त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाघाटावर भाविकांची गर्दी

लक्षदीपांनी उजळला गोदाघाट

पंचवटी : प्रतिनिधी
त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवाच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधःकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पवित्र स्नान करून तुपाच्या वाती जाळण्यासाठी व नदीपत्रात दिवे सोडण्यासाठी बुधवारी (दि. 5) भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणार्‍या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व असते. कार्तिक पौर्णिमेला देवी-देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी देवी-देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमायाचना मागावी, तसेच देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावला जातो. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य दिल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते, असे मानले जाते. यामुळे गोदावरीत स्नान करून अर्घ्य देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनच्या वतीने या गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *