वावी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान
सिन्नर ः प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या नांदूरशिंगोटे परिसरात डिझेल चोरांचा सुळसुळाट झाला असून, गेल्या काही दिवसांमध्ये डिझेल चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात रस्त्यावर छोटी-मोठी हॉटेल्स, ढाबे, पेट्रोल पंप असून, याठिकाणी रात्रीच्या वेळी वाहने मुक्कामी थांबतात. मालवाहू गाड्यांचे चालक, क्लिनर झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास चोरटे संधी साधत असून, वाहनांतून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरी करत आहेत. यापूर्वीही अनेक घटना घडूनही डिझेल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने चोरट्यांचे फावत आहे.
गुरुवारी (दि.12) पहाटेच्या चार ते पाच वाजेदरम्यान नांदूरशिंगोटे – लोणी रस्त्यावर असलेल्या हॉटेल प्रियलसमोर बाहेरील राज्यातील वाहने रात्री मुक्कामी थांबलेली असताना, काही डिझेल चोरांनी याठिकाणी डिझेल चोरी केल्याचा प्रकार घडला.
या वाहनांतील कमीत कमी 15 हजार रुपये किमतीचे डिझेल चोरीला गेल्याचे सदरच्या वाहनधारकाने सांगितले. मात्र, वाहनधारक परराज्यातील
असल्यामुळे तेे पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचत नाहीत. पोलिसांकडे तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे पाहून वाहनधारक नुकसान सहन करून पुढील प्रवास करतात. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असल्याने वाहनधारक हॉटेलवर मुक्कामी थांबवण्यास धजावत नाहीत. परिणामी परिसरातील व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
यापूर्वीदेखील नांदूरशिंगोटे परिसरातील रस्त्यांवर डिझेल चोरी झालेली आहे. त्याचा अद्याप शोध लागलेला नसताना, डिझेल चोरीच्या घटना वाढत आहेच. पोलीस यंत्रणेकडून या भागात गस्त वाढवण्यात यावी, तसेच डिझेल चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाटी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील व्यावसायिक करत आहेत.
नांदूरशिंगोटे परिसराचा वाढत असलेला विस्तार पाहता या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अनेक वाहने पेट्रोल पंप व हॉटेल या ठिकाणी मुक्कामी थांबतात. मात्र, डिझेल चोरीच्या घटना सर्रास सुरू आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढून डिझेल चोरट्यांचा बंदोबस्त करावा.
– संजय शेळके, संचालक एकविरा पेट्रोलियम