संक्रांतीनिमित्त गोदाघाटावर स्नानासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर गोदावरी नदीकाठावरील रामकुंड व गोदाघाट परिसरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. संक्रांतीला गोदावरी स्नान केल्याने पुण्य लाभते, या श्रद्धेने कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता भाविकांनी रामकुंड येथे पवित्र स्नान केले. देवदेवतांचे नामस्मरण करत भाविकांनी गोदावरीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले.
मकरसंक्रांतीनिमित्त स्नानानंतर तीळ, धान्य, हरभरे, इतर वस्तू तसेच नवीन कपड्यांचे दान करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने गोदाघाट परिसरात दानधर्म करणार्‍या भाविकांची मोठी वर्दळ दिसून आली. त्यामुळे संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अनेक ठिकाणी दान स्वीकारण्यासाठी स्वयंसेवक व धार्मिक संस्था कार्यरत होत्या.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कडाक्याची थंडी जाणवत असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वृद्ध, महिला, युवक तसेच लहान मुलेही गोदावरी स्नानासाठी उपस्थित होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. स्नानानंतर भाविकांनी गोदाघाट परिसरातील प्रसिद्ध कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, गोरेराम मंदिर आदी देवस्थानांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकांकडून मार्गदर्शन करण्यात
येत होते.

पर्यटकांची स्नानासाठी मोठी गर्दी

नाशिककरांसह संक्रांतीच्या स्नानासाठी पर्यटकांनीदेखील गर्दी केल्याचे चित्र होते. मतदानाची सुट्टी आणि संक्रांतीची सुट्टी जोडून आल्याने भाविकांची चांगलीच गर्दी रामकुंडावर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

Devotees throng to take bath at Godaghat on the occasion of Sankranti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *