मधुमेह’ हा शब्द मोठा गोड, काव्यात्म वगैरे वाटत असला तरी ते एका आजाराचे नाव आहे. मधुमेह नाही त्याला त्याचे काही नाही; पण ज्याला आहे त्याला त्याची सतत आठवण ठेवून वागावे लागते. एखाद्या सहचरासारखाच मग तो वाटू लागतो. जगाला भेडसावणार्या आरोग्यविषयक समस्यांपैकी तो एक मानला जातो. सध्या भारतात 6.2 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. म्हणजेच भारताच्या प्रौढ लोकसंख्येच्या 7 टक्के लोकांना या विकाराने ग्रासले आहे. दरवर्षी या आजाराला 10 लाख लोक बळी पडतात ही भारताची सद्यस्थिती आहे. ही आकडेवारी बदलणारी; परंतु दुर्दैवाने वाढणारी असते. मधुमेही व्यक्तींना इतर आजारांशी सामना करणे कठीण जाते. त्यामुळे त्याचे गांभीर्य वाढत असले तरी त्याला न घाबरता संयमाने, आहार-विहारावर नियंत्रण ठेवून त्याला काबूत ठेवणारे अनेक बहाद्दर आपल्याला दिसतात. मधुमेहाला असा ताब्यात ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप समजून घेतले पाहिजे.
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला आपले काम करण्यास ऊर्जेची आवश्यकता असते. स्निग्ध पदार्थ, प्रथिने व कर्बोदके या तीन स्त्रोतांमधून ही ऊर्जा मिळते. यातील कर्बोदके ऊर्जेचे प्राथमिक स्त्रोत म्हणून उपयोगास येतात. कर्बोदकांचे विघटन होऊन ग्लुकोज म्हणजेच शर्करा निर्माण होते. आतड्यांमधून शर्करा रक्तात शोषली जाते आणि रक्ताभिसरणाबरोबर ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते; मात्र या शर्करेचा पेशींना उपयोग होण्यासाठी इन्शुलिन या संप्रेरकाची आवश्यकता असते. इन्शुलिन नसेल, तर पेशींना शर्करा ऊर्जा म्हणून वापरता येत नाही. जठराच्या मागे पँक्रियाज (स्वादुपिंड) ही ग्रंथी असते. या ग्रंथीतून इन्शुलिन या संप्रेरकाचा (हार्मोन) स्त्राव नियमितपणे होत असतो.
नरेडकोचे २२ डिसेंबरपासून नाशकात भव्य होमथॉन प्रदर्शन
रक्तातील शर्करेच्या पातळीप्रमाणे याचे प्रमाण कमी-जास्त होत असते. जेवणानंतर काही वेळाने हा स्त्राव वाढतो. पेशीच्या आवरणातील विशिष्ट प्रथिनांबरोबर इन्शुलिनचा संयोग झाल्याशिवाय रक्तातील शर्करा पेशीमध्ये प्रवेश करू शकत नाही. शर्करा नसेल, तर पेशीला तिच्या कार्यासाठी ऊर्जा उपलब्ध होऊ शकत नाही आणि ती आपले काम व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. पेशींच्या अशा प्रकारच्या उपासमारीचा सर्वाधिक फटका मेंदूला बसतो. पेशींमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे रक्तातील शर्करेची पातळी वाढते. सामान्यतः रक्तातील शर्करेची (ग्लुकोज) पातळी उपाशीपोटी 110 मि.ग्रॅ. पेक्षा कमी आणि
जेवणानंतर दोन तासांनी 140 मि.ग्रॅ. पेक्षा कमी असते. रक्तातील शर्करेची पातळी वाढल्यामुळे पेशींमधील पाणी रक्तात ओढले गेल्याने पेशी शुष्क होतात. त्यामुळे तहान लागते. रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. पेशींना शर्करा न मिळाल्यामुळे पेशींकडून उपासमारीचा संकेत मेंदूला मिळतो. त्यामुळे भूक वाढते; मात्र इन्शुलिनच्या अभावामुळे शर्करेचा वापर करू न शकल्यामुळे पेशींना इजा होऊन वजन घटायला सुरुवात होते.
पाईपलाईनला गळती , जेलरोडला पाणी खंडित
जनुकीय दोष
काही रुग्णात इन्शुलिनचा स्त्राव पुरेसा असतो; पण त्यांच्या रक्तात इन्शुलिनविरोधी प्रतिद्रव्य (अँटिबॉडी) जास्त प्रमाणात असल्याने इन्शुलिनचा परिणाम साधला जाऊ शकत नाही. भारतातील मधुमेही रुग्णात अशी प्रतिद्रव्ये असणार्यांची संख्या अधिक आढळते. त्याचे कारण जनुकीय दोषात आहे. विशेषतः लठ्ठ व्यक्तीत प्रतिद्रव्यांचे प्रमाण अधिक असल्याने कृत्रिम इन्शुलिनची गरज जास्त असते.
मधुमेहाची प्राथमिक लक्षणे इन्शुलिनच्या अभावामुळे अशा प्रकारे दिसून येतात. तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, भूक वाढणे, आहार वाढणे; मात्र थकवा येणे व वजन घटत जाणे, या सगळ्या गोष्टी रक्तातील वाढलेल्या शर्करेमुळे दिसू लागतात. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण 180 मिलिग्रॅम असेपर्यंत मूत्रपिंड उत्सर्जनात शर्करा जाऊ देत नाही; मात्र हे प्रमाण वाढल्यानंतर लघवीवाटे साखर बाहेर पडायला लागते. हजारो वर्षांपूर्वी मधुमेही व्यक्तींच्या लघवीभोवती मुंग्या जमा होतात, हे लक्षात आले होते. मूत्र परीक्षणामध्ये अशा वेळेस लघवीमध्ये ग्लुकोज आढळते. ग्लुकोज अभावी उपाशी पेशींमधील मेदाम्ले (फॅटी ऍसिड) व प्रथिनांचे विघटन होऊन ऊर्जेसाठी ग्लुकोजची नवनिर्मिती होते. या प्रक्रियेत किटोनसारखे उपपदार्थ तयार होतात. ज्यामुळे रक्तातील आम्लता वाढते आणि लघवीमध्ये किटोन दिसून येतात.
इन्शुलिन निर्मितीच्या अभावाबरोबरच पेशींवरील इन्शुलिनच्या प्रभावाचा अभाव यामुळेसुध्दा मधुमेह होतो. अशा व्यक्तींमध्ये रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण वाढलेले असतानाही रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते. याला चयापचयातील बिघाड (मेटाबॉलिक सिंड्रोम) म्हणून ओळखले जाते. या व्यक्तींचे वजन सरासरीपेक्षा जास्त असते. विशेषतः अतिरिक्त चरबीमुळे कमरेचा घेर वाढलेला असतो. त्यांचा रक्तदाबही वाढलेला असतो आणि रक्तातील मेदाची पातळी जास्त असते. (कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराईड) अशा व्यक्तींची रक्तशर्करा कृत्रिम इन्शुलिनपेक्षा गोळ्यांनी कमी करणे सोपे असते. मेटाबॉलिक सिंड्रोमच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराची शक्यता इतर मधुमेही व्यक्तींपेक्षा अधिक असते.
शारिरीक, मानसिक आरोग्यासाठी योग उपयुक्त
मधुमेह होण्याची कारणे-
1) अनुवंशिकता- आपले आई-वडील किंवा जवळच्या नातेवाइकांमध्ये मधुमेह असल्यास आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. याला ’मधुमेहपूर्व’ (प्रीडायबेटिक) स्थिती म्हणतात.
2) लठ्ठपणा-उंचीवर आधारित अपेक्षित वजन सरासरीपेक्षा 20 टक्क्याहून अधिक असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या पेशी रक्तातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत.
3) व्यायामाचा अभाव- व्यायाम न करणार्या, विशेषतः सतत बैठे काम करणार्या व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असते.
4) आहारशैलीतील बदल- उशिरा जेवणे, दोन जेवणांमधील अंतर जास्त असणे; यामुळे स्वादुपिंडावर ताण पडतो आणि त्यांची कार्यक्षमता मंदावते. फास्टफूड किंवा जंकफूड उदा. पिझ्झा, बर्गर तसेच कोल्ंिड्रकमधील काही घटक स्वादुपिंडावर अनिष्ट परिणाम करतात. कोल्डड्रिंक्स तसेच फळाच्या रसांमध्ये साखर खूप असते. त्यांच्या सेवनानंतर रक्तशर्करा वाढते. त्या साखरेचा वापर करण्यासाठी स्वादूपिंडांना अधिक प्रमाणात इन्शुलिन निर्माण करण्याचा ताण पडतो. हे नियमितपणे होत राहिल्यास स्वादुपिंडांची कार्यक्षमता कमी होते. यांच्या अतिरिक्त सेवनामुळे मधुमेहाचे प्रमाण तरुण पिढीमध्ये वाढीस लागले आहे.
5) विशिष्ट पोषण द्रव्यांचा अभाव- ज्या मातीत उगवलेले अन्न आपण सेवन करतो, त्या मातीत क्रोमियम, सेलेनियम, झिंक या धातूंचा अभाव असला तर इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. औषधांच्या स्वरूपात या घटक द्रव्यांची पुरवणी शरीरास मिळाली, तर मधुमेही व्यक्तींमधील इन्शुलिनची आवश्यकता कमी होऊ शकते.
6) औषधे- उच्च रक्तदाबासाठी वापरण्यात येणारी काही मूत्रवर्धक औषधे उदा. थायाझाईड, फ्युरोसेमाईड तसेच काही दाब नियंत्रक औषधे उदा. बीटा ब्लॉकर, क्लोनिडिन याप्रमाणे काही वेदनाशमके व मनोविकारांवरील औषधांमुळे रक्तशर्करा वाढू शकते.
मधुमेहाची प्राथमिक लक्षणे-
पेशींना पुरेशी शर्करा उपलब्ध न होणे, तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील लक्षणे आढळतात. 1) थकवा, आळस, जडत्व, निष्क्रियता.
2) सतत तहान लागणे, तोंड कोरडे पडणे.
3) वारंवार लघवीला जावे लागणे. रात्री बर्याच वेळा लघवी करण्यासाठी उठावे लागणे.
4) पूर्वीपेक्षा जास्त भूक लागणे.
5) वजनात घट होत जाणे.
6) जखमा लवकर बर्या न होणे, जखमा चिघळणे. 7) अंगाला खाज सुटणे.
8) मूत्रमार्गाचा वारंवार संसर्ग होणे, लघवीला लागणे, लघवीच्या जागी खाज येणे, लघवीतून रक्त किंवा पू येणे.
9) हिरड्यांचे विकार होणे.
10) हाता-पायांना मुंग्या येणे, बधीरपणा येणे, संवेदना कमी होणे.
11) दृष्टी अंधुक होणे.
12) घामाचे प्रमाण वाढून दुर्गंधी येणे.
(13) सारखी झोप येणे.
14) नखे व केसांची अतिरिक्त वाढ, जळवात.
15) प्रगत मधुमेहात हृदयविकाराची तसेच मूत्रपिंड विकाराची लक्षणे दिसतात. पायाचे गँग्रीन होणे, हृदयविकाराचा झटका, तसेच लघवीचे प्रमाण कमी होऊन सूज चढणे शक्य आहे.
मधुमेहाची गंभीर लक्षणे-
उपाशी पेशींना शर्करा न मिळाल्यामुळे ऊर्जेसाठी पर्यायी स्त्रोतांचा वापर सुरू होतो. मेदाम्लांचे विघटन ग्लुकोजमध्ये होते. या प्रक्रियेत किटोन या उपपदार्थांची निर्मिती होते. यांचे रक्तातील प्रमाण वाढल्यामुळे हळूहळू शुद्ध हरपते. वेळीच उपचार न झाल्यास काही तासात किंवा दिवसात मृत्यू संभवतो. आपत्कालीन – गंभीर समस्या.
1) रक्तशर्करा 70 मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी झाल्यामुळे घाम येणे, हात-पाय थरथरणे, छातीत धडधडणे, चक्कर येणे, अंधारी येणे, अशक्तपणा वाटणे. 2) रक्त, लघवीमध्ये किटोन्स आढळणे- रक्तशर्करेचे प्रमाण खूप वाढते. पेशींना शर्करा न मिळाल्यामुळे चरबीचे विघटन व्हायला लागते. या प्रक्रियेतून किटोन्सची निर्मिती होते. यामुळे रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढते. श्वसनाची गती वाढते. लघवीला जास्त होते. शरीरातील पाणी कमी होते. हळूहळू शुध्द हरपून रुग्ण कोमामध्ये जातो. ’ दीर्घकालीन समस्या- धमनीकाठिण्य शरीरातील सर्व धमन्यांना हा विकार कमी अधिक प्रमाणात ग्रासतो. यामुळे सर्व अवयवांचा रक्तपुरवठा कमी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते. यामुळे खालील धोके संभवतात. 1) हृदयविकाराचा झटका. (हार्ट ऍटॅक) 2) अर्धांगवायूचा झटका. (पॅरालिसिस) 3) मूत्रपिंडाचे विकार.
4) दृष्टिदोष.
5) मज्जातंतूंचे विकार.
6) आतड्यांचे विकार.
7) बर्या न होणार्या जखमा.
8) गँग्रीन व ऍम्प्युटेशन.
मधुमेहाचे प्रकार-
1) टाईप 1- मधुमेहाच्या एकूण रुग्णाच्या 10 टक्के रुग्णात हा पहिला प्रकार आढळतो. या प्रकारच्या मधुमेहाची –लक्षणे बालवयातच दिसून येतात. या मुलांच्या स्वादुपिंडाची … इन्शुलिन निर्मितीची क्षमता कमी असते. यांना रक्तशर्करा कमी करण्याच्या गोळ्यांचा उपयोग होत नाही. केवळ इन्शुलिन इंजेक्शनच त्यांची साखर नियंत्रणात ठेवू शकते. 2) टाइप 2 – या प्रकारचा मधुमेह सहसा पन्नाशीनंतर होतो. मधुमेही रुग्णांपैकी 80% रुग्ण या प्रवर्गात मोडतात. हा टाइप 1 पेक्षा सौम्य स्वरूपाचा असतो. बरेच दिवस त्रास झाल्यावर या विकाराचे निदान किंवा त्रास न होताही नियमित चाचण्यात रक्तातील साखर वाढल्याचे लक्षात येते. या रुग्णात इन्शुलिनची निर्मिती कमी पडते किंवा प्रतिद्रव्यांमुळे त्याची परिणामकारकता कमी पडते. या विकाराची वाढ धिमी असते. सुरुवातीला आहारावरील नियंत्रण व गोळ्यांनी रक्तशर्करा कमी राहते. प्रगतावस्थेत इन्शुलिनची गरज पडू शकते.
3) तारुण्यातील मधुमेह- मधुमेहाच्या या प्रकाराची सुरुवात पंचविशीच्या आसपास होते. या रुग्णांना गोळ्यांबरोबर इन्शुलिनची आवश्यकता प्राथमिक अवस्थेतच पडू शकते. जीवनशैलीतील नकारात्मक बदलांमुळे या मधुमेहाचे प्रमाण वेगाने वाढते आहे.
4) गरोदरपणातील मधुमेह- या मधुमेहाची लक्षणे गरोदरपणाच्या दुसर्या किंवा तिसर्या तिमाहीत दिसायला लागतात. सरासरी 2% महिलांना असा मधुमेहाचा त्रास होतो. या मधुमेहाचे प्रमाणही वाढते आहे. पीडित स्त्रियांचे
बाळ बर्याचदा अपुर्या दिवसांचे जन्माला येते. या बाळांना हृदयविकार, यकृताचे विकार संभवतात. या स्त्रियांना कायमस्वरूपी मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते; पण तो सरासरी 5-10 वर्षांनी होतो.
मधुमेहाचे निदान-
1) मूत्र परीक्षण- प्रक्रिया केलेल्या कागदी पट्ट्या मूत्र परीक्षणासाठी वापरल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या पट्ट्यांमुळे संपूर्ण माहिती मिळू शकते. लघवीतील साखरेच्या पातळीप्रमाणे ग्लुकोस्टिक रंग बदलते. जर साखरेचे प्रमाण खूप जास्त असेल, तर किटोनसाठी चाचणी केली जाते. हे सहसा टाईप 1 च्या मधुमेहामध्ये दिसून येतात. आजाराचे स्वरूप गंभीर असल्याचे ते निदर्शक आहे. मधुमेह बर्याच दिवसांपासून असेल, तर मूत्रपिंड म्हणजेच वृक्काच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सामान्यतः लघवीतून प्रथिने शरीराबाहेर पडत नाहीत; मात्र दीर्घकाळच्या मधुमेहामुळे वृक्काची गाळणक्षमता कमी होऊन लघवीतून प्रथिनांचा -हास होतो. हेसुध्दा मूत्र परीक्षणाद्वारे मोजले जाऊ शकते. प अधिक संवेदनक्षम चाचणी म्हणजे क्षकिरणभारित रसायनाच्या सहाय्याने मायक्रो अल्बुमिन परीक्षण करणे.
2) रक्त परीक्षण- रक्तातील साखर दोन प्रकारे तपासली जाऊ शकते. बोटाच्या टोकाला सुईने टोचून ग्लुकोस्टिकद्वारा आपण स्वतः साखरेची पातळी जाणू शकतो; पण हातातील नीलेतून रक्त घेऊन लॅबमध्ये जी तपासणी केली जाते ती जास्त बिनचूक असते. बरेचसे मधुमेही घरच्या घरी रक्तशर्करा तपासणी करून इन्शुलिनचा डोस कमी-जास्त करू शकतात. एचबीए1सी म्हणजे ग्लायकोसिलेटेड () हिमोग्लोबिन ही एक अतिशय महत्त्वाची चाचणी आहे. तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा पातळी यावरून समजते. नियमित औषधे न घेतल्यास वा औषधांची अपुरी मात्रा घेतल्यास एचबीए1सी पातळी 6.4 पेक्षा जास्त असते. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत बर्याच वेळा रक्तशर्करा सामान्य असते; पण एचबीए1सी ची पातळी वाढलेली असते. त्यावरून मधुमेहाचे निदान होऊ शकते. या चाचणीसाठी दिवसभरात केव्हाही रक्त दिले तरी चालते. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट- सुप्त मधुमेह ओळखण्यासाठी ही एक खात्रीशीर तपासणी आहे. 80 ग्रॅम ग्लुकोज 100 मि.लि. पाण्यात विरघळवून उपाशीपोटी दिले जाते. ग्लुकोज जठरातून शोषले जाऊन लवकर रक्तात येते. त्यामुळे रक्तशर्करा वाढते. सेवनानंतर दर अर्ध्या तासानंतर रक्तशर्करा तपासून त्याचा आलेख काढला जातो. दोन तासानंतर जर रक्तशर्करा 180 मि.ग्रॅ. / 100 मि.लि. पेक्षा जास्त आली, तर त्या व्यक्तीस नक्की लवकर मधुमेह होणार, याची खात्री असते. मधुमेहाविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेणारा मधुमेही रुग्ण खूप काळ जगू शकतो. मधुमेह अजूनपर्यंत एक शांत रोग आहे, त्यामुळे लक्षणे दिसू लागेपर्यंत डॉक्टरांकडे जाणे लांबणीवर टाकू नये. दुसर्या डॉक्टरकडे जावे लागले, तर त्याच्यापासून मधुमेह लपवू नये. आहार, व्यायाम, औषधोपचार यात, त्याचप्रमाणे मधुमेहाच्या इतर विविध अंगांचा अभ्यास करून त्यांचे काळजीपूर्वक व काटेकोरपणे पालन करू शकणार्या मधुमेही रुग्णाला चारचौघांप्रमाणे सुखावह जीवन व्यतीत करायला कुठलीही अडचण येणार नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे माझे वडील. त्यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले. गेल्या दहा वर्षांत तीन वेळा अँजिओप्लास्टी केली मी त्यांच्यावर. आज 82 व्या वर्षीसुद्धा ते नियमित रुग्णसेवा करतात.