धनतेरस हा दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस धन्वंतरी या देवतेचा वाढदिवस म्हणून हजारो वर्षांपासून लोकप्रिय आहे. आरोग्य देवतेचा वाढदिवस व लक्ष्मीपूजन, ‘आरोग्य हीच खरी लक्ष्मी आहे’ हेच सुचवून जाते. हेच खरे लक्ष्मीपूजन. पृथ्वीतलावरील प्रथम 14 रत्नांपैकी एक, पहिले चिकित्सक मनुष्याच्या शरीर व मनाला त्रास देणार्या घटकांचा नाश करण्यासाठी अवतरले, प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनतेरस, धन्वंतरी जयंती!
धन्वंतरीच्या चार हस्तांपैकी एका हातात शंख, दुसर्यामध्ये चक्र, तिसर्यामध्ये जळू व चतुर्थमध्ये अमृताचा कलश.हे पाहताच असुरांनी अमृताचा कलश पळवला, असे म्हटले जाते. व त्या प्रवसात ज्या ज्या ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, ती क्षेत्र धन्य झाली. त्यापैकी एक नाशिक. भगवान धन्वंतरीच्या हातातील आयुधे मनुष्यामध्ये निर्माण होणार्या सर्व व्याधींवरील निश्चित व नेमके उपाय ठरतात. आजच्या काळातील वातावरणातील बदल पाहून भगवान धन्वंतरीच्या हातातील शंखाची आवश्यकता वाटते. शंखनादाने वातावरणाची शुद्धी ही मनुष्याच्या आरोग्याला गरजेची याची जाणीव धन्वंतरींना होती. धर्म शास्त्रकारांकरवी शंखनादाचा पूजनाच्या वेळेस कमी झालेला वापर हे भूतलावरील बदलाला कारणीभूत तर नाही ना, यावर चिंतन व संशोधन करायला हवे.शस्त्रक्रियेने अनेकविध क्लिष्ट व कठीण व्याधी बरे होतात. शस्त्रक्रिया करण्याचे प्रतीक चक्रामध्ये प्रकट केले आहे. चक्राची गती, अचूकता ही भगवान धन्वंतरींना अपेक्षित असून, त्यातील नेमकेपणा वैद्यांना ज्ञात असावा, हा संदेश व इच्छा व्यक्त केलेली आहे.
जालौका या प्राण्याच्या गुणधर्माचा उपयोग, शस्त्र व औषधांनी जे व्याधी नष्ट होत नाही, ते जळूद्वारे अशुद्ध रक्ताचे शोषण करून व्याधी बरे करण्यासाठी करतात. शंख व जळू यांच्या उपयुक्ततेवर पाश्चात्य शास्त्रज्ञांनी प्रयोग करून यशस्वी निष्कर्ष समोर मांडले आहे. लंडनमधील रोयल कोलेज या जगप्रसिद्ध चिकित्सा विद्यालयात जळूद्वारे अत्यंत सूक्ष्म अशा शस्त्रक्रियेच्यावेळी रक्त शोषून घेण्यासाठी उपयोग करतात. त्या ठिकाणी एक इमारत जळू चिकित्सेची आहे. आपल्या चार हातांत अवघ्या भूतलावरील जीवमात्रांचे आरोग्य भगवान धन्वंतरीने सामावले असून, भगवान धन्वंतरींनी शस्त्रक्रियेचे ज्ञान भगवान सुश्रुताचार्यांना दिले व सुश्रुताचार्य हे शस्त्रक्रियेचे जनक मानले जातात.आयुर्वेदाचे ज्ञान धन्वंतरींकडून शिष्यांना मिळत चरकाचार्यांनी ते वृद्धिंगत केले व भूतलावरील सर्व पंचभोतिक वृक्ष, धातूईच्या प्रयोगाने चिकित्सा ग्रंथ चरक संहिता निर्माण झाला. चरकाचार्यच्या या ग्रंथात कोणत्याही युगात निर्माण झालेल्या, होणार्या व्याधींचे वर्णन आहे. त्यामुळे चरकसंहितेचा अभ्यास पाश्चात्य देह करीत आहेत. सुश्रुताचार्य भूल न देता अनेक शस्त्रक्रिया यशस्वी करीत असत, असा उल्लेख आढळतो. जो भगवान धन्वंतरीचे स्मरण करील तो सर्व व्याधी दोषांपासून मुक्त होईल. धन्वंतरींना विष्णूचा अवतार मानले जाते. धन्वंतरीच्या परिवारात आयुर्वेद रुजलाच नाही तर आयुर्वेद भगवान धन्वंतरीकडून गुरू-शिष्य परंपरेने प्रसारित झाला. धन्वंतरीचे मंदिर गुजरातमध्ये एकमेव असल्याचे सांगतात. गुजरातमध्ये भगवान धन्वंतरीची समाधी असल्याचे सांगितले जाते. दक्षिणेत ही धन्वंतरीच्या मूर्ती आढळतात, जेथे मनोभावे पूजाही नियमित केली जाते. तामिळनाडूमध्ये श्री रंगनाथ स्वामी मंदिरात धन्वंतरी मूर्ती असून, नित्य पूजा होत असते. या धन्वंतरीच्या मंदिरासमोर 12 व्या शतकातील कोरलेले दगड असून, त्यावर त्या काळातील प्रसिद्ध वैद्य गरुड वाहन भत्तर यांंची माहिती आढळते. या मंदिरात आजही धन्वंतरीचा प्रसाद म्हणून विविध वनस्पतींचे उकळलेले मिश्रण तीर्थ म्हणून भक्तांना दिले जाते. केरळमध्ये अनेक वैद्य घराणी व सामान्य घरांमध्येही नियमितपणे धन्वंतरी पूजन होत असते. गुरुवायूर या प्रसिद्ध स्थानापासून वीस किलोमीटरवर नेलीवया या गावात गुरुवायूर व त्रिचूरच्या अगदी मध्यावर भगवान धन्वंतरीचे मंदिर आहे. गुरुवायूर मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे इतिहास सांगतो.केरळमधील अनेक वैद्य या मंदिरात व्यवसाय सुरू करण्याअगोदर पूजनासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मंदिरात लिलीच्या फुलांनी कायम बहरलेले तळे आहे.कालिकतमध्ये धन्वंतरी क्षेत्र असून, या ठिकाणी विविध स्थानांतून अनेक रुग्ण आपल्या शरीराची त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. भगवान धन्वंतरी आज केवळ महाराष्ट्रापुरते, भारतापुरते मर्यादित नसून, जगभरातील अनेक देशांमध्ये आपल्या गुणांनी प्रसिद्ध झाले आहे. आज विविध विषाणूंच्या वाढीच्या काळात, जनोपदध्वंसक व्याधींच्या प्रसाराच्या काळात भगवान धन्वंतरीचे आशीर्वाद सर्वांसाठी विश्वकल्याणासाठी हवेत व तशी प्रार्थना या विश्वातील प्रथम चिकित्सकाकडे करूया.
श्री धन्वंतरी ये नम;
कासास्य कसी तत पुरो ,
राष्ट्रो दीर्घतम: पिता धन्वंतरी दीर्घतमसा,
आयुर्वेद प्रवर्तक: यज्ञ भुग वसुदेवा:
स्मृता; मात्र आर्तिनाशक॥