
पंचवटी : प्रतिनिधी
गोदाकाट परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिरात गुरुवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिरासह पंचवटी परिसरातील इतर दत्त मंदिरांमध्येही पूजा, अभिषेक, आरती आदी कार्यक्रम झाले.
एकमुख दत्त मंदिरात श्री दत्त जन्म महोत्सव सुरू असून, महोत्सवातील दत्त जयंतीनिमित्त मुख्य पूजाधिकारी मयूर बर्वे यांच्या हस्ते पूजा, अभिषेक करण्यात आला. महोत्सवात ह.भ.प. प्रभंजन भगत लोणी यांची दत्त महात्म्य कीर्तनमाला सुरू आहे. बुधवारी श्री अनुसूया मातेची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. गुरुवारी (दि. 4) सायंकाळी श्री दत्त जन्म सोहळा व आरती करण्यात आली. दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी लांबवर रांगा लागल्या होत्या. प्रवेश आणि बाहेर जाण्याचे स्वतंत्र मार्ग करण्यात आले होते. शनिवारी (दि. 7) श्री दत्तगुरूंचा नामकरण सोहळा 56 भोग कार्यक्रम होईल. सोमवारी (दि. 8) दत्तयाग व पूर्णाहुती होणार आहे. गुरुवारी (दि. 11) रोजी श्रींची महाआरती व पालखी सोहळा होईल.
पंचवटी पोलीस ठाण्यात महाप्रसाद
पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारातील श्री दत्त मंदिरात परिसरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मखमलाबाद येथे महाप्रसाद
मखमलाबाद गावातील कोळीवाडा परिसरातील तसेच मानकर पेट्रोल पंपासमोरील दत्त मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दोन्ही मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.