नाशिक : गोरख काळे
राज्यात प्लास्टिक बंदी कायदा असून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक वापरावर बंदी आहे. या प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो. महापालिका देखील शहर परिसरात प्लास्टिक वापरणार्यावर कडक कारवाई करत आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षात महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने सहाही विभागात 72 ठिकाणी कारवाई करत नऊ लाख दहा हजार दंड वसूल केला.
शहरभरात सुरू असलेल्या प्लास्टिक दंडात्मक कारवाईमुळे प्लास्टिक चा वापर कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र चालू वर्षात घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या कारवाईचा आकडा व दंडाची रक्कम पाहता शहरात प्लास्टिकचा वापर वाढल्याची चिंताजनक परिस्थिती पहायला मिळत आहे.
नाशिक शहरात राज्यासह पर राज्यातून प्लास्टिक येत असल्याने यावर जर प्रतिबंध लावल्यास प्लास्टिक बंदी मोहिमेस गती येऊ शकेल. एप्रिल 2022 पासून ते चालू सप्टेंबर महिन्यात प्लास्टिक वापर प्रकरणी 75 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून नऊ लाख 45 हजार दंड आकारण्यात आला आहे. अवघ्या सहा महिन्यात कारवाई गतवर्षीपेक्षा जादा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरप्रकरणी आणखी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. महापालिकेने मागील सहा महिन्यात शहर परिसरात प्लास्टिक पिशवी वापर प्रकरणी दंडात्मक कारवाई करत तब्बल नऊ लाखाचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात दंडाची रक्कम ही नऊ लाख दहा हजार इतकी होती. ते पाहता शहरात प्लास्टिक पिशवी वापर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
प्लास्टिक बंदी असल्याने नागरिकांनी प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशव्या वापराव्या. व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानामध्ये प्रतिबंध घातलेल्या प्लास्टिक पिशव्या बंद कराव्यात अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. प्लास्टिक वापरप्रकरणी सहा महिन्यात साडेनऊ लाख दंड आकारण्यात आला आहे.
– डॉ.आवेश पलोड, घनकचरा व्यवस्थापक, महापालिका