अद्ययावत नाट्यगृहाचे उद्घाटन होऊनही पडदा पडलेलाच

विकास होऊनही मूलभूत समस्यांची वानवा

                                                  लक्ष्यवेध : प्रभाग-3

धार्मिकदृष्टीने महत्त्व असलेल्या प्रभाग 3 मध्ये तपोवन परिसरात रामसृष्टी उद्यान, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्या निधीतून भव्यदिव्य अशा उभ्या राहिलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पूर्णाकृती मूर्तीमुळे या भागाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी नियमितपणे होत असलेल्या आरतीमुळे परिसरातील नागरिकांसह पर्यटकही समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान, याच प्रभागात कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत 650 प्रेक्षक बसतील असे स्व. सदुभाऊ भोरे नाट्यगृह, मीनाताई ठाकरे क्रीडासंकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क गार्डन, जॉगिंग ट्रॅक अशी महत्त्वाची कामे झालेली असतानाही प्रभागातील मूलभूत सुविधा मात्र अद्याप पूर्ण होत नाहीत. प्रभागातील अस्वच्छता अशा एकना अनेक समस्या घोंघावत असताना, मनपाच्या प्रशासकीय राजवटीत याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. अद्ययावत अशा नाट्यगृहाचे उद्घाटन थाटामाटात होऊनही त्याचा पडदा अद्याप उघडलाच नसल्याने हे नाट्यगृह कशासाठी बांधले, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
प्रभाग 3 तीन हा पंचवटीच्या मुख्य विभागातील एक प्रभाग आहे. यात प्रभू श्रीरामचंद्रांनी वास्तव्य केलेला तपोवन परिसर आहे. सिंहस्थ कुंभमेळा याच तपोभूमीत भरत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रभागात गोदाकाठ परिसरातील मरीमाता मंदिर, आयुर्वेदिक रुग्णालय, हिरावाडी परिसर, गजानन कॉलनी, ठक्कर रो-हाउस, सावतानगर आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नव्या व जुन्या वसाहतींचा हा प्रश्न असून, नवीन कुंभ असला, तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. रासबिहारी-मेरी लिंकरोडची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हिरावाडीत पाटालगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकची देखभाल केली जात नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेची काही उद्याने केवळ नावाला आहेत. अनेक उद्यानांच्या जागेत कचरा पडलेला असतो. नियमित स्वच्छता होत नाही.
या प्रभागात सिंहस्थ कुंभमेळ्याचा शाहीमार्ग असल्याने त्या मार्गातील अडथळे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने दूर करणे गरजेचे आहे. विभागीय क्रीडासंकुल असूनही साफसफाई होत नाही. हिरावाडीजवळून जाणार्‍या कालवा परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. कालव्याच्या किनार्‍यावर असलेल्या उघड्या मांसविक्री दुकानांमुळे बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्रिमूर्तीनगर रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. तपोवनातील साधुग्रामच्या जागेत डेब्रिज टाकण्यास मनाई असल्याचा फलक महापालिका प्रशासनाने लावला आहे. मात्र, या फलकाजवळून डेब्रिज टाकण्यासाठी वाहने जाण्याचा मार्ग आहे.
साधुग्राममध्ये जागोजागी डेब्रिज टाकलेले आहे. विशेष म्हणजे, या फलकाच्या पाचशे मीटरच्या अंतरावर डेब्रिज टाकू नये, असा फलक लावण्यात आलेला असताना तेथेच ते टाकले जात आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत प्रभागाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कुणीच वाली नसल्याने समस्या वाढत गेल्या. रस्ते, पाणी, पथदीप, स्वच्छता व आरोग्य यांच्या सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वामिनारायणनगरमध्ये असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचीही दुरवस्था झाल्याने सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

  या आहेत समस्या

• प्रभागात नियमित स्वच्छता नसल्याने जागोजागी कचर्‍याचे ढीग.
• परिसरातील व्यायामशाळांची दुरवस्था.
 •रामसृष्टी उद्यान परिसरात सीसीटीव्ही नसल्याने टवाळखोरांचा हैदोस, चोर्‍यांच्या प्रमाणातही वाढ.

प्रभागाचा परिसर

टकलेनगर, कृष्णनगर, गणेशवाडी, हिरावाडी रोड, गोपाळनगर, रासबिहारी शाळा, रासबिहारी शाळेमागील परिसर, गोपाळ शिवकृपानगर, कमलनगर, मीनाताई ठाकरे स्टेडियममागील परिसर, लाटेनगर, हिरावाडी रोड परिसर, विजयनगर, जनार्दन स्वामीनगर, त्रिमूर्तीनगर, महालक्ष्मीनगर, ओमनगर, क्षीरसागर कॉलनी, नवीन आडगाव नाका, एसटी डेपोमागील परिसर, पंचवटी अमरधाम परिसर, शेरी मळा, गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालय, केवडीबन, डेंटल कॉलेज परिसर, स्वामिनारायणनगर, चव्हाण मळा परिसर, स्वातंत्र्यवीर सावरकर परिसर, पवार मळा, जेजुरकर मळा, तपोवन परिसर.

     प्रभागातील विकासकामे

•  पंडित दीनदयाळ उपाध्याय थीम पार्क उद्यान.
• • ♦ अद्ययावत असे स्व. सदुभाऊ भोरे नाट्यगृह.
• • ♦ मानेनगर येथे मोठा जलकुंभ.
• • ♦ प्रभागातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण.
• • ♦ जनार्दन स्वामी महाराज, तपोवनजवळ बसडेपो.

     विद्यमान नगरसेवक

 

 

मच्छिंद्र सानप

 

 

                                                                             प्रियंका माने

 

 

रुची कुंभारकर

 

 

                                                                           पूनम मोगरे

 

  सन 2011 नुसार लोकसंख्या

•  • लोकसंख्या- 52,808
••  ♦ अनुसूचित जाती- 2,919
• • ♦ अनुसूचित जमाती- 4,245

  इच्छुक उमेदवार

विद्यमान नगरसेवकांसह काँग्रेसकडून किशोर खंडेलवाल, समाधान जाधव, गौरव गोवर्धने, शंतनू शिंदे, किरण पानकर, सचिन दप्तरे, अंबादास खैरे, सोमनाथ बोडके, सरला बोडके, डॉ. स्निग्धा खोडे, सुनीता शिंदे, उज्ज्वला बेलसरे, साधना पाटील, श्याम पिंपरकर, किशोर बेलसरे, संतोष शिंदे, वैभव खैरे, हर्षद पटेल, राहुल खोडे, संतोष लासुरे.

नागरिक म्हणतात…

स्मारकाची दुरवस्था
नाशिक महापालिकेने स्वामिनारायणनगर येथे बांधलेल्या वीर सावरकर स्मारकाची दुरवस्था झाली आहे. त्याकडेदेखील मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मारकावरील पत्रे तुटले असून, कारंजाही नादुरुस्त झाला आहे. संरक्षक भिंत पडून अपघात होण्याची शक्यता आहे.
– बाळासाहेब भवर

 

 

मद्यपींचा त्रास
स्वामिनारायणनगरच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या दारू दुकानाचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. मद्यपींची वाहनेदेखील रस्त्यालगतच पार्किंग करतात. त्यामुळे महिलांना रस्त्याने जाणे-येणे मुश्कील झाले आहे. रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झाले आहे.
– वीणा दिवटे

खड्ड्यांमुळे अपघात
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने प्रवास करताना त्रास होतो. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्त्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती केली पाहिजे.
– सागर दवंडे

 

उद्यानांची दुरुस्ती व्हावी
प्रभागातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाल्याने उपद्रव वाढला आहे. सुसज्ज असे उद्यान असल्याने, तसेच सध्याच्या उद्यानांची देखभाल होत नसून, त्याकडे लक्ष देऊन परिसरात सुसज्ज असे उद्यान होण्याची गरज आहे. महिलांसाठी विरंगुळा केंद्र उभारले पाहिजे.
– शीला राजेंद्र चव्हाण

 

अद्ययावत व्यायामशाळांची गरज
तरुणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा गरजेची आहे. ज्या आहेत त्यांची अवस्था मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे. बाहेरील व्यायामशाळेत जायचं म्हटलं तर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
– विजय भडांगे

 

छोट्या व्यावसायिकांचा विचार व्हावा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अतिक्रमण हटवताना स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.आम्ही छोटे व्यावसायिक असल्याने आमचा विचार करावा.
– नचिकेत वराडे, नचिकेत किराणा आणि जनरल स्टोअर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *