सुरक्षा कर्मचार्यांची अरेरावी, चित्रफितीने खळबळ
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी (दि. 1 मार्च) भाविकांना माराहाण झाल्याच्या दोन स्वतंत्र चित्रफिती समाजमाध्यमात झळकल्याने येथील व्यवस्थेवर जनमानसात टीका करण्यात येत आहे. या मारहाणीबाबत त्र्यंबक पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. मात्र, समाजमाध्यमात फिरत असलेली चित्रफितीने खळबळ उडवली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी सकाळच्या वेळेत आलेल्या हरियाणा येथील भाविकाने सभामंडपात असलेल्या दर्शनबारीत आरसे महालाजवळ बैठक मारून तेथे ध्यान करत बसला. बराच वेळ बाजूला न झाल्याने सुरक्षारक्षकांनी त्याला उचलून सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाच्या पायरीवर बसवले. नंतर काही वेळाने त्या भाविकाने सभामंडपात येऊन गर्भगृहाच्या उंबर्यावर डोके ठेवून दर्शन घेतले. यावेळी त्याला गर्भगृहासमोरून बाजूला करत असताना त्याचा ट्रस्टच्या सुरक्षारक्षकाबरोबर वाद झाला. तेथे तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये भाविकाच्या अंगावर असलेले कपडे फाटले.
दरम्यान, तेथे असलेल्या एमएसएफ जवान त्याला बाजूला घेऊन गेला. या हाणामारीत मंदिर ट्रस्टच्या सुरक्षारक्षकाच्या डोळ्याच्या बाजूला इजा झाली आहे.दुसर्या चित्रफितीमध्ये दुपारच्या वेळेस पूर्व दरवाजा दर्शनबारीत एक भाविक बॅरेकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एमएसएफ सुरक्षारक्षक कर्मचारी त्याला पायाने लाथा मारून हुसकावून लावत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटनांबाबत एमएसएएफ डायरी मध्ये नोंद केली आहे. सभामंडपात मारहाण झालेला भाविक मनोरुग्ण असून, तो नशेत होता. तो वारंवार गर्भगृहाच्या उंबर्यावर डोके ठेवण्यासाठी आग्रह धरत होता. दुसर्या घटनेतील व्यक्ती पूर्व दरवाजा दर्शनबारीत महिलांची छेड काढत होता. महिलांच्या तक्रारीवरून त्याला हुसकवण्यात आले. त्यावेळेस हातापायी झाली, असे म्हटले आहे. दरम्यान, देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनावर टीका होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विश्वस्त पुरुषोत्तम कडलग आणि कैलास घुले यांना याबाबत खुलासा जाहीर केला आहे. यामध्ये भाविकांची चूक झाल्याचे नमूद केले आहे. याबाबत त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. त्र्यंबकेश्वर येथे भक्तांना होत असलेल्या मारहाणीचे पडसाद समाजमाध्यमात उमटले आहेत. याचा थेट परिणाम येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर होत आहे. सोमवारी काही प्रमाणात गर्दी कमी झालेली दिसून आली. भाविकांमध्ये देखील सुरक्षारक्षक कर्मचारी मारहाण करतात, याबाबतची चर्चा होती.
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याची माहिती चुकीची आहे. हरियाणा येथील भाविक नशा केलेल्या अवस्थेत मंदिर परिसरात गैरवर्तन करत होता. त्याने सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की केली, तसेच इतर भाविकांनाही त्रास दिला. या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली.
– पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त, देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर