नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी स्वतंत्र, तर उर्वरित चार विभागांचा एक, असे दोन ठेके करण्यात आले आहेत.
नागरिकांच्या तक्रारी येताच संबंधित ठिकाणाहून श्वानांना
उचलून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार हे काम केले जाते.
– डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
सात महिन्यांतील आकडेवारी
सप्टेंबर – 2024 – 386
ऑक्टोबर – 690
नोव्हेंबर – 750
डिसेंबर – 695
जानेवारी – 613
फेब्रुवारी – 717
मार्च – 2025 – 399
शस्त्रक्रियेनंतर त्याच परिसरात सोडतात
श्वानांंचे निर्बीजीकरण करूनही त्यांची संख्या वाढतेय कशी,
असा सवाल नागरिक करत आहेत. श्वानांंना शस्त्रक्रियेसाठी
जेथून पकडले जाते तेथेच शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा सोडले जाते.
मात्र, मोकाट कुत्र्यांना एकदा पकडल्यास पुन्हा तेथे सोडू नये,
यावरून नागरिक कर्मचार्यांशी वाद घालतात.
वर्षभरात दहा हजार नागरिकांना चावा
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वर्षभरात दहा
हजारांहून अधिक नागरिकांना चावा घेतल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या बिटको, डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयांसह
सात रुग्णालयांत श्वानाने चावा घेतलेल्या रुग्णांवर
औषधे व रेबीजची मोफत लस दिली जाते.