प्रगतीच्या नव्या पर्वात कुंभमेळ्यासह विकासकामांना गती

मंत्री गिरीश महाजन : प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकासकामे मंजूर आहेत. नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वात पदार्पण करीत असून, सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासह भव्य विकासकामे गतीने सुरू झाली आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे सोमवारी (दि. 26) केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदानावर सोमवारी शासकीय ध्वजवंदनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. मंत्री महाजन यांनी संचलनाची पाहणी केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अद्विता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले.
महाजन म्हणाले की, गेल्या काही वर्षांतील आव्हानात्मक काळातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे मंजूर झाली आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत सर्व विभागांच्या समन्वयाने कामे प्रगतिपथावर आहेत. नाशिकमध्ये ‘रामकाल पथ’ विकसित करण्यात येत आहे. यामुळे नाशिक जागतिक आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल. शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 65 किलोमीटरचा बाह्य वळणरस्ता (रिंगरोड) प्रस्तावित असून, या प्रकल्पामुळे शहराचा विस्तार, औद्योगिक गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. कुंभमेळ्यासाठी सुरक्षा, पायाभूत सुविधा व पर्यावरणपूरक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट
केले.
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घर घर संविधान’ उपक्रमांंतर्गत शाळा, महाविद्यालये व शासकीय संस्थांमध्ये संविधान जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संविधानाच्या मूल्यांमुळे देशाची लोकशाही अधिक बळकट झाली असून, भारताने जागतिक स्तरावर सक्षम राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात 15 हजारांहून अधिक वृक्षलागवड करून ‘हरित नाशिक’ संकल्पना राबविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्व घटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतकर्‍यांसाठी पीकविमा, सन्मान निधी, ‘मागेल त्याला सौरपंप’ यांसारख्या योजनांद्वारे थेट लाभ दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध पुरस्कारांचे वितरण

♦ हिमाचल प्रदेशात कांगडा जिल्ह्यात इंदोरा व फतेपूर ही गावे पाण्याखाली बुडाली असताना गावातील रुग्ण, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असे एकूण 468 पेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल विंग कमांडर आनंद विनायक आगाशे यांना महाराष्ट्र शासनाकडून रोख स्वरूपात 12 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
♦ नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत एरो शोमधील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत 1,56,65,664 रुपयांचा धनादेश सैनिक कल्याण निधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
♦ पोलीस आयुक्तालय नाशिक शहर व नाशिक ग्रामीण पोलीस कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश साहेबराव सोनावणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सखराम राऊत, पोलीस उपनिरीक्षक विजय प्रभाकर देवरे (नाशिक ग्रामीण) यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.
♦ कार्यालयातील नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मोहन विकास पाटील, नेमणूक पोलीस ठाणे लासलगाव नाशिक ग्रामीण. अमोल किरण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक नेमणूक पोलीस ठाणे सटाणा नाशिक ग्रामीण यांना विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मान, गुन्हेगारी नियंत्रण विशेष कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक डॉ. अंचल ईश्वरप्रसाद मुदगल, जस्विंद्रसिंग नवलसिंग राजपूत, जितेंद्र भिवराव सपकाळे यांना सन्मानित करण्यात आले.

नाशिक विभागात उत्कृष्ट शेतीशाळा स्पर्धा, उत्कृष्ट पीक प्रात्यक्षिक गट स्पर्धा आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड यांचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील सहाय्यक कृषी अधिकर्‍यांनी विभाग व जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा व महाविस्तार अ‍ॅपअंतर्गत राष्ट्रीय व राज्यस्तरावरदेखील सहाय्यक कृषी अधिकार्‍यांनी यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजनेंंतर्गत गोकुळधाम सेवा प्रतिष्ठान, नांदडगाव, ता. इगतपुरी जिल्हास्तरीय गोवंश प्रक्षेत्र विभाग निवडीद्वारे श्रेष्ठ राजदूत म्हणून डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *