त्र्यंबकेश्वर गौतम ऋषी मार्गावरील थरारक घटना, सहा आरोपी अटकेत
घोटी : प्रतिनिधी
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील पवित्र आणि श्रद्धेचे केंद्र मानल्या जाणार्या ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गावर देवदर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गौतम ऋषी मार्गावरील धाडोशी परिसरात अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या (रा. राहुरी) दहा भाविक महिलांवर शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या थरारक घटनेनंतर घोटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत सहा संशयित आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दि.28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ब्रह्मगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करत असताना रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या सहा व्यक्तींनी अचानक भाविक महिलांसमोर येत कोयते दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी ‘पैसे व सोने काढून द्या, अन्यथा ठार मारू’ अशी दहशत निर्माण करत महिलांना काठ्यांनी मारहाण केली. या झटापटीदरम्यान महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, रोख रक्कम, पर्स तसेच मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले. या दरोड्यात एकूण सुमारे एक लाख 19 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
लुटलेल्या ऐवजामध्ये 35 हजार रुपयांची सोन्याची पोत, पर्समधील 4 हजार रुपये, 28 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 5 हजार किमतीचा मोबाइल, पर्समधील 3 हजार रुपये तसेच 5 हजार रुपयांचा दुसरा मोबाइल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या दरोड्यात सर्व पीडित महिला भाविक असून, त्यामध्ये मुक्ता शिंदे, चंद्रकला शिंदे, अंजली खाडे व फिर्यादी कीर्ती शिंदे यांना आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास राबवत अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींच्या वर्णनावरून शोध घेत सर्वच्या सर्व सहा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. या धडाकेबाज कारवाईमुळे भाविकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे चेतन रामदास गुंड (वय 22, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), वैभव रंगनाथ झोले (वय 20, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), नवनाथ सुक्रा गुंड (वय 27, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक), अनिल जाधव (वय 23, रा. झारवड खुर्द, ता. त्र्यंबक), पांडुरंग जाधव (वय 24, रा. झारवड खुर्द, ता. त्र्यंबक) व अमोल गुंड (वय 21, रा. धाडोशी, ता. त्र्यंबक) अशी असून, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कीर्ती प्रभाकर शिंदे (रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 15 रोजी त्या व इतर महिला भाविक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर दि. 16 रोजी रात्री सुमारे 1 वाजता कुशावर्त येथे कुंडावर स्नान करून त्या गौतम ऋषी मंदिराच्या दिशेने पायी निघाल्या असता, मुख्य रस्त्यापासून आत वळण घेत असलेल्या ठिकाणी पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास झुडपात लपून बसलेल्या सहा व्यक्तींनी अचानक समोर येत हा दरोडा टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात सहा संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, हवालदार प्रकाश कासार, गुरुदेव मोरे, श्रावण साळवे, संतोष नागरे, लक्ष्मण धकाटे, सतीश शेलार, आहेर, सनी भवर, अनिकेत मोरे व गौरव सोनवणे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावत आरोपींना गजाआड
केले आहे.
Devotees were robbed at gunpoint